छायाचित्रे न्यायालयात सादर करणार
डोंबिवली पश्चिमेत गेल्या आठवडय़ापासून नियमित कचरा उचलला जात नसल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून सर्वत्र दरुगधी पसरली आहे. पश्चिम भागात खासगी ठेकेदाराकडून कचरा उचलण्याचे काम केले जाते. दिवाळीच्या सुट्टीत काही कामगार गैरहजर राहिल्याने ऐन दिवाळीत रहिवाशांच्या दारासमोर कचऱ्याचे ढीग साचले होते. हा कचरा तसाच पडून आहे.
महापालिका अधिकारी कचरा उचलला जात असल्याचा कितीही दावा करीत असले तरी, खासगी ठेकेदारांच्या कामगारांवर पालिका अधिकाऱ्यांचा वचक नसल्याचे सांगण्यात येते. या सफाई कामगारांना कामावर येण्यासाठी दरडावले तर ते मनमानी करतात. त्यामुळे ठेकेदाराच्या सफाई कामगारांना कोणी काही बोलत नसल्याचे सांगण्यात येते. महापालिकेच्या सेवेत दाखल करून घ्या म्हणून ठेकेदाराचे कामगार न्यायालयात गेले आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे पश्चिम भागात पालिकेचे सफाई कामगार नियुक्त करणे प्रशासनाला अडचणीचे झाले आहे. नवनिर्वाचित नगरसेवक प्रभागात कचऱ्याचे ढीग साचले आहेत तरी मूग गिळून बसल्याने रहिवाशांचा संताप झाला आहे. पालिकेचे कचरा उचलणारे वाहन चालक पश्चिम भागात फिरताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालिकेची टंगळमंगळ
कचरा विल्हेवाट प्रकल्पाची लवकर अंमलबजावणी करा, असे उच्च न्यायालयाने सात महिन्यांपूर्वी आदेश देऊनही पालिका प्रशासन त्याबाबत टंगळमंगळ करीत आहे. या प्रकरणी न्यायालयाने महापालिका हद्दीत नवीन बांधकामांना बंदी घातली आहे. तरीही प्रशासन कचऱ्याबाबत जागरूक नसल्याने या प्रकरणातील याचिकाकर्त्यांने डोंबिवली पश्चिमेतील कचऱ्याची छायाचित्रे उच्च न्यायालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रशासनाने न्यायालयाला दाखविण्यासाठी कचरा विल्हेवाट प्रकल्प कागदोपत्री तयार केले असले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी प्रशासनाकडून होत नाही. आयुक्तांची हे प्रकल्प राबविण्याची इच्छा असली तरी त्यांचे सल्लागार मात्र जुनेच आहेत. त्यामुळे पालिकेतील कचऱ्याच्या बाबतीत सुरू असलेला सावळागोंधळ आपण उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणणार आहोत. पालिकेची कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याची इच्छाशक्ती नाही, हेही आपण न्यायालयाला सांगणार आहोत, असे याचिकाकर्त्यांने सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Garbage problem in west dombivali
First published on: 18-11-2015 at 02:29 IST