कोकणातील खाद्यसंस्कृतीचा स्वाद आता डोंबिवलीकरांनाही घेता येणार आहे, तोही खास शाकाहारी. कोकणातील खाद्य खजिन्याचा ठेवा म्हणजे येथील फणसाची भाजी, घावन घाटल, काळ्या वाटाण्याची उसळ, डाळिंबी उसळ, भाजणीचे वडे, अळूची वडी, कोथिंबीर वडी, वांगी भात, तोंडली भात. अशी लज्जतदार मेजवानी डोंबिवलीतील नागरिकांना या महोत्सवादरम्यान चाखायला मिळणार आहे. श्रीयोग डायनिंग हॉलतर्फे आयोजित या ‘कोकणी फूड फेस्टिवल’ला नुकतीच सुरुवात झाली असून येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत हा खाद्यमहोत्सव बोडस मंगल कार्यालयावर, पं. मालवीय रोड, रामनगर, डोंबिवली (पू.) येथे होणार आहे.
शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल
दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरात जत्रा भरते. यंदा संगीतप्रेमी मंडळींसाठी मंदिरालगतच्या मैदानात १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संगीत कलावंतांच्या मैफली आयोजित करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी, १३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजता शिवामणी, साडेआठ वाजता रेखा भारद्वाज, शनिवारी १४ फेब्रुवारी रोजी सात वाजता पं. जसराज, दुसऱ्या सत्रात साडेआठ वाजता साब्री ब्रदर्स, तर रविवारी १५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजता हरिहरन यांच्या गीतांची मैफल होईल. या महोत्सवाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध चित्रकार तसेच शिल्पकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. महोत्सवात रसिकांना विनामूल्य प्रवेश असून रेल्वे स्थानकापासून विनामूल्य बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या आर्ट फेस्टिव्हलमध्ये ३० ते ४०  फूट नटराजाची भव्य प्रतिकृती व विविध कार्यक्रमांसाठी २५ ते ३० फुटांचे भव्य व्यासपीठही उभारण्यात आले आहे. सकाळी १० ते रात्री दहा या वेळेत महोत्सवात निरनिराळ्या कलांचे सादरीकरण, कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री आयोजित केली आहे.
शंकर-जयकिशन यांच्या गाण्यांची मैफल
हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्ण युगातील एक महत्त्वाची संगीतकार जोडी म्हणून आजही शंकर-जयकिशन यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांच्या सदाबहार गाण्यांची मैफल ऐकण्याचा योग कलामाध्यम संस्थेने जुळवून आणला आहे. शुक्रवार, १३ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता गडकरी रंगायतन येथे आयोजित ‘कहे झूम झूम रात ये सुहानी’ या मैफलीत अनिल वाजपेयी, अनघा पेंडसे, मधुरा देशपांडे, अनिरुद्ध जोशी, अरुण तळकर हे गायक कलावंत शंकर जयकिशन यांची लोकप्रिय गाणी सादर करतील. सोलोमन यांचे संगीत संयोजन आहे.
पक्षी महोत्सव
वाढत्या शहरीकरणामुळे भोपरच्या टेकडीवरील झाडांचा होणारा ऱ्हास, रेतीच्या अतिउपशामुळे खाडीची झालेली दुरवस्था याचा सर्वाधिक परिणाम येथील प्राणी आणि पक्ष्यांवर होतो. त्यामुळे पक्षी पाहणे दुर्मीळच. त्यासाठी डोंबिवलीतील न्यास ट्रस्टतर्फे रविवार, १५ जानेवारी रोजी ‘पक्षी महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या फेस्टिव्हलदरम्यान सकाळी तीन ट्रेल्स, संध्याकाळी पक्ष्यांच्या नोंदीसंबंधी चर्चासत्र तसेच ‘ठाणे खाडी बचाव मोहीम’ याविषयी माहिती देण्यात येईल. डॉ. राजू कसबे हे ‘पक्षी शास्त्रातील करिअरच्या संधी’ यावर मार्गदर्शन करतील. त्याचप्रमाणे स्लाइड शो स्पर्धा, बर्ड फिल्म फेस्टिव्हल स्पर्धा आणि पोस्टर स्पर्धा अशा विविध स्पर्धा या वेळी घेण्यात येणार आहेत. नावनोंदणीसाठी पत्ता : न्यास ट्रस्ट अभ्युदय सोसायटी, वात्सल्यदीप सोसायटीसमोर, दत्तनगर, डोंबिवली (पू.). अधिक माहितीसाठी संपर्क : गायत्री ओक-९६१९९११२८९ आणि खंजन रवाणी : ९८३३५८८४७५.
आनंदवनच्या मदतीसाठी नाटय़सृष्टी
बाबा आमटे यांनी आपले संपूर्ण जीवन महारोग्यांच्या सेवेत घालवले. या सेवेत आपल्या सर्वाचाही खारीचा वाटा असावा यासाठी चंद्रलेखा निर्मित अष्टविनायक प्रकाशित ‘आई तुला मी कुठे ठेवू?’ या नाटकाचे पाच प्रयोग मुंबई आणि ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आले आहेत. सोमवार, १६ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता गडकरी रंगायतन, ठाणे(प.) येथे या नाटकाचा प्रयोग होणार आहे. नाटय़ प्रयोगाच्या मध्यंतरात अभिनेते प्रशांत दामले, दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे आणि अभिनेत्री निर्मिती सावंत, रोहिणी हट्टंगडी यांच्या उपस्थितीत डॉ. विकास आमटे यांच्याकडे निर्माते दिलीप जाधव मदतनिधी सुपूर्द करणार आहेत.
महिलांच्या अलंकारांचे प्रदर्शन
खरेदी करणे स्त्रियांचा जन्मसिद्ध हक्कच जणू, त्यामध्येही जर एकाच छताखाली अनेक गोष्टी उपलब्ध असतील तर सोन्याहून पिवळे. ठाण्यामध्ये महाराष्ट्र व्यापारी संघातर्फे भव्य ग्राहक पेठेला नुकतीच सुरुवात झाली असून ही ग्राहक पेठ येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत घंटाळी मैदान, नौपाडा, ठाणे (प.) येथे शुक्रवारी दुपारी ३ ते रात्री ९ आणि शनिवार व रविवार सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत खुली राहणार आहे. कागदी फुले, चांदीच्या भेटवस्तू, इमिटेशन ज्वेलरी, खाद्य पदार्थ, किचन वेअर, मातीची भांडी, मालवणी वस्तू व पदार्थ, बनारसी वस्तू अशा विविध गोष्टींचा समावेश यामध्ये आहे.
संकलन : शलाका सरफरे