बेकायदा झोपडय़ांसाठी शिंदे-आव्हाडांची युती

खाडीकिनारी असलेल्या झोपडय़ांमधून वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांची नाराजी ओढवली जाईल,

कळवा खाडीकिनाऱ्यावरील झोपडय़ांच्या पुनर्वसनाची एकमुखी मागणी; पालकमंत्र्यांचा कळवा खाडीकिनारी दौरा

ठाणे-कळवा परिसरातील खाडीकिनारी उभारलेल्या बेकायदा झोपडय़ा वाचाव्यात यासाठी महापालिका प्रशासनाविरोधात रस्त्यावरची लढाई सुरू करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांना आता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचीही साथ मिळाली आहे. बुधवारी या भागात आयोजित केलेल्या पाहणी दौऱ्यात रहिवाशांचे पुनर्वसन होईल, असे आश्वासन देत शिवसेनेनेही मतांच्या राजकारणात उडी घेतली आहे. पालकमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या वेळी कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड हेदेखील त्यांच्यासोबत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ठाणे शहराला लाभलेला खाडीकिनारा अतिक्रमणमुक्त व्हावा यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पंधरवडय़ापूर्वी मोठी मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेमुळे परंपरागत बालेकिल्ल्यांना धक्का पोहोचेल या भीतीने राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी आक्रमक भूमिका घेताना महापालिकेविरोधात थेट रस्त्यावरील लढाई सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापालिकेतील आठ नगरसेवकांनी या प्रकरणी आयुक्तांकडे राजीनामे सादर केले असून कळव्यात भला मोठा मोर्चा काढत शक्तिप्रदर्शनही केले आहे. राष्ट्रवादीच्या या शक्तिप्रदर्शनामुळे शिवसेना नेत्यांच्या पोटात खड्डा पडला असून एकगठ्ठा मतांचा फटका बसण्याची भीती येथील पक्षाचे इच्छुक उमेदवार गेल्या काही दिवसांपासून नेत्यांकडे व्यक्त करीत आहेत. खाडीकिनारी असलेल्या झोपडय़ांमधून वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांची नाराजी ओढवली जाईल, या भीतीने आता अतिक्रमण बचाव मोहिमेत शिवसेना नेत्यांनीही उडी घेताना येथील रहिवाशांचे आधी पुनर्वसन करा, अशा सूचना दिल्या आहेत.

अभद्र युती फक्त मतांसाठी

कळवा खाडीकिनारी परिसर बांधकाममुक्त करण्याची योजना महापालिकेने आखली असून त्यानुसार या भागातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. मात्र या भागातील बेकायदा झोपडय़ा वाचविण्यासाठी राष्ट्रवादीने रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर हा मुद्दा चिघळत ठेवण्याचे पुरेपूर प्रयत्नही सुरू होते. असे असतानाच पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर संजय मोरे यांच्यासह महापालिकेतील पदाधिकारी आणि नगरसेवकांनी बुधवारी कळवा खाडीकिनारी भागाचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान  खाडीलगतच्या झोपडपट्टीवासीयांना कुठल्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडणार नाही आणि त्यांचे पुनर्वसन केले जाईल, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. शहरातील रस्ता रुंदीकरण, सुशोभीकरण यासाठी बांधकामे हटविण्यात आली असून तेथील बाधितांचे शंभर टक्के  पुनर्वसन पालिकेने केले असल्याचेही त्यांनी सांगितले. या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मतांचे गणित लक्षात घेऊन पक्षांना बेकायदा झोपडय़ांचा कळवळा आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Eknath shinde jitendra awhad fighting for protection of illegal slums

ताज्या बातम्या