ठाणे : जिल्ह्यातील ६१ गावांमध्ये करोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी पात्र असलेल्या सर्वच नागरिकांची पहिली लसमात्रा पूर्ण झाली आहे. कल्याण, मुरबाड आणि भिवंडी तालुक्यातील गावांचा यामध्ये समावेश असून सर्वाधिक गावे ही भिवंडी तालुक्यातील आहेत.  इतर गावांतील नागरिकांचेही  लसीकरण पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषदेकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांतील लसीकरणाविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेने करोना लसीकरण विशेष जनजागृती मोहीम सुरू केली होती.

यानंतर नागरिक लस घेण्यासाठी पुढे येऊ लागले होते. ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड या तालुक्यांमध्ये ४३१ गावे आहेत. यापैकी ६१ गावांमध्ये करोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी पात्र असलेल्या सर्वच नागरिकांची पहिली लसमात्रा पूर्ण झाली आहे. यामध्ये कल्याण, मुरबाड आणि भिवंडी तालुक्यातील गावांचा समावेश असून सर्वाधिक गावे भिवंडी तालुक्यातील आहेत. ठाणे ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच लस वाहिकेच्या माध्यमातून लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

ग्रामीण भागात लस लाभार्थीची संख्या १५ लाख ४ हजार ५२२ इतकी गृहीत धरण्यात आली होती. त्यापैकी १० लाख ७० हजार ९६० नागरिकांची पहिली तर, ५ लाख ५४ हजार ५२६ नागरिकांची दुसरी मात्रा पूर्ण झाली आहे. यामध्ये सुमारे दीड लाख नागरिकांनी कालावधी उलटून गेला तरी दुसरी मात्रा घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे. या नागरिकांसह पहिली मात्रा घेतली नसलेल्या नागरिकांचेही लवकरात लवकर लसीकरण व्हावे यासाठी जिल्हा परिषदेकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.  

सायंकाळी सहा ते नऊ या वेळात लसीकरण सत्र

शहापूर, मुरबाड या तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि काही निवडक प्राथमिक आरोग्य केंद्रात सायंकाळी सहा ते नऊ या वेळात लसीकरण सत्राचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी स्थानिक आरोग्य यंत्रणांना दिले आहेत. यामुळे  नोकरी, व्यवसाय आणि कामानिमित्त घराबाहेर असणाऱ्या नागरिकांना लसीकरणाची सोय होणार आहे. तसेच लस वाहिन्यांद्वारे दुर्गम भागात नागरिकांना लसीकरणासाठी अधिकाधिक प्रोत्साहित करण्याचे  आणि गरोदर मातांचे लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याकरिता दर बुधवारी त्यांच्यासाठी लसीकरणाचे सत्र आयोजित करण्याच्या सूचनाही दांगडे यांनी दिल्या आहेत.