ठाणे तसेच आसपासच्या शहरातील बेपत्ता मुलांचा शोध घेऊन त्यांना पालकांपर्यंत पोहचविण्यासाठी ठाणे पोलिसांनी ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे बाल संरक्षण विभागामार्फत संपूर्ण आयुक्तालय क्षेत्रात ही मोहीम महिनाभर राबविण्यात येणार असून या मोहिमेसाठी बेपत्ता मुलांची यादी तयार करण्यात येत आहे. या यादीच्या आधारे त्या मुलांचा शोध घेण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येक पोलीास ठाण्यात विशेष पथक तयार करण्यात आले आहे. याशिवाय, या मोहिमेत बालगृहे, आश्रमशाळा तसेच बालमजुरी करणाऱ्या मुलांच्या पालकांचा शोध घेण्यात येणार आहे.
केंद्र शासनाच्या गृहविभागाने बेपत्ता मुलांच्या शोधाकरिता राज्यभरात ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, ठाणे पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली असून १ ते ३१ जुलै या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनिटमार्फत ‘ऑपरेशन मुस्कान’ राबविण्यात येणार आहे. या पाश्र्वभूमीवर पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी नुकतीच सर्वच पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बैठक घेऊन त्यांना ‘ऑपरेशन मुस्कान’ राबविण्याकरिता सुचना केल्या आहेत. ठाणे चाईल्ड प्रोटेक्शन युनिट आणि पोलीस ठाण्यात नेमलेल्या पथकांमार्फत १८ वयोगटापर्यंत बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध घेण्यात येणार असून या मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. तसेच बालगृहे, शासकीय संस्था आणि खासगी संस्था आदी ठिकाणी असणाऱ्या मुलांच्या पालकांचा शोध घेण्यासाठी पथकामार्फत प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठी सामाजिक संस्था आणि बाल कल्याण समिती सदस्यांची मदत घेण्यात येणार आहे, अशी माहिती चाईल्ड प्रोटेक्शन युनीटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी दिली.
ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर आदी शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये बेपत्ता असलेल्या मुलांची यादी तयार करण्यात येत असून त्याआधारे विशेष पथकांमार्फत बेपत्ता मुलांचा शोध सुरू करण्यात आला आहे. या मोहिमेत बेपत्ता मुलांचा शोध लागला तर त्याचे समुपदेशन करण्यात येणार आहे. तसेच मुलींवर लैंगिक अत्याचार झाला आहे का, याचीही चौकशी करण्यात येणार असून असा काही प्रकार असेल तर संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असेही मदन बल्लाळ यांनी सांगितले.