जलवाहिनीला जोडण्यात आलेला काँक्रीटचा भाग खाडीच्या दलदलीत खचल्याचे उघड

ठाणे : साकेत खाडीकिनारी भागात ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला जोडण्यात आलेला काँक्रीटचा भाग खाडीच्या दलदल भागात खचल्याने जलवाहिनी फुटून शहराचा पाणीपुरवठा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ही बाब उघडकीस येताच पालिका प्रशासनाने तातडीने सल्लागारामार्फत या जलवाहिनीची पाहाणी सुरू केली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्रोतांमार्फत दररोज ४८५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यापैकी ठाणे महापालिकेच्या योजनेतून दोनशे दशलक्षलीटर पाणीपुरवठा करण्यात येतो. साकेत खाडीकिनारी भागात पालिका योजनेच्या जलवाहिनीला जोडण्यात आलेला काँक्रीटचा भाग खाडीच्या दलदल भागात खचला असून यामुळे जलवाहिनी फुटून शहराचा पाणीपुरवठा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थायी समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक सुहास देसाई यांनी हा प्रकार उघडकीस आणला.

साकेत येथील जलवाहिनी जीर्ण आणि जुनी झाली असून ती धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे ती बदलण्यासाठी वारंवार सांगण्यात येत आहे. परंतु त्याकडे लक्ष दिले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला. या संदर्भात पालिका आयुक्तांशी चर्चा करण्यात आली असून त्यासाठी ३ कोटींचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

आढावा घेण्याचे काम

खाडीकिनारी भागात काँक्रीटचा भाग खचला असून त्याच्या दुरुस्तीसाठी तिथे वाहन कसे जाऊ शकेल आणि नेमकी काय दुरुस्ती करावी लागेल याचा आढावा सल्लागारांमार्फत घेण्याचे काम प्रशासनाने सुरू केल्याची माहिती प्रशासनाने दिली.