scorecardresearch

पोलीस असल्याची बतावणी करून खंडणी उकळणारी टोळी अटकेत

संजय म्हात्रे (४५). कैलास पतंगे (३०), निखील जोशी (२६), इम्रान शेख (४०) आणि सागर चिंचोळे (२६) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत.

extortionists arrested thane
पोलीस असल्याची बतावणी करून खंडणी उकळणारी टोळी अटकेत (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

ठाणे : पोलीस असल्याची बतावणी करून खंडणी उकळणाऱ्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. संजय म्हात्रे (४५). कैलास पतंगे (३०), निखील जोशी (२६), इम्रान शेख (४०) आणि सागर चिंचोळे (२६) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून दोन मोटार, मुंबई पोलीस दलाचे बनावट ओळखपत्र, पोलीस लिहिलेली पाटी, लाठ्या, पोलिसांच्या टोप्या, खंडणीतील रकमेपैकी ४० हजार ५०० रुपये, असा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील संजय, कैलास आणि इम्रान हे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

भिवंडीत राहणारे ४० वर्षीय व्यवसायिक हे २७ जानेवारीला रात्री १०.३० वाजता दुचाकीने घरी जात होते. त्याचवेळी पाच जणांनी त्यांना अडवून आपण पोलीस असल्याची बतावणी केली. त्यानंतर त्यांनी व्यवसायिकाला मारहाण करून एका मोटारीतून नवी मुंबई येथे नेले. तिथे त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. तसेच ते टाळण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडून १० लाख रुपयांची खंडणी मागितली. व्यावसायिकाने त्यांना दोन लाख रुपये देऊन स्वत:ची सुटका केली. त्यानंतरही व्यावसायिकाला पुन्हा तीन लाख रुपयांसाठी त्यांच्याकडून धमकावण्यात येत होते. दरम्यान, याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर याप्रकरणाचा संमातर तपास खंडणी विरोधी पथकाकडून सुरू होता.

हेही वाचा – ठाणे:ऑडी मालकाकडून श्वानाची हत्या

हेही वाचा – कल्याण : यंत्रयुगात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी वाचन कट्टे महत्वाचे, आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांचे प्रतिपादन

पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे संजय, कैलास, निखील आणि सागर या चौघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना ११ फेब्रुवारीला पोलिसांनी अटक केली. दरम्यान, यातील त्यांचा साथिदार इम्रान याचाही पोलिसांनी शोध घेऊन त्याला शुक्रवारी अटक केली. या पाचही आरोपींकडून पोलिसांनी दोन मोटार, मुंबई पोलीस दलाचे बनावट ओळखपत्र, पोलीस लिहिलेली पाटी, लाठ्या, पोलिसांच्या टोप्या, खंडणीतील रकमेपैकी ४० हजार ५०० रुपये असा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींपैकी संजय याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात सात, कैलास आणि इम्रानविरोधात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-02-2023 at 17:48 IST