कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या हद्दीत येणारी वडवली, अंतर्ली, शिरढोण, खोणी, दामटण या गावांनी नगरपालिकेत समाविष्ट होण्याची तयारी सुरू केली आहे. सर्वपक्षीय ग्रामीण संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन २७ गावांमध्ये सहभागी होण्याची इच्छा पाच गावच्या ग्रामस्थांनी व्यक्त केली.
भौगोलिकदृष्टय़ा २७ गावांच्या वेशीवर असलेली ही गावे ठाणे जिल्हा परिषदेअंतर्गत येतात. या गावांना कोणत्याही नागरी सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थांनी २७ गावांच्या नगरपालिकेत समाविष्ट होण्याची तयारी केली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या वेळी या पाच गावांना सोय म्हणून टिटवाळा, घोटसई या गण, गटांमध्ये समाविष्ट केले जाते. त्यामुळे वर्षांनुवर्षे टिटवाळा परिसरातील लोकप्रतिनिधीला या पाच गावांमधील लोकांना मतदान करावे लागते. शिवाय एकदा निवडून गेलेला जिल्हा परिषद, पंचायत समितीचा लोकप्रतिनिधी या भागात तोंड दाखवायला येत नाही, अशी या ग्रामस्थांची तक्रार आहे,  असे संघर्ष समितीचे गुलाब वझे, चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

‘संघर्ष समितीशी चर्चा करा’
२७ गावांचा महापालिकेत समाविष्ट होण्यास विरोध आहे. अनेक नगरसेवकांनी ही गावे पालिकेत नको म्हणून शासनाकडे पत्रे पाठवली आहेत. शासनाने गावे पालिकेत समाविष्ट होण्याचा निर्णय लादून त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करू नये. संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकावे, अशी मागणी आमदार संजय दत्त यांनी शासनाकडे केली. शासनाने हा निर्णय सामोपचाराने घ्यावा, असेही ते म्हणाले.