कचऱ्यांनी भरलेल्या प्लास्टिक पिशव्या, कचऱ्याचा आणि चिखलाचा गाळ, तुटलेल्या संरक्षण भिंतीमुळे तलावाच्या आजूबाजूला होणारे अतिक्रमण यामुळे बुजण्याच्या मार्गावर असलेल्या कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी परिसरातील तलावाच्या दुर्दशेबद्दलचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची तातडीने दखल घेत कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने त्याच्या सुशोभीकरण केले आहे. सुमारे ५५ लाख रुपये खर्चून या ठिकाणी संरक्षण भिंत, विद्युत सुशोभीकरण, पाण्याची स्वच्छता आणि निर्माल्य टाकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळ पुना लिंक रोडलगतच गणेश विसर्जन तलाव आहे. महापालिकेने काही वर्षांपूर्वी काठ बांधल्यामुळे हा लहान तलाव काही अंशी तग धरून होता. मात्र पुढील पाच वर्षांमध्ये या तलावाची देखभाल दुरुस्ती केली गेली नसल्यामुळे हा तलाव कचऱ्याच्या विळख्यात सापडू लागला होता. वर्षांनुवर्षे गणेश मूर्तीचे विसर्जन केल्याने हा तलाव गाळाने भरला. शिवाय परिसरातील नागरिक निर्माल्य टाकण्यासाठी या तलावाचा वापर करून लागल्याने तलावाच्या दुर्दशेत भर पडली होती. याबाबत लोकसत्तामध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिकेने या तलावाच्या पुनर्जीवनाचे काम हाती घेतले. या कामासाठी ५५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. बांधकाम विभाग आणि विद्युत विभागाच्या वतीने या तलावामध्ये काम करण्यात आले.तलावातील गाळ काढून त्याच्या संरक्षण भिंती पुन्हा उभारण्यात आल्या आहे. आवश्यक ठिकाणी संरक्षण जाळ्या बसवण्यात आल्या असून तलावाच्या आजूबाजूला विद्युत विभागाच्या वतीने आकर्षक दिवे लावण्यात आले. तलावाच्या मध्यभागी रंगीत दिव्यांची उधळण करणारे कारंजे बसवण्यात आले आहे. या तलावाच्या संरक्षण भिंतीना रंग दिल्यानंतर आणि काही अपूर्ण कामे पूर्ण केल्यानंतर या तलावाचे उद्घाटन करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या बांधकाम विभागातील अभियंत्यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 14th Aug 2015 रोजी प्रकाशित
विठ्ठलवाडीतील गणेश विसर्जन तलावाचे महापालिकेकडून सुशोभीकरण
कचऱ्यांनी भरलेल्या प्लास्टिक पिशव्या, कचऱ्याचा आणि चिखलाचा गाळ, तुटलेल्या संरक्षण भिंतीमुळे तलावाच्या आजूबाजूला होणारे अतिक्रमण यामुळे बुजण्याच्या मार्गावर ...

First published on: 14-08-2015 at 02:22 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh immersion pond beautification municipal corporation