किरकोळ बाजारात भाव ३०० रुपये; हिरवी मिरचीही महाग

मुंबई, ठाणे व उपनगरांना भाजीपाल्याचा पुरवठा करणाऱ्या वाशी येथील घाऊक बाजारपेठेत पंधरवडय़ापासून लसूण आणि हिरव्या मिरचीची आवक कमालीची घटली आहे. यामुळे घाऊक बाजारात लसणाचा भाव १०० रुपयांवर गेला असून, किरकोळ बाजारात उत्तम प्रतीची सुकलेली लसूण किलोमागे २७५ ते ३०० रुपयांपर्यंत विकण्यात येत आहे. तसेच बेळगाव, पालघर भागांतील हिरव्या मिरच्या थेट ८० रुपये किलोने विकल्या जात आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून गगनाला भिडलेले कांदा, टोमॅटोचे भाव घसरले असले तरी महागाईच्या यादीत लसणाचा क्रमांक सध्या सर्वात वरचा आहे. मुंबई तसेच ठाणे परिसरात साधारणपणे इंदूर, राजकोट तसेच हिमाचल प्रदेशातील काही भागांमधून लसणाचा पुरवठा होतो. गेल्या वर्षी लसणाच्या बाजारात मंदीचे सावट होते. त्यामुळे योग्य भाव मिळत नसल्याचे कारण पुढे करत शेतकऱ्यांनी यंदा लसणाचे कमी पीक घेतले आणि त्याचा परिणाम पुरवठय़ावर दिसू लागला आहे, असा दावा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत येणाऱ्या कांदा-लसूण बाजारातील घाऊक व्यापारी चंद्रकांत रामाणे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात दररोज किमान ६ गाडी लसूण लागतो. पंधरवडय़ापासून हे प्रमाण जेमतेम २ ते ३ गाडय़ांवर आले आहे, असेही रामाणे यांनी सांगितले.

कोरडय़ा लसणाचा साठा संपुष्टात येत असल्याने ही भाववाढ झाली आहे, अशी माहिती ठाण्यातील किरकोळ भाजी विक्रते रवी कुर्डेकर यांनी दिली. थंडीच्या हंगामात लसणाचे नवे पीक येते. ही लसूण पूर्णत: कोरडी झाल्याशिवाय विक्रीस ग्राह्य़ धरला जात नाही. ग्राहकही ओला लसूण विकत घेत नाही. त्यामुळे लसणाचा साठा उपलब्ध असला तरी तो कोरडा कधी होतो याची ग्राहकांना काही काळ वाट पाहावी लागणार आहे, असे कुर्डेकर यांनी सांगितले.

बेळगाव, जळगाव तसेच पालघर भागातून येणाऱ्या हिरव्या मिरचीची आवकही घटल्याने किरकोळ बाजारात तिचा दर वाढला आहे.

लसूण हा चैनीचा खाद्यपदार्थ नसून तो जीवनावश्यक आहे. रुग्णांसाठीही लसणाचा उपयोग औषध म्हणून केला जातो. दिवसभरात गृहिणी जेवणात एक लसूण सहज वापरते. पूर्वी वापरात नसलेले प्लास्टिक देऊन त्याबदल्यात लसूण मिळायची. आता वाढीमुळे तीही मिळत नाही.

रीमा देसाई, गृहिणी, ठाणे