मासेमारीसाठी केवळ महिनाभराचा अवधी

कल्पेश भोईर , लोकसत्ता

वसई : करोनाच्या संकटामुळे मागील दीड ते दोन महिन्यांपासून मच्छीमारांनी आपल्या बोटी किनाऱ्यावर नांगरून ठेवल्या होत्या. मासेमारी हे उदरनिर्वाहाचे साधन असल्याने व त्यासाठी केवळ महिनाभराचा कालावधी असल्याने अखेर चिंताग्रस्त झालेल्या मच्छीमारांनी आपल्या बोटी पुन्हा मासेमारीसाठी समुद्रात रवाना करण्यास सुरुवात केली आहे.

वसईसह इतर भागांतून मोठय़ा प्रमाणात मच्छीमार बांधव मासेमारीचा व्यवसाय करीत आहेत. दरवर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यापासून या मच्छीमारांच्या बोटी या मासेमारीसाठी समुद्रात जातात.  जवळपास ८ ते १० महिन्यांच्या कालावधीमध्ये ही मासेमारी चालते; परंतु यंदाच्या वर्षी अवकाळी पाऊस व वादळी वारे यामुळे पूर्ण हंगामच अडचणींचा गेला आहे.

अशातच करोनाच्या पार्श्वभूमीमुळे टाळेबंदीचा कालावधी वाढला आहे. मासेमारी करण्यासाठी एक महिना शिल्लक आहे. त्यातच शासनाने दिलेल्या परवानगीच्या नियम व अटीमध्ये राहून मासेमारी करणेही कठीण आहे; परंतु जर मासेमारीसाठी गेलो नाही तर पुढील येणाऱ्या महिन्यात उदरनिर्वाह कसा चालवायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.  यासाठी  चिंतेने व्याकूळ  मच्छीमारांनी मे महिन्यात ज्या काही  दोन ते तीन फेऱ्या होतील त्यासाठी आपल्या बोटी समुद्रात सोडल्या आहेत, तर काही बोटी हळूहळू मार्गक्रमणा करीत आहेत असे   दिसून येत आहे.

मासळीची आवकही घटली

दरवर्षी मच्छीमार बांधव मासेमारीच्या हंगामात  मोठय़ा प्रमाणात मासेमारी करतात. त्यांनी पकडून आणलेल्या मासळीला विविध ठिकाणच्या बाजारपेठेत,  हॉटेल व इतर ठिकाणच्या बाजारांत मोठी मागणी असते; परंतु यंदाच्या वर्षी मासेमारीसाठी पुरेसा कालावधी न मिळाल्याने बाजारात येणाऱ्या विविध प्रजातींच्या मासळीची आवक घटली आहे. त्यामुळे खवय्येमंडळींचीही निराशा झाली आहे.

उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करोनामुळे मच्छीमार बांधवांचा बहुतेक कालावधी हा घरीच बसून गेला आहे. त्यामुळे मोठे आर्थिक संकट ओढावले आहे.  पावसाळ्यात पूर्णपणे मासेमारी बंद असते. आता पावसाळ्यापूर्वीच्या मासेमारीच्या शेवटच्या महिन्यात जेमतेम दोन ते तीन फेऱ्यांसाठी समुद्रात बोटी सोडल्या आहेत. यामुळे पुढील चार महिन्यांत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच बोटीसाठी लागणारी यंत्रसामग्री व इतर खर्चही निघाला नसल्याने अनेक समस्या भेडसावत असल्याचे मच्छीमारांनी सांगितले.

करोनामुळे मोठे संकट ओढावले आहे.  मासेमारीसाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे थोडय़ाफार प्रमाणात जी काही मासळी मिळेल व त्यातून दोन पैसे हाती येतील या आशेने बोटी समुद्रात सोडत आहोत.

– एवझन कतवार, मच्छीमार