स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात आलेले गावदेवी भुमिगत वाहनतळावरील मैदान ऑक्टोबर अखेरपर्यंत वापरण्यायोग्य करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिलेले असतानाही हे काम अद्याप रेंगाळलेलेच असल्याचा आरोप भाजपच्या स्थानिक माजी नगरसेवकांनी केला आहे. तसेच वाहनतळाची निर्मिती करताना मैदानाचे क्षेत्रफळ पूर्वीपेक्षा कमी झाले असुन हे मैदान पुर्ववत केल्याशिवाय वाहनतळाचे लोकार्पण करू देणार नसल्याचा इशाराही देत यासंदर्भात लवकरच पालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ठाणे येथील गावदेवी मैदानात स्मार्ट सिटी योजनेतून भूमिगत वाहनतळ उभारण्यात आले आहे.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील सारथी फायनान्स संस्थेच्या अधिकाऱ्याकडून ४० कर्जदारांची फसवणूक

गावदेवी मैदानाची व्याप्ती ५६९० चौरस मीटर एवढी आहे. त्यापैकी, ४३१० चौ. मी जागेवर वाहनतळाचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यात, १३० चारचाकी आणि १२० दुचाकी वाहने उभी करण्याची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. जानेवारी २०१९ मध्ये या प्रकल्पाचे काम पुर्णत्वास आले असून या प्रकल्पासाठी ३० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. दोन वर्षात पुर्ण होणारा हा प्रकल्प करोनामुळे तब्बल चार वर्षे लांबल्याने ठाणेकर हक्काच्या मैदानापासुन वंचित राहिले आहेत. मध्यंतरी तत्कालीन महापालिका आयुक्त डाॅ. विपीन शर्मा यांनी या प्रकल्पाची पाहणी केली होती. त्यावेळी बांधकाम, रंगकाम, वाहनतळावरील आप्तकालीन मार्ग, अग्निशमन यंत्रणा, आप्तकालीन यंत्रणा, प्रवासी आणि वाहनांची लिफ्ट, वायूवीजन सुविधा याबाबत निर्देश देऊन त्यांनी ऑक्टोबर अखेरपर्यंत वाहनतळावरील मैदान नागरिकांना वापरण्यायोग्य उपलब्ध करण्याचे निर्देश दिले होते. परंतु ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे मैदानाचे काम संथगतीने सुरु असल्याने भाजपचे स्थानिक माजी नगरसेवक सुनेश जोशी, मृणाल पेंडसे आणि प्रतिभा राजेश मढवी यांनी मंगळवारी मैदानाची पाहणी केली.

हेही वाचा >>> ठाणे : कशेळी खाडी पुलावर माती आणि रेतीच्या ढिगाऱ्यांमुळे अपघातांची भिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मैदान पूर्ववत केल्यानंतरच वाहनतळ सुरु करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे. या प्रकल्पामुळे मैदान पूर्वीपेक्षा छोटे झाले असून ठेकेदाराला ९० टक्के देयकही अदा करून झाले आहे. एकीकडे निधी नाही म्हणता मग, या ठेकेदाराला देयक का दिले, असा प्रश्न उपस्थित करत प्रकल्पाला दिड वर्ष उशीर झाल्याने ठेकेदाराला दंड ठोठावण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. या परिसरातील भूमिगत वाहनतळासह तिन्ही पार्किग सुरु झाल्यानंतर वाहनांची गर्दी वाढणार असल्याने त्याबाबतचे काय नियोजन केले आहे, असा सवालही सुनेश जोशी यांनी केला आहे.