ठाणे : करोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे राज्य शासनाने सण, उत्सवांवरील निर्बंध हटविले असून यामुळे ठाण्यात राजकीय पक्षांच्या नेत्यांनी यंदा दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. त्यात मनसेच्या वतीनेही दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या ठिकाणी विश्वविक्रमाची बरोबरी करणाऱ्या गोविंदा पथकाला मनसेकडुन ‘स्पेन’ वारी घडवण्याची घोषणा मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे. नौपाडयातील भगवती मैदानात १९ ऑगस्ट रोजी मनसेने दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे.

या ठिकाणी ९ थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना ११ लाखांचे सामुहिक बक्षिस तर एकुण ५५ लाखांची बक्षिसे मनसेने जाहिर केली आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांना अपेक्षित असलेली मराठमोळी परंपरा जपुन यंदा प्रथमच दहीहंडी उत्सवामध्ये कोकणातील चाकरमान्यांसह वनवासी बांधवदेखील सहभागी होणार आहेत. अशी माहिती अविनाश जाधव यांनी दिली. मागील वर्षी करोना काळात तत्कालीन सरकारने सण, उत्सवांवर लादलेली बंदी झुगारत ठाण्यात मनसे दहीहंडी उभारली होती. यंदाही मनसेच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या दहीहंडीत विश्वविक्रमाची बरोबरी करणाऱ्या गोविंदा पथकातील सर्वांना स्पेन वारी घडवण्याची घोषणा जाधव यांनी केली आहे. स्पेनमध्ये १६ नोव्हेबर रोजी होणाऱ्या मानवी मनोऱ्यांच्या कॅसलर्स फेस्टीव्हलमध्ये या विश्वविक्रमी पथकाना सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.  राज्य सरकारने सणांवरची बंदी उठवली असून त्याच जल्लोषात मनसे दहीहंडी साजरी करण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.