गावदेवी मंदिर उद्यान, डोंबिवली (पूर्व)

मानवी जीवनाला प्रवासाची उपमा दिली जाते. आयुष्यभर माणसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात-येत असतात. हिंडता फिरता माणूस धट्टाकट्टा असतो, असे आपल्याकडे पूर्वापार सांगितले जाते. त्यावर आता वैद्यकीय तज्ज्ञांनीही शिक्कामोर्तब केले आहे. रक्तदाब, मधुमेह आदी आजार आटोक्यात ठेवण्यासाठी रुग्णांना नियमितपणे चालण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे हल्ली मॉर्निग वॉक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

डोंबिवली पूर्व विभागातील गावदेवी मंदिर उद्यान परिसरात अनेक जण नियमितपणे मॉर्निग वॉक करण्यासाठी येत असतात. आपले वय आणि तब्येतीनुसार व्यायमाचे प्रकार करताना दिसतात. या मैदानात एक विरंगुळा कट्टाही तयार करण्यात आला आहे. त्यामुळे फारशी घाई नसणारे इथे व्यायामानंतर काही काळ आराम करतात. उद्यानात गोलाकार पेव्हर ब्लॉक बसवले आहेत. मात्र त्यातील अनेक ब्लॉक आता निखळले असल्याने त्यावरून चालताना त्रास होतो. या ठिकाणी पाय अडकून पडण्याचीही भीती वाटत असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. येथे सकाळी चालायला येणाऱ्या नागरिकांनी उद्यानात अनेक प्रकारची झाडे लावली आहेत. त्यामुळे रामप्रहरी येथे खूपच प्रसन्न वाटते. या उद्यानात व्यायाम करण्यासाठी कोणतीही खास साधनसामग्री नाही. काही जण येथे बॅटमिंटन खेळतात. विशेष म्हणजे अगदी सत्तर वर्षांचे गृहस्थही २५ वर्षांच्या तरुणाला लाजवेल, अशा उत्साहात येथे बॅटमिंटन खेळताना दिसतात. मात्र या मैदानात बॅटमिंटन खेळासाठी हवी तशी जागा नाही. उद्यान मोठे असून बरीच जागा अशीच पडून आहे. त्यामुळे त्या जागेचा चांगला वापर करता येऊ शकतो. सकाळीच नव्हे तर सायंकाळीही येथे अनेक जण खेळायला येतात. उद्यानात गाणी ऐकण्याची सोय केली आहे. मात्र गाणी फक्त संध्याकाळी लावली जातात. सकाळी नाही. सध्या पावसाळा असल्यामुळे तर ही संगीत व्यवस्था बंदच आहे. पावसाळ्यात उद्यानात कधी कधी साप निघत असल्यानेही अनेकांना भीती वाटते. या उद्यानालगतच एक नाला असून त्यावर कोणतेही झाकण नाही. नाला जमिनीखाली नसल्याने उद्यानात दरुगधीमुळे मोकळा श्वास घेता येत नाही, अशी अनेकांची तक्रार आहे. उद्यान १५-२० वर्षे जुने असल्याचेही नागरिकांनी सांगितले. या उद्यानात लहान मुलांना खेळण्यासठी घसरगुंडी तसेच झोपाळा आदी सुविधांचीही सोय आहे. महापालिकेकडे अनेक वेळा निवेदन केल्यानंतर आता पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. उद्यानाच्या मधोमध कारंजा बनवला आहे. तो शोभेचा असावा की काय अशी शंका नागरिकांना आहे. कारण त्यातून कधीच पाण्याचे तुषार उडताना दिसत नसल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. या उद्यानाशेजारीच शौचालयाची सोय आहे. मात्र येथे स्वच्छता नसल्याने त्याचा कुणी फारसा वापर करीत नाहीत. अगदीच नाइलाज असेल तरच लोक येथे जातात. त्यामुळे या ठिकाणी चांगल्या स्वच्छ शौचालयाची  सुविधा द्यावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. या उद्यानातील आसन व्यवस्था मात्र उत्तम असून दोन्ही बाजूंनी कट्टे तयार केले आहेत. त्यामुळे येथे निवांत बसता येते. आरोग्य राखण्याच्या निमित्ताने डोंबिवलीकर या ठिकाणी येतात. व्यायाम करतात, चालतात. विसाव्याच्या वेळी एकमेकांशी संवाद साधतात. त्यातून नव्या ओळखी, नाती निर्माण झाली आहेत.

मैत्रिणी आणि हास्य..

