महापालिकेतील आघाडी, युतीचे राजकारण संपुष्टात
मीरा-भाईंदर महापालिकेच्या गेल्या १५ वर्षांच्या कालखंडात सत्तेसाठी स्थापन होत असलेल्या आघाडी आणि युती यांचे राजकारण आता संपुष्टात आले आहे. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याने पहिल्यांदाच महानगरपालिकेत एका पक्षाची सत्ता स्थापन होत आहे.
मीरा-भाईंदर महापालिकेची स्थापना झाल्यानंतर शहरावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचेच वर्चस्व होते. हे दोन्ही पक्षांनी निवडणुकीच्या आधी अधिकृतपणे आघाडी केली नसली तरी सत्ता स्थापनेसाठीच्या अपरिहार्यतेतून दोन्ही पक्ष एकत्र आले होते. भाजप आणि शिवसेनेने मात्र निवडणुकीआधी युती केली होती. मात्र महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच चारही प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे लढूनही भाजपला एकहाती सत्ता स्थापन करण्या इतपत यश मिळाले आहे. त्यामुळे महाापलिकेत सत्तास्थानी एकच पक्ष असणार आहे.
२००२ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांविरोधात लढले, मात्र निवडणुकीनंतर एकत्र आले. त्यावेळी राष्ट्रवादीचा महापौर आणि काँग्रेसचा उपमहापौर निवडला गेला. २००७ मध्ये वेगळीच परिस्थिती होती. त्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युती तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात होते. या तिरंगी लढतीत सर्वाधिक जागा काँग्रेसने जिंकल्या, परंतु सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला अवघ्या काही जागाच कमी पडल्या. त्यावेळी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेने एकत्र येऊन अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी अपक्ष नगरसेवक नरेंद्र मेहता यांना महापौरपदाचा लाभ झाला होता.
२०१२च्या निवडणुकीतही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात विळ्याभोपळ्याचे नाते असताना केवळ सत्तेसाठी हे दोन पक्ष एकत्र आले. त्यावेळी भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष असतानाही बहुजन विकास आघाडी आणि अपक्षांच्या साथीने काँग्रेस आघाडीने सत्ता स्थापन केली. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कॅटलीन परेरा महापौर झाल्या आणि काँग्रेसच्या नुरजहा हुसेन उपमहापौर झाल्या. पुढच्या अडीच वर्षांच्या काळात झालेल्या राजकीय घडामोडींमुळे महापालिकेच्या शेवटच्या अडीच वर्षांच्या कालावधीसाठी सत्तेची सूत्रे भाजप आणि शिवसेना युतीच्या हाती आली. त्यामुळे आतापर्यंत महापालिकेचे संपूर्ण राजकारण आघाडी आणि युती भोवतीच घुटमळत होते.
भाजप पहिला पक्ष
यंदाच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवत होते. भाजप युतीचे राजकारण बाजूला करून शतप्रतिशत भाजपाचा नारा देत ताकदीने निवडणुकीत उतरली आणि त्यात यशस्वी ठरली. त्यामुळेच भाजपला सत्ता स्थापनेसाठी आघाडी अथवा युतीच्या कुबडय़ा घेण्याची गरज उरलेली नाही. महापालिकेत एकहाती सत्ता स्थापन करणारा भाजप हा पहिला राजकीय पक्ष ठरला आहे.