भाग्यश्री प्रधान

ठाणे स्थानकाबाहेर दररोज रात्री व्यवसाय; खाद्यपदार्थाच्या गाडय़ांमुळे प्रवाशांची कोंडी

मुंबईतील एल्फिन्स्टन रोड स्थानकातील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटरच्या परिघात फेरीवाल्यांना बंदी करण्यात आली. मात्र ही मर्यादारेषा कधीच ओलांडणाऱ्या ठाणे स्थानकाबाहेरील खाद्यविक्रेत्यांनी आता थेट फलाटाच्या भागावरच आपल्या गाडय़ा लावण्यास सुरुवात केली आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडय़ांतून रात्री उशिरा ठाणे स्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी काही विक्रेत्यांनी फलाट क्रमांक एकपासून तिकीट घरापर्यंत आपले बस्तान मांडले आहे. स्थानकाबाहेरही खाद्यपदार्थाच्या गाडय़ांची गर्दी होत असल्याने दिवसा गर्दीने वेढलेल्या या स्थानकातून आता रात्री वाट काढणेही कठीण होऊ लागले आहे.

रेल्वे स्थानक परिसरातील चेंगराचेंगरीसारख्या घटना घडू नयेत, याकरिता मुंबई न्यायालयाने स्थानक परिसरापासून दीडशे मीटपर्यंत फेरीवाल्यांना मज्जाव करण्याचे आदेश गेल्या वर्षी दिले. पालिकेने दीडशे मीटर अंतरावर मर्यादारेषाही आखली. मात्र काही महिन्यांतच ही मर्यादारेषा ओलांडून फेरीवाले स्थानक परिसरात व्यवसाय करू लागले आहेत. खाद्यविक्रेत्यांनी स्थानकाच्या दारातच आपले ठेले मांडल्याने येथून मार्गक्रमण करणे प्रवाशांना अडचणीचे ठरू लागले आहे. असे असतानाच रात्री ११ नंतर हे खाद्यविक्रेते फलाटापर्यंत जाऊन व्यवसाय करू लागले आहेत.

अंडा भुर्जी-पाव, पोहे, चहा-कॉफी या पदार्थाचे ठेले लावून हे फेरीवाले बसलेले असतात. काही फेरीवाल्यांकडे रोजंदारीवर काम करणारे कामगार फलाटावर उभे राहून प्रवाशांना हाका मारत असतात. ठाणे पूर्व आणि पश्चिम येथील तिकीट घरही हे फेरीवाले रात्री काबीज करीत असून फलाट क्रमांक  एकच्या पायथ्याशीच त्यांनी ठेले मांडले आहेत. लांब पल्ल्याच्या गाडय़ांतून येणाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी आपला ठेला सर्वात पुढे असावा अशा प्रकारची चढाओढही फेरीवाल्यांमध्ये लागलेली दिसते. गॅसशेगडय़ांचा वापर या गाडय़ांवर सर्रासपणे होत असून यातून एखादी दुर्घटना घडण्याचीही भीती व्यक्त होत आहे.

रात्री तीनपर्यंत गर्दी

रात्री उशिरापर्यंत फिरणाऱ्या तरुण टोळक्यांसाठी खाद्यपदार्थाची ही दुकाने उदरभरणासाठी उपयुक्त ठरू लागली आहेत. त्यामुळे मध्यरात्रीनंतर अनेक तरुण मुले स्थानकाबाहेर लागणाऱ्या या गाडय़ांवर येऊन खाद्यपदार्थ खात असतात. रात्री अकरानंतर साधारण तीन वाजेपर्यंत स्थानक परिसरात हा ‘खाद्यकल्लोळ’ सुरू असतो. एकीकडे खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या आरोळ्या, शेगडीचा धगधगता आवाज आणि तरुणांची गर्दी यामुळे मध्यरात्री स्थानक परिसर गोंगाटामुळे दणाणून जातो.

ठाणे स्थानकाच्या परिसरात अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर महापालिकेतर्फे सतत कारवाई सुरू असते. रात्री बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पथक नेमण्यात येईल.

– संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका

एक दिवसाआड येथे कारवाई करतो. कारवाईला सुरुवात केली की हे फेरीवाले पालिका हद्दीत पळतात. करवाई करणे अवघड जाते. मात्र रात्री ठेला मांडून बसणाऱ्या फेरीवाल्यांची पाहणी करून येथे कारवाई करण्यात येईल.

– सुरेश नायर, व्यवस्थापकीय संचालक, ठाणे रेल्वे स्थानक