विक्रीच्या चिंतेने मच्छीमार हतबल; किरकोळ बाजार सुरू करण्यासाठी धडपड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई : करोनामुळे गर्दीवर निर्बंध आल्याने मासळी बाजार ओस पडले असून नव्या मासेमारी हंगामात बाजार सुरू न झाल्यास मासेमारी करून आणलेली मासळी विकायची कुठे, या चिंतेने मच्छीमारांना ग्रासले आहे. मच्छीमारांच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी वसई तथा भाईंदर येथील घाऊक आणि किरकोळ मासळी बाजार सुरू व्हावेत, यासाठी स्थानिक मच्छीमारांची धडपड सुरू आहे. सुरक्षेच्या उपायांचा अवलंब करून मासळी बाजार सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी मच्छीमारांकडून होत आहे.

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी गर्दीवर निर्बंध आल्यानंतर सर्वच मासळी बाजार बंद झाले आहेत. त्यामुळे मत्स्यव्यवसायाचे अर्थचक्र मंदीच्या गाळात रुतले आहे. गेल्या चार महिन्यांपासून मासेमारीसह मासळी बाजार बंद असून मच्छीमारांची आर्थिक कोंडी झाली आहे. किरकोळ मासळी विक्री करणाऱ्या कोळणींची कुटुंबाचा गाडा हाकताना प्रचंड आर्थिक ओढाताण होत आहे. आता नव्या मासेमारी हंगामाला सुरुवात होत असताना मासळी बाजार सुरू होण्याबाबत अजूनपर्यंत कोणतीही निश्चिती नसल्यामुळे मासेमारी करून आणलेली मासळी विकायची कशी, याची चिंता मच्छीमारांना लागली आहे.

वसईतील पाचूबंदर व नायगाव येथे रोज रात्री आणि भाईंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला रोज पहाटे घाऊक तसेच किरकोळ मासळी बाजार भरतात. गुजरात, डहाणू, सातपाटी, अर्नाळा, वसई, उत्तन, गोराई, मनोरी इत्यादी ठिकाणच्या बोटींची मासळी या बाजारांमध्ये विक्रीकरिता येत असते. या वेळी मोठी आर्थिक उलाढाल होते. मात्र, हे तिन्ही बाजार बंद असल्यामुळे पालघर आणि ठाणे जिल्ह्यतील मच्छीमारांपुढील मासळी विक्रीची चिंता वाढली आहे. मच्छीमारांनी स्थानिक बाजार सुरू केले तरी गर्दी झाल्यास प्रशासनाकडून कारवाई होऊन पुन्हा बाजार बंद पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, बेरोजगारीची ही स्थिती अजून काही दिवस राहिल्यास मच्छीमारांमध्ये अक्षरश: उद्रेक निर्माण होईल, असे अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे कार्याध्यक्ष बर्नड डिमेलो यांनी सांगितले.

परवानगीची बाब प्रशासनाच्या विचाराधीन

भाईंदर येथील मासळी बाजार आठवडय़ाचे सातही दिवस सुरू करण्यास परवानगी मिळावी, यासाठी उत्तन येथील कोळणींची मंगळवारी मीरा-भाईंदर महापालिका आयुक्तांच्या दालनात सभा झाली. या वेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, नगरसेविका शर्मिला बगाजी यांच्यासह किरकोळ मासळी विक्री करणा?ऱ्या कोळी महिला उपस्थित होत्या. कोळणींनी त्यांची कैफियत आयुक्त तथा लोकप्रतिनिधींसमोर मांडली. करोनामुळे निर्बंध असल्यामुळे मच्छीमारांची अॅण्टीजेन चाचणी करून त्यांना बाजारात बसण्याची परवानगी देण्याची बाब प्रशासनाच्या विचाराधीन असल्याचे समजते.

मासळी बाजार दिवसभर सुरू नसतो. या बाजाराची ठरावीक वेळ असते. आता तर संपूर्ण दिवस चालणारे भाजीबाजार, मॉल्स यांना परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या उपायांचा अवलंब करून शासनाने मासळी बाजारही सुरू करावेत.

– माल्कम कासुघर, मच्छीमार उत्तन

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fishermen struggling to start wholesale and retail fish markets in vasai and bhayander zws
First published on: 13-08-2020 at 00:16 IST