कांदळवनाच्या जागेचा गैरवापर; सुरक्षा व्यवस्था नसल्याने दुर्घटनेची भीती

वसई : नायगाव पूर्वेतील परेरानगर परिसरात मुख्य रस्त्याच्या कडेला भरवस्तीत एका नादुरुस्त ट्रकमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचे गोदाम बनवण्यात आले आहे. कांदळवनाच्या जागेत मातीभराव करून एका गॅस वितरण कंपनीने हे गोदाम तयार केले आहे. मात्र तयार करण्यात आलेल्या गोदामाला कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नसल्याने कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना होण्याची भीती आहे.

नायगाव पूर्वेतील भागात परेरा नगरकडे जाणारा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याच्या कडेला कांदळवनाच्या जागेत मातीभराव करून गॅस सिलिंडरचे गोदाम बंद असलेल्या ट्रकमध्ये सुरू करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून हे गोदाम या ठिकाणी असून या प्रकाराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

या रस्त्यावरून दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी ये-जा करत असतात. त्याशिवाय या परिसरात मोठय़ा प्रमाणात नागरी वस्ती आहे. रात्रीच्या सुमारास हे गोदाम बंद असते त्या वेळी या वाहनांच्या मागील बाजूच्या भागात काही गर्दुल्ले अमली पदार्थाचे सेवन आणि धूम्रपान करण्यासाठी येत असतात. चुकून सिगारेटची जळती काडी या ठिकाणी पडली तर मोठी दुर्घटना होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली.

गॅस सिलिंडरची गोदामे उभी करताना किंवा साठा करताना पालिकेची परवानगी घेणे गरजेचे आहे. मात्र नायगाव येथे सुरू करण्यात आलेल्या गोदामाच्या ठिकाणी तसेच सुरक्षेचे निकष न पाळता उभे करण्यात आल्याचे दिसून आले आहे. या गोदामांची तपासणी केली जात नसल्याने धोकादायक गोदामे सर्रास सुरू आहेत.  विशेष म्हणजे हे गॅस सिलिंडरचे गोदाम कांदळवनाच्या जागेत आहे. या ठिकाणी मातीभराव करून अतिक्रमण करण्यात आले आहे. मात्र याकडे महसूल प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.    महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी विनापरवाना गॅस गोदामे तयार करण्यात आली असून त्यात गॅस सिलिंडरचा साठा करण्यात आला आहे. परिसरात नागरी वस्ती असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने अशा गोदामांची अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे की नाही याचीही पाहणी केली जात नसल्याने नागरी वस्तीमध्ये गॅस गोदामे चालविली जाऊ  लागली आहेत यासाठी पालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरात उभारण्यात आलेल्या गॅस गोदामांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

गोदाम नोंदणीकृत आहे किंवा नाही हे पाहण्यात येईल. तिथे सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत याची पाहणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील आणि त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. – किरण सुरवसे, तहसीलदार, वसई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गॅस सिलिंडर ठेवत असलेल्या ठिकाणी अग्निसुरक्षेच्या दृष्टीने अद्ययावत यंत्रणा आहे की नाही हे पाहूनच परवानगी दिली जाते. तसेच उघडय़ावर गॅसचे गोदाम ठेवणे चुकीचे आहे. जर असा प्रकार होत असेल तर याची अग्निशमन दलाचा अधिकारी पाठवून पाहणी करण्यात येईल. -दिलीप पालव, मुख्य अग्निशमन अधिकारी, महापालिका

ज्या ठिकाणी उघडय़ावर गॅस सिलिंडर ठेवले जातात, अशा सर्व ठिकाणांची पाहणी करून अशी गोदामे चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना अग्निशमन विभागाला दिल्या जातील. – संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका