ठाणे : नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला त्यांच्या समर्थकांमार्फत बॅनरबाजी आणि समाजमाध्यमांद्वारे पाठिंबा देण्यास सुरुवात झाली असतानाच या बंडामुळे अस्वस्थ झालेल्या जिल्ह्यातील शिवसेना नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची ‘संवाद’ साधण्याची खेळी शिंदे यांच्या गोटातून सुरू झाली आहे. शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लुईसवाडी येथील बंगल्यावर ठाण मांडून आहेत. या ठिकाणी ते जिल्ह्यातून येणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना भेटत आहेत तसेच काही खासदारांशी देखील संपर्क साधत आहेत. 

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या काही पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी शिंदे यांचे उघडपणे समर्थन केले आहे. यामध्ये जिल्ह्यातील प्रमुख शहरांमधील प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा मोठा भरणा असल्याने ही फूट बरीच मोठी असेल असे चित्र आहे. असे असले तरी जिल्ह्यातील शिवसेनेतील एक मोठा गट या घडामोडींमुळे अस्वस्थ असून वर्षांनुवर्षे धनुष्यबाणावर मतदान करणारा मतदार काय करेल या विचाराने कोणताही निर्णय घेताना दिसत नाही. अशा किनाऱ्यावर असलेल्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांना आपल्या तंबूत खेचण्यासाठी गुरुवारी सायंकाळपासून शिंदे गट सक्रिय झाला आहे.

ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणून एकनाथ शिंदे ओळखले जातात. त्यांचा जिल्ह्यात मोठा दबदबा आहे. त्यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यात मोठी फूट पडेल अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, ठाणे शहरातील अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक याबाबत मौन बाळगून आहेत. शिवसेना पक्षासोबत गेली अनेक वर्षे एकनिष्ठेने काम केले असून या पक्षाला सोडूनही जाणे शक्य होत नाही. पण, गेली अनेक वर्षे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना त्यांच्याकडून सर्वच बाबतीत सहकार्य मिळाल्याने त्यांचीही साथ सोडणे शक्य होत नाही. नेमकी काय भूमिका घ्यायची हेच समजत नसल्याचे काही शिवसैनिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे शिवसैनिक पक्षासोबत राहू शकतात, अशी भीती शिंदे गटाला आहे. यातूनच त्यांनी अशा काठावर असलेल्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांचे मनपरिवर्तन करण्यासाठी त्यांना शिंदे गटाकडून शिंदे यांच्या निवासस्थानावर बोलविण्यात येत आहे. 

गेल्या दोन दशकांपासून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संघटनेसाठी काम करत आहोत. संघटनेसाठी शिंदे यांना मेहनत घेताना आम्ही पाहिले आहे. तरीही शिवसेनाप्रमुखांना मानणारा, आनंद दिघे यांना पुजणारा शिवसैनिक या घडामोडींवर फारसा खूश नाही अशा प्रतिक्रिया आम्हाला मिळत आहेत. त्यामुळे निवडणुकीत धनुष्यबाण या चिन्हाशिवाय लढण्याचा विचारही मनाला शिवणे कठीण आहे. – माजी नगरसेवक, ठाणे महापालिका

शिवसेनेला नेता नाही..

शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या काही पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी शिंदे यांचे उघडपणे समर्थन केले सुरू केले असून त्यात शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांनीही पक्षाशी फारकत घेत शिंदे यांचे समर्थन केले आहे. यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेला नेताच नसल्याचे चित्र आहे.