कडोंमपाच्या मुख्य प्रवेशद्वारासह अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर तपासणी; ४ यंत्रांची खरेदी
कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासह मुख्य अधिकारी, पदाधिकारी बसत असलेल्या दरवाजांवर धातुशोधक यंत्र बसविण्याचा निर्णय घेतला आहे. विविध प्रकारचे अभ्यागत कामे घेऊन येतात. सुरक्षेचा भाग विचारात घेऊन, धातुशोधक यंत्र बसविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
महापालिकेतील १२२ नगरसेवकांपैकी सुमारे ४० ते ५० नगरसेवकांकडे परवानाधारी रिव्हॉल्व्हर आहेत. अनेक नगरसेवक सर्वसाधारण प्रवेश करताना सुरक्षा रक्षकांना दटावून त्यांच्या दालनात रिव्हॉल्व्हर देण्यास टाळाटाळ करतात. असे प्रकार यापूर्वी घडले आहेत. शहरी भागाबरोबर २७ गावांमधून नगरसेवक पालिकेत येणार आहेत. बेकायदा बांधकामे, बेकायदा बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या नगरसेवकांची पदे रद्द करण्याची प्रक्रिया पालिकेत सुरू आहे. काहींची पदे रद्द करण्यात आली आहेत. ही पदे काही अधिकाऱ्यांमुळे गेली असल्याचा राग काही आजी, माजी नगरसेवकांमध्ये आहे. या सगळ्या वातावरणाचा विचार करून प्रशासनाने तीन कोटी १० लाख रुपये खर्च करून चार धातुशोधक यंत्रे खरेदी केली आहेत.
दोन धातुशोधक यंत्रे पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर, दुसऱ्या माळ्यावर, प्रशासकीय इमारतीच्या मुख्य व चौथ्या माळ्यावर बसविण्यात येणार आहेत. मुख्य प्रवेशद्वारावर नगरसेवकांच्या वाहनांना तपासणीसाठी रांग लावण्यास लागू नये म्हणून नगरसेवकांना ‘स्मार्ट वाहन पास’ देण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे विशिष्ट वाहनाची ओळख पटविणे शक्य होणार आहे. ठाण्याची स्मार्ट टच संस्था ही प्रणाली पालिकेला उपलब्ध करून देणार आहे. या प्रणालीसाठी पालिका एक लाख ८७ हजार रुपये मोजणार आहे.
((( कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या प्रवेशद्वारावर धातुशोधक यंत्र बसविण्यात आले. ))
संग्रहित लेख, दिनांक 31st Dec 2015 रोजी प्रकाशित
अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी धातुशोधक यंत्रे
महापालिकेतील १२२ नगरसेवकांपैकी सुमारे ४० ते ५० नगरसेवकांकडे परवानाधारी रिव्हॉल्व्हर आहेत.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 31-12-2015 at 03:05 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: For the safety of officers metal detector deceived