एक खिडकी योजनेच्या माध्यमातून नागरिकांची कामे सुरळीत पार पडण्याऐवजी नागरिकांना दररोज तलसीलदार कार्यालयाच्या सेतू केंद्रात हेलपाटे घालावे लागत असल्याने सेतू केंद्राच्या एक खिडकी योजनेलाच हरताळ फासल्याचे चित्र समोर आले आहे. दाखला अर्ज जमा करताना ‘अर्ज पडताळणी’साठी स्वतंत्र खिडकी नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
कल्याणमधील रेल्वे स्थानक परिसरात असणाऱ्या तहसीलदार कार्यालयाच्या सेतू केंद्रात दररोज अनेक विद्यार्थी, पालक आणि अन्य नागरिक येत असतात. राष्ट्रीयत्वाचा दाखला, वयाचा दाखला, जातीचा दाखला या व अशा विविध दाखल्यांच्या कामांसाठी नागरिकांना सेतू केंद्रात हेलपाटे घालावे लागतात. कल्याणमधील सेतू केंद्रात दाखले जमा करण्यासाठी आणि दाखले प्रमाणपत्र वितरण करण्यासाठी स्वतंत्र खिडक्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र दाखले जमा करताना अर्ज पडताळणीसाठी स्वतंत्र खिडकीची व्यवस्था नाही. त्यामुळे घेतलेला अर्ज योग्य आहे का नाही या संभ्रमातच नागरिकांना सतत वावरावे लागते.
अनेकदा दाखल्यांसाठी भरावयाचे अर्जच सेतू केंद्रात उपलब्ध नसतात. यामुळे केंद्रात येणाऱ्या नागरिकांची भरदिवसा तारांबळ उडालेली पाहायला मिळते. त्याचप्रमाणे दाखला अर्ज जमा करण्याच्या रांगेत किमान दोनशे ते तीनशे नागरिकांचा गराडा दररोज पाहायला मिळतो. आपला क्रमांक आल्यानंतर अधिकृत माहितीपत्र नसल्याची त्रुटी खिडकीवरील अधिकाऱ्याकडून दाखवण्यात येते. मग पुन्हा अधिकृत माहितीपत्र मिळविण्याची धडपड करायची व पुन्हा दोनशे ते तीनशे नागरिकांच्या रांगेत नव्याने उभे राहायचे, अशी सेतू केंद्रात आपल्या कामासाठी येणाऱ्या नागरिकांची सध्याची दिनचर्या आहे. या सगळ्या अडचणी अर्ज पडताळणीसाठी स्वतंत्र खिडकी नसल्याने होताना दिसतात.
ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी सेतू केंद्रात स्वतंत्र रांगेची व्यवस्था नाही. एकंदरीतच काय सेतू केंद्राची कोलमडलेली घडी तातडीने बसवणे आवश्यक असून त्याद्वारे सेतू केंद्राचे कार्य सुरळित होणे गरजेचे आहे.

कल्याणमधील तहसीलदार कार्यालयाच्या सेतू केंद्रात चालणारी सद्य यंत्रणा खूप जुनी आहे. धकाधकीच्या जीवनात या यंत्रणेत लक्षणीय बदल होण्याची आवश्यकता आहे. सेतू केंद्रात अर्ज पडताळणीसाठी स्वतंत्र खिडकी सुरू करण्याची आवश्यकता असून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीही स्वतंत्र रांग सुरू करणे गरजेचे आहे.
– राजाराम पाटील, कल्याण</p>

दाखला अर्जासाठी लागणाऱ्या अधिकृत माहितीपत्रांविषयीची माहिती सेतू केंद्र परिसरातील फ्लेक्सवर लावण्यात आलेली आहे. त्यामुळे अर्ज पडताळणीसाठी स्वतंत्र खिडकी सुरू करण्याची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे शहरातील संबंधित परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी दाखले वाटप मोहीम वेळोवेळी घेण्यात येत असते. त्यामुळे दाखले मिळवण्याबाबत ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत नाही.
किरण सुरवसे, तहसीलदार, कल्याण