मकरसंक्रांत हा महिलांसाठी महत्त्वाचा सण आहे. त्यामुळे या सणाच्या निमित्ताने वसईतील महिलांना व्यवसायाची चांगली संधी उपलब्ध झाली असून त्याचा फायदा घेत अनेक महिलांनी बचत गटाद्वारे आपले छोटे-मोठे विविध घरगुती व्यवसाय थाटले आहेत. कुणी तिळगुळाचे लाडू, तर कुणी हलव्याचे दागिने बनवून विकण्याचे कार्य करत आहेत. त्याद्वारे त्यांना फायदादेखील होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

कुटुंबातील नवीन सून, जावई, लहान मुले यांच्यासाठी संक्रांतीचा सण साजरा केला जातो. यात सून आणि जावई यांना हलव्याचे दागिने घातले जातात. यासाठी विरार येथील राहणाऱ्या स्मिता वाळिंबे यांनी संक्रांतीनिमित्त हलव्याचे दागिने बनविण्याचे काम हाती घेतले आहे. याद्वारे ते स्त्री, पुरुष आणि लहान मुले यांचे हलव्याचे दागिने बनवत आहेत. स्त्रियांच्या सेटमध्ये हलव्याच्या बांगडय़ा, नेकलेस, मंगळसूत्र, बाजूबंद, छल्ला, अंगुठी, गाजर आणि यांसह इतर साहित्य त्या ६५० ते ७०० च्या दरात विकत आहेत. तर यांसह पुरुषांच्या दागिन्यांचा सेट हा ४०० पर्यंत आणि लहान मुलांचा २०० ते २५० पर्यंत विकत आहेत. मुख्य म्हणजे या बाजारभावापेक्षा कमी किमतीमध्ये विकत असल्याने ग्राहक खूश आहेत.

नालासोपारा येथील वनिता गवळी यांच्या गंगा महिला गटातील १३ ते १४ महिला तिळाचे लाडू, तिळाची पुरणपोळी, तिळाची चिक्की असे विविध पदार्थ बनवून विकण्याचा व्यवसाय करीत आहेत. तर विरार येथील स्वकृत महिला बचत गट संक्रांतीनिमित्त सवाशिणी बायका एकमेकींना वाण देतात. त्यांनी विविध वाण बनविण्याचा उद्योग थाटला आहे. तर महिलांची सर्वात आवडती वस्तू म्हणजे इमिटेशन ज्वेलरीसुद्धा बाजारभावापेक्षा कमी किमतीमध्ये विकत आहेत. हा बचत गट पूजा दळवी या चालवत असून यात एकूण १० महिलांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.