फेर‘फटका’ : कर्तृत्ववान ठाणेकरांच्या कार्याचा सन्मान

ठाणे शहरातील कार्यकर्तृत्ववान व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात येते.

 

ठाणे शहराचा उत्सव समजली जाणारी ठाणे महापौर वर्षां मॅरेथॉन स्पर्धा मोठय़ा उत्साहात संपन्न झाली. तब्बल २२ हजारांहून अधिक खेळाडू यात सहभागी झाले होते. स्पर्धेतील स्पर्धकांना प्रोत्साहित करण्यासाठी ठाणे शहरातील विविध स्तरांतील, समाजातील बांधव मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. विविध संस्था, व्यापारी संघटना, मॉल्स, ज्येष्ठ नागरिक संघ यांनी या स्पर्धेत आपली हजेरी लावून आयोजकांचा आनंद द्विगुणित केला. ठाणे महापौर वर्षां मॅरेथॉन स्पर्धेनंतर ठाणे महापालिकेचा वर्धापन दिन हा १ ऑक्टोबर रोजी मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून ठाणे शहरातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्तींना त्यांचे कार्यकर्तृत्व पाहून ठाणे भूषण, ठाणे गौरव व ठाणे गुणीजन पुरस्कारांनी गौरविण्यात येते.

ठाणे शहरातील कार्यकर्तृत्ववान व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात येते. सुरुवातीला या पुरस्कारासाठी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच व्यक्तींना गौरविण्यात येत होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून या पुरस्कारांची संख्या वाढत चालली असल्याचे दिसून येते. शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणारे हे पुरस्कार निश्चितच मानाचे आहेत. तसेच त्या पुरस्काराचे महत्त्वही तितकेच टिकून राहणेही आवश्यक आहे. तसेच आपल्या शहराने केलेला गौरव हा प्रत्येकासाठीच महत्त्वाचा असतो. गेल्या काही वर्षांपासून तर या पुरस्काराची संख्या दीडशेच्या घरात गेल्याचे पाहावयास मिळाले. या पुरस्कारासाठी नियमावली पालिकेने ठरविणे आवश्यक आहे, तर आणि तरच या पुरस्काराचे असलेले महत्त्व टिकून राहील.

क्रीडा, कला असे कोणतेही क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रात ठाण्याने आपला नावलौकिक प्रस्थापित केला आहे. त्यामुळे ठाण्याचे नाव राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणाऱ्या ठाणेकरांचे कौतुक करणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे; परंतु ठाणे भूषण, ठाणे गौरव व ठाणे गुणीजन या तिन्ही पुरस्कारांसाठी महापालिकेने नियमावली तयार करून त्याप्रमाणे प्राप्त झालेल्या अर्जावर निर्णय घेतल्यास पुरस्कार निश्चित योग्य व्यक्तीला मिळेल. पुरस्काराचा हा सोहळा गडकरी रंगायतन येथे आयोजित केला जातो. मात्र या दिवशी पुरस्कारांची यादी ही न संपणारी असल्याचे पाहावयास मिळते. या पुरस्कारांची निवड करण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमणे आवश्यक आहे किंवा महापालिकेने ठाणे शहरातील कर्तृत्ववान व्यक्तींना आमंत्रित करुन त्यांचा सन्मान केला पाहिजे. या पुरस्कारासाठी प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांची शिफारस घेतली जाते; परंतु ही नगरसेवक हा त्या त्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करीत असल्यामुळे त्यांनाही अनेकांना डावलणे शक्य होत नाही. या पुरस्काराचे महत्त्व जर टिकवायचे असेल तर पुरस्कारासाठी आवश्यक असलेले निकष ठरवून त्याप्रमाणेच हे पुरस्कार दिले गेले तर निश्चितच या पुरस्काराला सन्मान मिळेल आणि कार्यकर्तृत्ववान व्यक्ती त्याचा मानकरी ठरेल यात शंका नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Efficient persons awarded in thane

Next Story
गुन्हेवृत्त : जिल्ह्यत दुचाकी चोरांचा उच्छाद
ताज्या बातम्या