मंद प्रकाश.. गुलाबी थंडी.. केकचा घमघमाट असे हे वर्णनात्मक चित्र गोव्यातील एखाद्या ‘ख्रिस्ती बेकरी’चे आहे असे वाटले असेल ना! पण तसे अजिबात नाही. गोव्याचे हे हुबेहूब चित्र ठाण्यातील कोलबाड परिसरातील ‘अँथनी बेकरी’मध्ये सध्या पाहायला मिळत आहे. निमित्त आहे नाताळ आणि नववर्षांच्या स्वागताचे. ठाण्यातील खोपट परिसरातील कोलबाड रस्त्यावर अॅँथनी बेकरी आहे. ७० वर्षांपासून आपली केकची परंपरा कायम ठेवणाऱ्या अँथनी बेकरी येथील विविध प्रकारचे केक प्रसिद्ध आहेत. नाताळ आणि नववर्षांच्या मुहूर्तावर खास ‘रम’ या मद्य प्रकाराचा समावेश असणाऱ्या ‘रिच प्लम केक’ला ग्राहकांची विशेष मागणी मिळत आहे. त्याशिवाय बेकरीमधील अन्य केकचीही चलती पाहायला मिळत आहे.
दंडी केक
अमुल तूप, सुका मेवा (खिसमिस, टूटीफ्रुटी) आदी खाद्यघटकांच्या मिश्रणातून तयार झालेला दंडी केक अँथनी बेकरी येथे उपलब्ध आहे. दंडी केक एक किलो आणि अध्र्या किलोमध्ये उपलब्ध आहे. एका किलोसाठी ग्राहकांना ६०० रुपये मोजावे लागणार आहेत.
रिच प्लम केक (रम केक)
नाताळ आणि नववर्षांसाठी ग्राहकांचे विशेष लक्ष, प्रेम मिळवणारा केक म्हणजे रिच प्लम केक. हा केक बनविताना सुका मेवा, बिया यांना रममध्ये बुडविण्यात येते. त्यामुळे हा केक चाखताना प्रत्येक घासाला ‘रम’ची अनोखी चव जाणविल्याशिवाय राहवत नाही. रिच प्लम केक १ किलो, ३३० ग्रॅम आणि अध्र्या किलोमध्ये उपलब्ध आहे. १ किलोसाठी ४२० रुपये, ३३० ग्रॅमसाठी १४० रुपये आणि अध्र्या किलोसाठी २१० रुपये खवय्यांना मोजावे लागतील.
कोकोनट बाथ केक
नारळ, रवा आणि अमुल बटर यांच्या मिश्रणातून तयार होणारा ‘कोकोनट बाथ केक’ही प्रसिद्ध आहे. हा केक बनविण्यासाठी अगोदर नारळाला आठ तास आंबविण्यासाठी ठेवले जाते. असा हा नारळयुक्त केक चाखायलाच हवा.
व्हेज प्लम केक
शाकाहारी खवय्यांसाठी एगलेस बेकिंग पावडरच्या साहाय्याने बनविण्यात आलेला व्हेज प्लम केकही या ठिकाणी उपलब्ध आहे.
पाचपाखाडी- ‘ठाण्याचे केक हब’
ठाण्यातील पाचपाखाडी परिसराला ‘ठाण्याचे केक हब’ म्हणूनही नाव दिले तरी ती अतिशयोक्ती होणार नाही. ठाण्यातील पाचपाखाडी परिसरात असंख्य केकची दुकाने असल्याने ठाण्यातील नागरिक केक घेण्यासाठी पाचपाखाडी परिसराकडे धाव घेताना दिसतात. नाताळचा जल्लोष आणि नववर्षांच्या तयारीसाठी नागरिक या ठिकाणी जाणे पसंत करीत आहेत. पाचपाखाडी परिसरातील निवडक केकची दुकाने –
स्विट काऊंटी
स्विट काऊंटी येथे व्हेज प्लम केक, डिझाईन केक, चॉकलेट बुके असे विविध केक आणि चॉकलेट्सचे प्रकार खास नाताळ आणि नववर्षांसाठी ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. ग्राहकांच्या ऑर्डरनुसार केकवर डिझाइन काढले जाते. यामध्ये सँटाक्लोजचे चित्र असणाऱ्या केकचे आकर्षण आहे. त्याचप्रमाणे स्विट काऊंटी येथे मिळणारा ‘काऊंटी स्पेशल केक’ विशेष प्रसिद्ध आहे. काजू, चॉकलेट चिप्स, चेरी, स्ट्रॉबेरी यांच्यासमवेत सजलेला हा काऊंटी स्पेशल केक यंदाच्या नाताळला चाखायलाच हवा. हा केक अध्र्या किलो आणि एक किलोमध्ये उपलब्ध आहे.
गिल्ट ट्रिप
कप केक आणि चीझ केकसाठी ओळखले जाणारे दुकान म्हणजे ‘गिल्ट ट्रिप’. विविध प्रकारचे कप केक आणि चीझ केक या ठिकाणी उपलब्ध आहेत. चीझ केकमध्ये रासबेरी फ्लेवरचा रेड वेलवेट चीझ केक, ब्ल्यूबेरी चीझ केक, कॅरामल चीझ केक, चॉकलेट बेक केक, न्यूयॉर्क बेक चीझ केक आदी केकचा समावेश आहे. गिल्ट ट्रिप येथे मिळणारे कप केक रेग्युलर आणि मिनी अशा दोनही आकारांमध्ये उपलब्ध आहेत. मिनी कप केक रुपये २० पासून तर रेग्युलर कप केक रुपये ७० पासून उपलब्ध आहेत. या ठिकाणी मिळणारा ‘रॉयल ओपेरा केक’ काही औरच. ब्ल्यूबेरी, रासबेरी आणि पाइनअॅपल (अननस) यांच्या मिश्रणातून रॉयल ओपेरा केक तयार होतो.