scorecardresearch

जिल्ह्यातील रोपवाटिकेतून ९ लाख शोभिवंत झाडांची परदेशात निर्यात; नेदरलँड्स, अमेरिका आणि जपान या देशांमध्ये निर्यात

शेतकऱ्यांचा कृषी क्षेत्रात सहभाग वाढावा याकरिता जिल्हा कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना विविध रोपांच्या आणि पिकांच्या लागवडीसाठी शासकीय अनुदान देण्यात येते.

ठाणे : शेतकऱ्यांचा कृषी क्षेत्रात सहभाग वाढावा याकरिता जिल्हा कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना विविध रोपांच्या आणि पिकांच्या लागवडीसाठी शासकीय अनुदान देण्यात येते. गेल्या काही वर्षांपासून या अनुदानाचे सकारात्मक परिणाम दिसू लागले असून जिल्ह्यातून भाज्या आणि फळांची परदेशात होणारी निर्यात अलीकडे लक्षवेधी ठरू लागली आहे. पारंपरिक पिकांबरोबरच जिल्ह्यातील वांगणी येथील शासनमान्य रोपवाटिकेतून मागील वर्षभरात ९ लाख ९० हजार ७३५ शोभिवंत झाडांची नेदरलँड्स, अमेरिका आणि जपान या देशांमध्ये निर्यात करण्यात आली आहे. फळ आणि भाज्यांच्या जोडीला शोभिवंत झाडांची वाढलेली ही निर्यात येथील शेतकऱ्यांसाठी व्यवसायाचे नवे दालन उघडे करणारी ठरली आहे.
जिल्हा कृषी विभागातर्फे दरवर्षी जिल्ह्यात पिकणाऱ्या कृषी मालाची विविध राज्यांसह परदेशात निर्यात करण्यासाठी नियोजन करण्यात येते. यासाठी भाजीपाला तसेच फळबागा लागवड क्षेत्राचे नियोजन करण्यात येते. मागील वर्षी जिल्ह्यात १०८० हेक्टरवर फळबागा आणि फुलबागांच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले होते. शेती व्यवसायाबरोबरच जिल्ह्यात रोपवाटिकांचा व्यवसाय करणाऱ्यांची संख्यादेखील लक्षणीय आहे. यातील अनेक रोपवाटिकाधारक फळ आणि फूल रोपांचे रोपण आणि विक्री करतात. या रोपांच्या लागवडीसाठी आणि कृषी क्षेत्रात सहभाग वाढवा यासाठी जिल्हा कृषी विभागाकडून शासनमान्य रोपवाटिकाधारकांना काही अंशी अनुदानदेखील देण्यात येते. याचबरोबर कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा) द्वारे अधिकृतरीत्या परवानगी असलेल्या रोपवाटिकाधारकांनाच परदेशात विविध रोपांची निर्यात करता येते.
जिल्ह्यात वांगणी आणि शहापूर येथे या शासनमान्य रोपवाटिका आहेत. यातील विविध रोपांची परदेशात निर्यात केली जाते. या पार्श्वभूमीवर मागील वर्षभराच्या कालावधीत वांगणी येथील रोपवाटिकेतून तब्बल ९ लाख ९० हजार ७३५ शोभिवंत झाडांची निर्यात करण्यात आली आहे. नेदरलँड, अमेरिका आणि जपान या देशांमध्ये ही निर्यात करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. निर्यात करण्यात आलेल्या एकूण शोभिवंत झाडांपैकी सुमारे ७० टक्के झाडांची नेदरलँड्स देशात निर्यात करण्यात आली आहे.
या प्रजातीच्या झाडांची निर्यात
परदेशात निर्यात करण्यात आलेल्या झाडांमध्ये प्रामुख्याने अॅशडेनियम आणि सक्युलंट जातीच्या झाडांचा समावेश आहे. ही शोभिवंत झाडे प्रामुख्याने घरातच ठेवली जातात. तसेच या तिन्ही देशांमधील वातावरणाच्या दृष्टीने या झाडांची रोपवाटिकाधारकांकडून लागवड आणि वाढ केली जाते.
जिल्ह्यातून फळांची आणि भाज्यांची मोठय़ा प्रमाणात निर्यात होत आहे. याचबरोबर सद्य:स्थितीत जिल्ह्यातील रोपवाटिकांतून परदेशात शोभिवंत झाडांची निर्यात झाली असून जिल्हा कृषी क्षेत्रासाठी ही सकारात्मक बाब आहे. – मोहन वाघ, जिल्हा कृषी अधिकारी, ठाणे

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Export lakh ornamental trees abroad district nursery exports netherlands usa japan amy

ताज्या बातम्या