खवय्यांच्या तोंडाला पुरून उरतील अशा जागा देशभर सापडतात. मग अगदी हातगाडीवरच्या चाटपासून ते सायकलवर विकल्या जाणाऱ्या डोश्यापर्यंत अनेक ठिकाणी या खवय्यांची गर्दी लोटलेली आपण पाहत असतो. खवय्ये अशा ठिकाणांच्या तर खास शोधातच असतात. त्यातही बटाटावडा, मिसळची दुकाने, हातगाडय़ा यांच्याभोवती सगळ्यात जास्त खवय्यांचा गराडा पडलेला असतो. याच वडा व मिसळीच्या चटकदार चवीने महाराष्ट्राला खाद्यसंस्कृतीच्या जगात एक वेगळी ओळख दिली आहे. महाराष्ट्राला मिळालेली हीच ओळख बदलापुरातील बाळासाहेब, दीपक, सुहास, राम या काटदरेबंधूंनी गेल्या ३२ वर्षांत स्वत:च्या मेहनतीने द्विगुणित केली आहे.
बदलापूर पूर्व व पश्चिम भागात असलेल्या काटदरे स्नॅक्स शहरातील आपल्या तीन शाखांच्या माध्यमातून खवय्यांची भूक भागवत आहे. बटाटावडा, मिसळ पाव, मूग भजी, पीयूष, पन्हे, लस्सी आणि ताक  या त्यांच्या पारंपरिक पदार्थानी शहरात खूप लोकप्रियता मिळवली आहे. काटदरेंचा बटाटावडा, मूग भजी व मिसळ खाण्यासाठी रोजच येथे गर्दी होताना दिसत असते. गरम वडा व भजी, तरीदार मिसळ रोजच्या रोज मोठय़ा प्रमाणात येथे संपत असते. शहरातील काही खवय्यांनी त्यांच्या या पदार्थाइतकीच त्यांच्याकडील चटण्यांचेही कौतुक केले आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे हे मराठमोळे पदार्थच ठेवण्यात येतात. आजपर्यंत अनेक साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी या पदार्थाचा आस्वाद घेतला आहे. पोटभर मिसळ खाण्यास मिळते हे त्यांचे वैशिष्टय़ आहे. तीन रुपयांपासून सुरू केलेला वडा आता बारा रुपयाला मिळतो तर दहा रुपयांना मिळणारी मिसळ सध्या चाळीस रुपयांना मिळते. ग्राहकांना कोणताही पदार्थ गरम काढून देण्यात येतो आणि हीच आमची ओळख असल्याचे राम काटदरे सांगतात. उन्हाळा सुरू होत असल्याने अंगाची होणारी काहिली शांत करण्यासाठी अनेक जण काटदरे स्नॅक्सची खासियत असलेल्या पीयूष, पन्हे, लस्सी व ताक यांचा आस्वाद घ्यायला येत असतात. विशेष म्हणजे स्वत: मालक व त्यांची मुले उत्तम कारागीर असून सध्या त्यांची तिसरी पिढी या व्यवसायात आहे. वडा, मिसळ या खाद्यपदार्थाच्या बरोबरीनेच पारंपरिक पद्धतीने जिलेबी, श्रीखंड बनवण्यात त्यांचा हातखंडा आहे. दोन काडय़ा व तांब्याच्या भांडय़ाचा वापर करून ही जिलेबी बनविण्यात येत असल्याने या जिलेबीला दसरा व गुढीपाडवा या सणांच्या निमित्ताने खूप मागणी असते. त्यांच्या हॉटेलच्या बाहेरील विशेष स्टॉलवर यासाठी रांगा लागलेल्या असतात. या वेळी प्रत्येकी दीडशे किलो श्रीखंड व जिलेबीचा खप होतो. तसेच काटदरे यांनी त्यांच्या या चवीची ओळख त्यांच्या काटदरे मंगल कार्यालयाच्या जेवणातूनही कायम ठेवली आहे. जिलेबी ही गोलाकार दुनियेसारखी असून तीच तुम्हाला या व्यवसायात पुढे नेईल, हे हातात झारा देऊन राम काटदरे यांच्या वडिलांनी उच्चारलेले वाक्य सांगताना काटदरे यांना गहिवरून आले होते. या शहरात १९४७ साली आल्यानंतर मोठय़ा मेहनतीने आम्ही उभे राहिलो. जवळपास तीस वर्षांपूर्वी स्टेशनजवळ सुरू केलेल्या वडय़ाच्या एका छोटय़ा स्टॉलच्या जोरावर आम्ही भावंडांनी आज तीन हॉटेल, दुमजली हॉल एवढा व्याप वाढवला आहे. तसेच आमची पुढची पिढी देखी निष्णात झाली असून त्यातील प्रत्येक जण हॉटेलमध्ये कारागिराचे कामदेखील बघतात. आजवर अनेक टँकर व ट्रक भरून वडा व मिसळ आम्ही विकल्याचे काटदरे गमतीने सांगतात. आलेल्या गिऱ्हाईकाला पैसे नसतील तरी पोटभर खाऊन जा, असाच आम्ही आग्रह करीत असतो. शहरात अनेक ठिकाणी वडे व मिसळ विकली जाते, परंतु काटदरे स्नॅक्सकडे येणारा खवय्यांचा ओढा काही कमी झालेला नाही. त्यामुळे आजपर्यंत कायम राहिलेली उत्कृष्ट परंपरा इथून पुढेही कायम राहील असे त्यांनी सांगितले.
संकेत सबनीस
काटदरे स्नॅक्स
स्थळ – ए/६, देवधर मार्केट,
स्टेशनसमोर, बाजारपेठ, बदलापूर (प.)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Famous wada medley of katdare snacks in badlapur
First published on: 28-02-2015 at 12:15 IST