पाचपाखाडीपाठोपाठ लुईसवाडीलाही हिरवे कोंदण; ४० लाखांचा खर्च
पूर्व द्रुतगती महामार्गालगत पाचपाखाडी परिसरास लागून उभारण्यात आलेल्या ‘हरित पथ’ संकल्पनेस ठाणेकरांना तुफान असा प्रतिसाद मिळाल्यानंतर आता महामार्गाच्या दुसऱ्या बाजूस लुईसवाडीला खेटून पदपथावर हिरवा पट्टा तयार केला जाणार आहे. या ठिकाणी व्यायामासाठी साहित्य तसेच जॉगिंग करू इच्छिणाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्याचे आदेश ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अभियांत्रिकी विभागास दिले आहेत. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सुमारे ४० लाखांपेक्षा अधिक रकमेचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.
अतिक्रमणे, बेकायदा बांधकामे यामुळे ठाणे, कळवा आणि मुंब्रा या शहरांचे अक्षरश तीनतेरा वाजले आहेत. ठाणे महापालिकेने १९९२ मध्ये शहराचा एकत्रित विकास आराखडा तयार केला. त्यास राज्य सरकारने साधारणपणे १९९९ मध्ये मान्यता दिली. या आराखडय़ात उद्यान, मैदान, सार्वजनिक वापरांच्या जागांसाठी महापालिकेने काही आरक्षणे ठेवली. मात्र, भूमाफियांनी त्यापैकी जवळपास ४० टक्क्य़ांपेक्षा अधिक आरक्षणांवर बेकायदा चाळी आणि इमारती उभारून शहराची अक्षरश दैना उडवली. महापालिकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी राजाश्रयाला बळी पडून या बेकायदा बांधकामांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे घोडबंदरचा अपवाद वगळला तर ठाणे शहरात मोकळ्या जागा फारच कमी उरल्या आहेत. ठाणेकरांना सकाळ-सायंकाळच्या वेळेत व्यायामासाठी, फेरफटका मारण्यासाठी तलावांच्या किनारी अथवा रस्त्यांच्या कडेने जावे लागते. हे लक्षात घेऊन तत्कालीन आयुक्त आर.ए. राजीव यांनी शहरातील पदपथांवर हिरवाई साकारण्याचा अभिनव प्रकल्प आखला. त्यानुसार बडय़ा बिल्डरांच्या मदतीने पूर्व द्रुतगती महामार्गालगत पाचपाखाडी बाजूस हरित पथ तयार करण्यात आला. या ठिकाणी रहिवाशांना व्यायामासाठी साधने बसविण्यात आली. तसेच बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. महापालिकेने तयार केलेल्या या प्रकल्पास ठाणेकरांचा तुफान प्रतिसाद मिळत असून सकाळ-सायंकाळ या ठिकाणी फेरफटका मारण्यासाठी शेकडोंच्या संख्येने नागरिकांची गर्दी असते.
या प्रयोगाला मिळालेला उत्तम प्रतिसाद लक्षात घेता महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महामार्गाच्या पलीकडे दुसऱ्या बाजूसही अशाच प्रकारे हरित पथ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. महामार्गास लागून असलेल्या या सेवारस्त्यालगत मोठय़ा प्रमाणावर हॉटेल, गॅरेजेसचा भरणा आहे. या ठिकाणी येणारी वाहने नेहमी सेवा रस्त्यांलगत उभी असतात. त्यामुळे लुईसवाडीच्या सेवा रस्त्यावर नेहमीच वाहनांची कोंडी दिसून येते. असे असले तरी या ठिकाणी हरित पथाची निर्मिती केल्याने हा परिसर सुशोभित तर होईलच शिवाय या भागातील रहिवाशांना व्यायाम आणि फेरफटका मारण्यासाठी महामार्ग ओलांडून येण्याची आवश्यकता भासणार नाही, असा दावा जयस्वाल यांनी पत्रकारांशी बोलताना केला. यासंबंधीच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेची मान्यता मिळताच निविदा मागविल्या जातील आणि लवकरच पुढील कामास सुरुवात केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Green path on both sides of thane highway
First published on: 23-04-2016 at 06:35 IST