ठाणे : गेल्या महिन्याभरापासून दडी मारून बसलेल्या पावसाने चार दिवसांपासून ठाणे शहरात दमदार हजेरी लावली आहे. या पहिल्याच पावसात शहरातील रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे महापालिका हद्दीतील मुंब्रा बाह्य़वळण, घोडबंदर मार्गावरील सेवारस्ते, मुंब्रा-शीळ, दिवा-आगासन, दिवा- साबे या प्रमुख रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहे. खड्डय़ांमुळे वाहनांचा वेग कमी होत असून पावसात वाहनांच्या रांगा लागत आहेत.

करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या टाळेबंदीमुळे यंदा पावसाळ्यापूर्वी ठाणे महापालिका प्रशासन आणि राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे ठाणे शहरातील मुख्य रस्त्यांसह सेवारस्त्यांची कामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा होती. करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये व्यग्र असलेल्या ठाणे महापालिकांसह राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांतर्फे रस्त्याच्या कामांकडे दुर्लक्ष झाल्याने पहिल्याच पावसामुळे शहरातील रस्त्यांवर खड्डे पसरले आहेत.

मुंब्रा बाह्य़वळण मार्गाची दोन वर्षांपूर्वी कोटय़वधी रुपये खर्चून दुरुस्ती करण्यात आली होती. असे असताना पहिल्याच पावसात या मार्गाच्या मुंब्रा येथील उड्डाणपुलाच्या सुरुवातीला मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत, तर पुलावरील रस्ता उंच सखल झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहनांचा वेग मंदावत आहे. मुंब्रा ते शिळफाटा या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्याचे काम मुंब्य्रातील काही भागांमध्ये रखडले असूून त्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहे. या खड्डय़ांमध्ये पावसाचे पाणी साठत असल्याने वाहन चालकांना खड्डय़ाच्या अंदाज येणे कठीण जात असल्याची माहिती वाहनचालक मोमीन शेख यांनी दिली.

पालिका प्रशासनातर्फे घोडबंदर येथील सेवारस्ते, दिवा परिसरातील आगासन रस्ता आणि साबे गाव रस्ता या ठिकाणी मलनि:सारण वाहिन्या टाकण्याची कामे हाती घेण्यात आली होती. या कामांसाठी हे रस्ते खोदण्यात आले होते. या भागातील अनेक ठिकाणी रस्ते बुजवण्यात आले नसल्यामुळे रस्त्यांवरील रेती वाहून गेली आहे. त्यामुळे हे रस्ते खड्डेमय झाले आहे, असे दिव्यातील दीपक पाटील यांनी दिली.

कापूरबावडीत मोठा खड्डा

कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या समोरील बाजूस असणाऱ्या हुतामाकी कंपनीच्या बाजूला असलेल्या पुलाजवळ तीन ते चार फुटांचा खड्डा पडला आहे. या खड्डय़ाच्या ठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याने वेगात येणाऱ्या वाहनांचा खड्डय़ाच्या अंदाज येत नाही. त्यामुळे रहदारी असलेल्या या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून हा खड्डा लवकरात लवकर बुजवावा, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.