उन्हाळी सुट्टीतील शिबिरे, प्रशिक्षण आणि कार्यशाळांना शालेय विद्यार्थ्यांचा ओघ वाढला असून कला, क्रीडा, साहित्य, वाचन, अभिनय आणि गायन यापेक्षा वेगळ्या वाटा चोखाळणाऱ्या लहानग्यांसाठी विज्ञान क्षेत्राची वाट खुली आहे. ठाण्यातील विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांच्यावतीने मुलांसाठी विशेष विज्ञान तंत्रज्ञान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना सौर पॅनल, सौर दिवे, रोबो बनवणे आणि अनेक प्राथमिक विज्ञानाचे तंत्र शिकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही शिबिरे महिनाभराची असून काही केवळ पाच दिवसांचीही आहे. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शालेय प्रयोगांच्या दृष्टीने उपयुक्त ठरतील असे तंत्रसुद्धा या शिबिरांमधून शिकवले जात आहे. अशाच विज्ञान क्षेत्रातील मुशाफिरीचा हा वेध..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चाइल्ड टेक सेंटरचा ‘रोबोट कॅम्प’

ठाण्यातील चाइल्ड टेक संस्थेचे विविध उपक्रम सुरू असून ठाणे, कल्याण आणि डोंबिवली शहरांमध्येही त्यांच्या माध्यमातून मुलांना प्रशिक्षण दिले जात आहे. रोबोट कॅम्प २०१६ हा त्यांचा नवा उपक्रम असून चौथी ते दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष कृतीतून रोबोटिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणारी ही पाचदिवसीय कार्यशाळा आहे. या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक मोटर, गियर, पुली, सोल्डरिंग, डीसोल्डरिंग अशा विविध विषयाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय कार्यशाळेत विद्यार्थ्यांना ग्रीपरचा वापर करून जॉयस्टिक कंट्रोल पिक आणि प्लेस रोबोट बनवणेही शिकवले जाणार आहे. शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त ज्ञान आणि विज्ञानाच्या माध्यमातून मुलांची बुद्धिमत्ता अधिक विकसित व्हावी तसेच विविध प्रात्याक्षिके आणि प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांच्या कल्पकतेला चालना मिळावी अशा हेतूने रोबोट कॅम्पची रचना करण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली  ऑडिओ, व्हिडीओ आणि अ‍ॅनिमेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. तसेच प्रत्यक्ष कृतीतून कार्य करण्यावर येथे अधिक भर दिला जातो त्यामुळे मुलांच्या कल्पनाशक्तीचा विकास होण्यास मदत होते. याशिवाय संस्थेच्या कल्याण-डोंबिवली आणि ठाण्यातील अन्य भागातील रोबो लॅबमधूनही विद्यार्थ्यांना विज्ञान तंत्रज्ञानाची ओळख करून दिली जाते.

चहाचा कप नेणारा रोबो..

चाइल्ड टेक सेंटरच्या वतीने उन्हाळ्याच्या सुट्टीत एक वस्तू रिमोटच्या साहाय्याने दुसऱ्या ठिकाणी नेण्यास उपयुक्त ठरणारा रोब बनवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये चहाचा कप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकेल असा रोब बनवण्याचे प्रशिक्षण पाच दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना दिले जाते. मुलांना अत्यंत किचकट पुस्तकी भाषांमधून शिकवण्यापेक्षा अशा वैज्ञानिक वस्तूंच्या माध्यमातून प्रशिक्षण दिल्यास या क्षेत्राकडील ओढा वाढू शकेल, असे मत मुलांना विज्ञानाचे तंत्र शिकवणारे प्रशिक्षक पुरुषोत्तम पाचपांडे यांनी सांगितले. सध्या ठाणे शहराबरोबरच अनेक ग्रामीण भागांमध्येही हे प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये सौर ऊर्जेचा प्रचार , प्रसार करण्यासाठी सौर दिवे बनवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. सुट्टीच्या काळात आपण सकारात्मक करत असल्याचा आनंद या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Field of science
First published on: 14-05-2016 at 01:33 IST