राजाजी पथ व रामनगर येथील पार्किंगमुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी वाहतूक अधिसूचना
वाहने आणि पादचाऱ्यांच्या वर्दळीने भरलेल्या राजाजी पथ व रामनगर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अनधिकृत पार्किंगचा वेढा हटवण्यासाठी वाहतूक विभागाने सम-विषम पार्किंग करण्यासाठी अधिसूचना काढली आहे. यामुळे गर्दीच्या काळात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना होणारी वाहनांची पार्किंग बंद होऊन एक बाजू मोकळी राहण्यास मदत होणार आहे. डोंबिवलीतील सम-विषम पार्किंगच्या या अधिसूचनेमुळे शहरातील वाहतूक कोंडी काहीशी कमी होण्यास हातभार लागू शकतो. याविषयी काही आक्षेप असल्यास पुढील महिनाभरामध्ये वाहतूक पोलिसांच्या मुख्यालयात कळवावे, असे आवाहन ठाणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त संदीप पालवे यांनी केले आहे.
डोंबिवली (पूर्व) रेल्वे स्थानकाच्या परिसरातील राजाजी पथ व रामनगर रस्त्यावर वाहनांची व नागरिकांची मोठय़ा प्रमाणात वर्दळ असते. त्यात परिसरातील व्यापारी, कामानिमित्त येणारे नागरिक त्यांची वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पार्क करीत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या अधिसूचनेला काही आक्षेप असल्यास त्या लेखी स्वरूपात पोलीस उपआयुक्त, वाहतूक विभाग, ठाणे शहर तीन हात नाका, एल.बी.एस. रोड, ठाणे (प) यांच्या कार्यालयास कळवावे किंवा डोंबिवली वाहतूक उपविभाग कार्यालयास पाठवाव्यात. याविषयी कोणत्याही प्रकारे आक्षेप नसल्यास ही अधिसूचना कायमस्वरूपी अमलात राहणार आहे. तसेच पोलिसांची वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका यांसारख्या अत्यावश्यक सेवेच्या वाहनांसाठी ही अधिसूचना लागू होणार नाही, असे पोलीस उपायुक्त संदीप पालवे यांनी कळवले आहे.
पुढील ३० दिवस प्रायोगिक तत्त्वावर
या मार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी तसेच नागरिकांना राजाजी पथ मार्गावर स्वामी नारायण मंदिर ते मढवी बंगलापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सम-विषम पार्किंग (पी-१, पी-२) प्रमाणे सर्व प्रकारची वाहने पार्क करण्यात मुभा देण्यात आली आहे. राजाजी पथ गल्ली नं. १ (बॉस हॉटेल गल्ली) श्री प्रभा सोसायटीलगत गल्लीच्या दोन्ही बाजूंना ५० मीटपर्यंत सम-विषम तारखांना दुचाकी वाहने पार्क करण्यास मुभा देण्यात आली आहे. राजाजी पथ गल्ली नं. २, ३ व ४ च्या दोन्ही बाजूंना सम-विषम तारखांप्रमाणे दुचाकी वाहने पार्क करण्यास मुभा देण्यात आली आहे. राजाजी पथ मुख्य मार्ग व गल्ली नं. १, २, ३ किंवा ४ कॉर्नर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना २० मीटपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनास नो पार्किंग करण्यात येत आहे. डोंबिवली पूर्व म. द. ठाकरे (जुना आयरे रोड) मार्गावर दोन्ही बाजूंना राजाजी पथ गल्ली नं. १ कॉर्नरपासून ते घाडा चौक (स्वामी विवेकानंद शाळा) पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनास नो पार्किंगकरण्यात येणार आहे.