दररोज सकाळी सहाच्या दरम्यान येथे हास्ययोगाचे धडे शिकविले जातात. मात्र हे प्रशिक्षण विनामूल्य दिले जाते. माय लाफ्टर क्लब या नावाने मीरा कुलकर्णी आणि आरती म्हसकर या दोघींनी या हास्ययोग क्लबची स्थापना केली. या उद्यानात एकही पत्र्याची शेड नसल्याने पावसाळ्यात मात्र येथे येणाऱ्या नागरिकांचे हाल होतात. त्यामुळे हास्ययोगही पावसात भिजूनच करावा लागत असल्याची तक्रार महिलांनी केली. या हास्यक्लबमध्ये २०० ते ३०० जण हमखास सहभागी होतात. हास्ययोग आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतो. या हास्ययोगाचा शोध भारतीय डॉ. मदन कटारिया यांनी १९९५ मध्ये लावला. धकाधकीच्या जीवनात हास्य निघून गेले असून ताणतणावापासून मुक्ती मिळविण्यासाठी हा अनोमल उपाय आहे. या हास्ययोगामुळे खूप मैत्रिणी भेटल्या. त्यामुळे सकाळी या उद्यानात आलो नाही की एकमेकींना चुकल्याचुकल्यासारखे होते असेही मीरा कुलकर्णी यांनी सांगितले. मात्र रविवारी या हास्ययोगाला सुट्टी असते. मात्र त्यादिवशी हास्ययोगमधील अनेक जणी चालायला या उद्यानात येतात. दमा, मधुमेह, रक्तदाब हे विकार आटोक्यात ठेवण्यात हास्ययोगाचा अनेक महिलांना उपयोग झाला आहे, असेही आरती म्हसकर यांनी सांगितले. या हास्य क्लबला सोळा वर्षे झाली असून सदस्यांची संख्याही वाढली आहे.

कडुलिंब, कार्ले, तुळस, आवळ्याचा रस

उद्यानाच्या बाहेर अक्षता दळवी या कडुलिंबू, आवळा, कार्ले, तुळस, आले, गहू आदी पदार्थाचा रस घेऊन बसतात. या रसाचा एक ग्लास १० रुपये याप्रमाणे मिळतो. गेली अठरा वर्षे त्या हा व्यवसाय करीत आहेत. उन्हाळा तसेच थंडीत या रसांना जास्त मागणी असते. सकाळी चार वाजता उठून हे रस त्या स्वत: तयार करतात. विशेषत: दुधी आणि कारल्याचा रस कोणाला बाधू नये यासाठी त्या सतत दक्ष असतात.

जागा स्वच्छ ठेवणे गरजेचे..

आठ ते दहा वर्षे आम्ही येथे नित्यनेमाने दीड ते दोन तास बॅटमिंटन खेळतो. ६० व्या वर्षीही फिट राहण्याचे निम्मे श्रेय या बॅटमिंटन खेळण्याला आहे. मात्र हे उद्यान आणखी स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. येथील बहुतेक जागा पडीक आहे. त्याचाही योग्यरीतीने वापर होणे गरजेचे आहे. आजकाल मोकळी जागा मिळणे कठीण झाले आहे. मात्र जी जागा उद्यानासाठी दिली आहे. ती जागा स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.

हिंदुराव जगदाळे

उखडलेल्या लाद्यांची भीती वाटते

बाग सुरू झाल्यापासून आम्ही येथे व्यायाम करायला येतो. मात्र येथे शेड नसल्यामुळे पावसात ज्येष्ठ नागरिकांचे हाल होतात. गोलाकार बाकडी नाहीत. तसेच महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना लादीचा त्रास होतो. उखडलेल्या लाद्यांवरून पडण्याची दाट शक्यता असते. पाण्याची व्यवस्था केली. मात्र ते अशुद्ध आहे. दर पावसाळ्यात महापालिकेला गवत काढा असे निवेदन द्यावे लागते.

अशोक वालावलकर

पावसाळ्यासाठी शेड हवी

हास्यक्लबमुळे अतिशय छान वाटते. उद्यानात सोयी-सुविधांची गरज आहे. विशेषत: पावसात हास्ययोग करणे त्यामुळे कठीण जाते, पण हास्य योगामुळे खूप मैत्रिणी मिळाल्या तसेच आजारापासून दूर राहता येते. उद्यानात उगवलेलेले गवत नियमितपणे कापावे. त्यामुळे सापांची भीती वाटणार नाही. उद्यानात एक फेरी मारली तरीही दिवसभर हुरूप येतो.

मीरा कुलकर्णी

दरुगधी दूर व्हावी..

बागेत सकाळी मॉर्निग वॉकला येतो. स्वच्छ व शुद्ध हवेत फेरफटका मारता यावा, इतकीच अपेक्षा असते. मात्र गटाराच्या दरुगधीमुळे ती घेता येत नाही. महापालिकेने येथील गटारे भूमिगत करावी. तसेच पडिक जागेचा वापर करता यावा यासाठी महापालिकेला निवेदन दिले आहे.

बलभीम बाबर