वसई बुडणार नसल्याचा पालिकेचा दावा फोल; पावसाच्या विश्रांतीनंतरही पाण्याचा वेढा
कल्पेश भोईर, वसई
वसई बुडणार नसल्याचा पालिका प्रशासनाचा दावा सपशेल खोटा ठरला असून सलग दुसऱ्या दिवशी वसई जलमय झाली आहे. मंगळवारी दुपारी पावसाचा जोर ओसरल्यानंतरही अनेक भागातील पाणी तुंबले असल्याने नागरिकांचे अक्षरश: हाल झाले.
सलग पडणाऱ्या पावसामुळे वसईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वसई, नालासोपारा, विरार शहरे पाण्याखाली गेली आहेत. नागरिकांच्या घरात, दुकानात, औद्योगिक वसाहतीमध्ये पाणी घुसले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी राहणाऱ्यांचे हाल झाले आहेत. विरार भागात असलेले आगाशी, पुरापाडा, बोळिंज, फुलपाडा, चंदनसार, तर नालासोपरा धानीवबाग, तुळिंज रोड, संतोष भवन परिसर, आचोळे, एसटी बस आगार व इतर परिसर, वसईतील दिवाणमान, माणिकपूर, सनसिटी, चुळणे, भोयदापाडा, एव्हरशाइन, मिठागर वस्ती, सातिवली यासह इतर भागात मोठय़ा प्रमाणात पाणी भरले आहे. या गेलेल्या पाण्यामुळे नागरिकांच्या मालमत्तेचे त्याच बरोबर इतर काही वस्तूंचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
यामुळे मागील वर्षी झालेली स्थिती पुन्हा एकदा निर्माण झाली असल्याने पालिका प्रशासनाच्या विविध यंत्रणा व कर्मचारी पाण्याचा निचरा व्हावा यासाठी कामाला लागल्या आहेत.
मागील वर्षी झालेल्या पुरस्थितीचा अनुभव वसई विरारच्या जनतेला येऊ लागल्याने नागरिकांनी आता महापालिकेच्या उपाययोजनेवरच प्रश्न उपस्थित केले आहे. पालिकेच्या वतीने शहरात पूरस्थिती निर्माण होऊ नये व यासाठी नालेसफाई व विविध प्रकारच्या उपाययोजना करण्याची कामे हाती घेतली होती. तसेच निरी व आयआयटीसारख्या नामांकित कंपन्यांकडून शहराचे सर्वेक्षण करून उपाययोजना करण्यासाठीचा अहवाल पालिकेला सादर करण्यात आला होता, त्यानुसार कोटय़वधी रुपये खर्च करून महानगरपालिका प्रशासनाने उपाययोजना केल्या होत्या, तरी देखील वसई विरार परिसर पाण्याखाली गेला असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पाण्याने वेढा दिल्याने अनेकांना दुसऱ्या दिवशीही रोजगार बुडवावा लागला.
शहरातील वाहतूक सेवा ठप्प
दमदार पावसामुळे वसई विरार भागातील बहुतेक भागात पाणी साचले असल्याने शहरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. यामुळे या भागातील वाहतूक सेवा ठप्प झाली असल्याचे चित्र दिसून आले आहे. पावसाच्या पाण्यामुळे शहरात वाहतूक सेवा पुरविणाऱ्या परिवहन विभागाच्या बसेस, रिक्षा, एसटी महामंडळाच्या बसेसही ठप्प झाल्या आहेत. परिवहन विभागाच्या बसेस विरार पश्चिम, नालासोपारा पश्चिम, वसई पूर्व या भागात सेवा देणाऱ्या बसेस पाणी साचल्याने काही भागात बंद ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती परिवहन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. परिवहन विभागाच्या १४० बसेस विविध मार्गावर कार्यरत आहेत.
वीज उपकेंद्रात पाणी
वसई पूर्वेतील नवघर माणिकपूर भागात महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषणचे २२० केव्ही व १०० केव्हीच्या उपकेंद्राच्या आजूबाजूच्या परिसरात पाणी साचले असून अजून मोठय़ा प्रमाणात पाणी गेल्यास या केंद्रात पाणी जाऊन शहरातील वीजपुरवठा बंद होण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे. मागील वर्षी हेच उपकेंद्र संपूर्ण पाण्याखाली गेले होते. त्यामुळे वसईतील वीजपुरवठा तीन ते चार दिवस पूर्णपणे बंद होता. त्यामुळे विजेविना या भागातील नागरिकांचे हाल झाले होते.
नालेसफाईचा दावा फोल
कोटय़वधी रुपये खर्च करून शहरातील महत्त्वाचे नाले, खाडय़ा, गटारे यांची स्वच्छता करण्यात आली होती. व पाणी जाण्याचे नैसर्गिक मार्ग खुले करण्यात आले होते. त्यामुळे शहरात पाणी साचणार नाही असा दावा पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आला होता. पंरतु मुसळधार झालेल्या पावसामुळे वसई विरारचा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेल्याने पालिकेने केलेला नालेसफाईचा दावा खोटा ठरल्याचे स्पष्ट झाले.
पावसाची आकडेवारी
मांडवी – २२० मिमी
आगाशी – २४० मिमी
निर्मळ – २०८ मिमी
विरार – ३२७ मिमी
माणिकपूर- ३०५ मिमी
वसई – ३७७ मिमी
एकूण – १४६९ मिमी
सरासरी २७९.५ मिमी