पालकमंत्र्यांच्या महापालिका अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना; ग्लोबल आणि पार्किंग प्लाझा रुग्णालयांत आता सीटीस्कॅन सुविधा

ठाणे : महापालिका क्षेत्रात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची बुधवारी तातडीची बैठक घेऊन त्यात महत्त्वाच्या सूचना केल्या. रुग्णालयातील खाटा वाढविणे, संशयित रुग्णांचा शोध घेणे, गृह विलगीकरणातील व्यक्तींच्या हातावर शिक्का मारणे आणि मुंबईच्या धर्तीवर मार्शलमार्फत मुखपट्टीविना फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. तसेच करोनाची लागण झालेल्या गरोदर महिलांसाठी विशेष व्यवस्था तसेच सहव्याधी रुग्णांची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या असून त्याचबरोबर ग्लोबल कोविड रुग्णालय आणि पार्किंग प्लाझा रुग्णालय या दोन्ही ठिकाणी सीटीस्कॅन सुविधा सुरू करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

करोनाची दुसरी लाट आल्याने शहरात पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली असून ही रुग्णंसख्या आटोक्यात आणण्यासाठी ठाणे महापालिकेने सज्ज राहावे, अशा सूचना पालकमंत्री शिंदे यांनी बैठकीत केल्या. गृह विलगीकरणामध्ये असलेल्या व्यक्तींचा नियमित आढावा घेऊन त्यांच्या हातावर शिक्के मारावेत. हे रुग्ण घराबाहेर पडणार नाही, याची काळजी घ्यावी आणि त्यांच्याशी संपर्क साधून आवश्यकतेनुसार त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टराचे पथक सज्ज ठेवावे. तसेच या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेणे आणि संशयित रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल करण्यावर भर द्यावा. मागील वर्षीपेक्षा यावेळेस करोना संक्रमणाचे प्रमाण हे जलदगतीने होत असून यामुळे रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. ही चिंताजनक बाब आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी या सर्वानी मिळून सक्षमपणे काम करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. सर्व करोना केंद्र कार्यान्वित करण्यासह आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर, औषधसाठा, रेमडेसिवीर व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर बंद करण्यात आलेले विलगीकरण कक्ष आता पुन्हा सुरू करून त्याठिकाणी दैनंदिन साफसफाई, आवश्यक औषध पुरवठा, तज्ज्ञ डॉक्टर, भोजन अशी चांगली व्यवस्था करावी. तसेच ज्या विभागात रुग्ण सापडत आहेत, तेथील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी फलक लावावेत. करोनाबाधित रुग्णांना मदत व्हावी यासाठी शहरातील फलकावर कोविड वॉररूमचे दूरध्वनी क्रमांक देऊन संपर्क साधण्याचे आवाहन करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. ठाणे महापालिकेचा कोविड वॉररूम हा अद्ययावत असून रुग्णांनी संपर्क साधल्यास तात्काळ सेवा पुरविली जाते. परंतु रुग्णांनी या वॉररूमपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी सांगितले. तसेच उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांची माहिती त्यांच्या नातेवाईकांना त्वरित उपलब्ध होईल, यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याची सूचना त्यांनी प्रशासनाला केली आहे.

सूचना काय?

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व विभागांमध्ये दैनंदिन साफसफाई योग्य प्रकारे करणे, आवश्यकतेनुसार औषधफवारणी करणे तसेच मुखपट्टीविना फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणे, वेळप्रसंगी पोलिसांची मदत घेणे, रात्री ८ वाजेनंतर जमावबंदीच्या आदेशाचे पालन करण्यासाठी गस्त वाढविणे, रुग्णांसाठी बस रुग्णवाहिका सज्ज ठेवणे आणि मृत्युदर कमी करणे, रुग्ण्वाहिकांची संख्या वाढविणे, आवश्यकतेनुसार परिवहनच्या बसगाडय़ा रुग्णवाहिकेत परिवर्तित करणे तसेच उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांचे सीटीस्कॅन करण्यासाठी ग्लोबल कोविड सेंटर, पार्किंग प्लाझा येथे सीटीस्कॅनची सुविधा उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून रुग्णांना इतरत्र जावे लागणार नाही आणि रुग्णांवर योग्य उपचार करणे सोईचे होईल, अशा सूचनाही पालकमंत्री शिंदे यांनी बैठकीत दिल्या.

‘टाळेबंदीची वेळ येणार नाही’

गेल्यावर्षी करोना उपाययोजनासंदर्भात झालेल्या बैठकांमध्ये ठरलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास कसूर केला म्हणून संबंधितांना परिणामांना सामोरे जावे लागले. त्यामुळे आताही बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशा इशारा पालकमंत्री शिंदे यांनी यावेळी दिला. तसेच नागरिकांनी नियम पाळले तर टाळेबंदीची वेळ येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.