अर्थतज्ज्ञ जयराज साळगावकर यांचे प्रतिपादन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लक्ष्मी आणि सरस्वती एकाच ठिकाणी वास करीत नाहीत, असे म्हणतात. मात्र टाटा उद्योग समूह त्याला अपवाद आहे. टाटांच्या या उद्योग संस्कृतीची नेमकी ओळख गिरीश कुबेर यांच्या ‘टाटायन’ या पुस्तकातून होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जयराज साळगांवकर यांनी गुरुवारी कळवा येथील जवाहर वाचनालयाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या कै. गोपीनाथ शिवराम पाटील स्मृती वाङ्मय पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी केले. दै. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांना त्यांच्या ‘टाटायन’ पुस्तकासाठी यंदाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

[jwplayer xpbAHLf3]

कळवा येथील ज्ञानप्रसारणी शाळेच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास मोठय़ा प्रमाणात साहित्य रसिकांनी हजेरी लावली होती. जवाहर वाचनालयाचे अध्यक्ष सुभाष पाटील, पारसिक बँकेचे अध्यक्ष रणजित पाटील, सहकार बाजारचे अध्यक्ष नारायण गावंड यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

अर्थतज्ज्ञ, साहित्यिक आणि उद्योजक असलेल्या जयराज साळगांवकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ‘टाटा समूहाचे वैशिष्टय़ म्हणजे संचालकांचा दैनंदिन कामकाजात ढवळाढवळ, हस्तक्षेप नसतो. जेआरडी जमशेदपूर येथे वर्षांतून एकदाच जात. त्या दिवशी त्यांचे भव्य स्वागत केले जाई. त्या वेळी गावात रोषणाई केली जाई. १९७१ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतून नवलटाटा उभे राहिले होते. याच काळात एकदा बॉम्बे हाऊसमध्ये जाण्याचे भाग्य लाभले. तो माझ्या आयुष्यातील भाग्याचा दिवस होता’, असे साळगांवकर म्हणाले.

‘‘टाटायन’ या पुस्तकाचे वाचकांनी स्वागत केले. त्याला अनेक पुरस्कार मिळाले. याचे सारे श्रेय टाटा या उद्योग संस्कृतीला द्यावे लागेल,’ अशा शब्दांत गिरीश कुबेर यांनी आभार व्यक्त केले. ‘टाटा समूहाने भारतात मूल्याधिष्ठित उद्योग संस्कृती रुजवली. ज्या देशात सोने जास्त असते, त्या देशाचा विकास होत नाही. उलट ज्या देशात पोलाद तयार होते तो देश पुढे जातो. आपल्या देशात पुढच्या शंभर वर्षांत कोणत्या गोष्टींची आवश्यकता भासेल याचा विचार टाटांनी केला होता. वीजनिर्मिती, वाहन उद्योग, हॉटेल व्यवसाय, बांधकाम उद्योग, असे विविध उद्योग त्यांनी सुरू केले तर एनसीपीए, कॅन्सर हॉस्पिटल, टीआयएफआर, हाफकिन यांसारख्या संस्था सुरू करताना त्यांनी त्यातून किती फायदा होईल, याचा विचार केला नाही. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, हे ओळखून टाटांनी येथे अहोरात्र अखंडित वीजपुरवठा सेवा सुरू केली. एखाद-दुसरा अपवाद वगळता त्यात खंड पडलेला नाही,’ असे ते म्हणाले.

२४ मजल्यांचे आलिशान घर स्वत:साठी बांधणाऱ्या उद्योगपतींची कीव करायला पाहिजे. ‘आपल्या देशात टाटा हेच एकमेव उद्योजक, बाकी सारे बनिया आहेत’ अशा शब्दांत कुबेर यांनी टाटा समूहातील सद्यस्थितीवर भाष्य केले.

[jwplayer 4EcaOMGB]

 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girish kuber book tatayan express exact identity of tata industries culture
First published on: 19-11-2016 at 02:30 IST