राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाचे पालन करण्याचे आदेश

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली ‘एमआयडीसी’तील मिलापनगर भागातील (आजदे) तलावात गणपती विसर्जन करण्यात येऊ नये. यासंदर्भात पुण्याच्या राष्ट्रीय हरित लवादाने ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा’ने तयार केलेल्या नियमावलीचा अवलंब करावा आणि नैसर्गिक स्रोतांची हानी होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत.

१७ वर्षांपूर्वी दिवंगत खासदार प्रकाश परांजपे यांच्या खासदार निधीतून माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे यांनी मिलापनगरमध्ये या तलावाची बांधणी केली होती. वीस ते तीस मीटर खोल हा तलाव आहे. या तलावात माशांची वाढ होते. आजूबाजूला झाडे असल्याने पक्ष्यांना पाण्याचे साधन तयार झाले होते. या तलावात परिसरातील रहिवाशांनी गणपतीचे विसर्जन सुरू केले आणि तलाव जलप्रदूषणाच्या विळख्यात अडकला. गणपती व अन्य दिवशी होणाऱ्या पूजांचे निर्माल्य, देवघर तलावात आणून टाकण्यात येतात. गणेशोत्सव काळात सुमारे एक हजाराहून अधिक मूर्तीचे तलावात विसर्जन होते. बहुतांशी मूर्ती प्लॉस्टर ऑफ पॅरिसच्या असल्याने पाण्यामध्ये विरघळून त्या तलावातील नैसíगक पाण्याचे झरे बंद पडले आहेत. जलप्रदूषणाचा माशांवरही परिणाम झाला आहे.

यासंदर्भात ‘डोंबिवली वेल्फेअर असोसिएशन’ने राष्ट्रीय हरित लवादाकडे दावा दाखल करून या तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन थांबवावे, अशी मागणी केली होती. मिलापनगरमधील तलावात गणपती विसर्जन करण्यात येत असल्याने नैसर्गिक स्रोत बंद होत आहेत. जलप्रदूषण वाढत आहे. त्यामुळे येथे गणपती, गौरीच्या मूर्ती विसर्जनाला मनाई करण्याची मागणी केली होती.

मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजानन कब्दुले यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक घेऊन राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाप्रमाणे मिलापनगरमधील तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन करू नये, तसेच कृत्रिम तलावांचा वापर करावा, अशा सूचना मंडळांना केल्या आहेत.

मिलापनगर येथील तलाव म्हणजे गणपती विसर्जनानंतर निर्माल्य व अन्य कचरा टाकण्याचे साधन झाले होते. या आदेशामुळे तलाव अबाधित राहील.

वर्षां महाडिक, डोंबिवली वेल्फेअर असोसिएशन

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh chaturthi 2017 midc lake dombivli ganpati visarjan
First published on: 24-08-2017 at 03:04 IST