कल्याण, डोंबिवलीत जल्लोषात जलजागृती! नववर्ष स्वागताचा आनंद साजरा करतानाच दुष्काळाचे भान
महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाचे चित्र यंदाच्या नववर्ष स्वागतयात्रेतील चित्ररथांवर उमटले. पाणी वाचवा, झाडे लावा, पाण्याचा अपव्यय टाळा आदी संदेश देत मोठय़ा प्रमाणात चित्ररथ नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी झाले होते. नववर्ष स्वागतयात्रांची सुरुवात करणारे शहर म्हणून नावाजल्या जाणाऱ्या डोंबिवलीत यंदाही महिलांचा सहभाग लक्षणीय होता. गणेश मंदिर संस्थानच्या वतीने पश्चिमेकडील भागशाळा मैदानातून सुरू झालेल्या स्वागतयात्रेत ५० चित्ररथ आणि शेकडो नागरिक सहभागी झाले होते. या मिरवणुकीने अवघ्या डोंबिवलीवर पारंपरिक साज चढवला. तर ऐतिहासिक शहर असलेल्या कल्याणातही २६ चित्ररथ सहभागी झाले होते.
गणेश मंदिर संस्थानच्या वतीने काढण्यात आलेल्या यात्रेची सुरुवात गणेशाच्या पालखी सोहळ्याने झाली. सकाळी सहा वाजता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, केसरी पाटील, महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या हस्ते पालखी पूजन झाले. पारंपरिक वेशभूषेत नटलेले नागरिक, हिरारीने सहभागी झालेल्या संस्था आणि सामाजिक संदेश मिरवणारे चित्ररथ नववर्ष स्वागताचा उत्साह दर्शवणारे होते.
महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा शेतकरी बांधवांना बसत असून ठाणे जिल्ह्य़ातही वेगळी परिस्थिती नाही. मे महिन्यात पाणी टंचाईत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे यंदाच्या स्वागतयात्रेत जलसाक्षरता तसेच स्वच्छ सुंदर डोंबिवली या विषयावर भर देण्यात आला होता. संत गाडगेबाबा अभियान तसेच गणेश मंदिर संस्थानच्या स्वच्छता ट्रकने यात्रेत शेवटी राहून होणारा कचरा साफ केला.
स्वागतयात्रेकडे तरुणाईची पाठ
स्वागतयात्रेमध्ये महाविद्यालयीन तरुणाईचा ओढा कमी दिसला असला तरी, नेहमीप्रमाणे ही तरुणाई फडके रोडवर जमली होती. गणेश मंदिरात श्री गणेशाचे दर्शन घेऊन त्यानंतर आपल्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुप सोबत सेल्फी फोटो घेण्यातच ती मश्गुल होती.
सोने व्यापाऱ्यांचा निषेध
अबकारी कराविरोधात देशभरातील सराफांचा बंद सुरू आहे. पाडवा असूनही सराफांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. पाडव्यानिमित्त सराफ दुकाने एक दिवस चालू ठेवतील अशी अपेक्षा होती, काही सराफांनी तर पाडव्याची तयारीही केली होती. परंतू पादादिकाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने त्यांचाही नाईलाज झाला. सरकार आमच्या मागण्या मान्य करेपर्यंत आमचा बंद सुरु राहील असे सागरमल जैन यांनी सांगितले.
महाराजांसोबत ‘सेल्फी’
टिटवाळा येथील प्रवीण घुमरे यांनी पेपर क्लिपींग या कलेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची कलाकृती साकारली होती. २० बाय १० फूट आकारात साकारण्यात आलेली अप्पा दातार चौकातील ही कलाकृती सर्वाचे लक्ष वेधून घेत होती. तरुणाईची तर त्या कलाकृतीसोबत सेल्फी घेण्यात चढाओढच लागली होती.
फेटेवाल्यांची चांदी
गुढीपाडवा म्हणजे मराठमोळा सण, हिंदूंचे नववर्षांचे स्वागत. अशावेळी पूर्णपणे मराठमोळा गणवेश परिधान करण्याकडे नागरिकांचा कल दिसून आला. नऊवारी साडी असो नाही तर सदरा त्यावर फेटा बांधला नाही तर काय? यामुळे फेटे बांधून घेण्यासाठी नागरिकांची फेटेवाल्यांकडे एकच रिघ लागली होती. २०० रुपयांत हे फेटे नागरिकांना बांधून मिळत असल्याने नागरिकांनीही फेटा बांधून त्याच्या तुऱ्यात आपला मराठी बाणा दाखविला.
कलाकारांची वर्णी
झी मराठी वाहिनीवरील ‘पसंत आहे मुलगी’ या मालिकेतील उर्मी फेम रेशम प्रशांत आणि वासू फेम अभिषेक देशमुख यांनी यंदा प्रथमच डोंबिवली स्वागत यात्रेला हजेरी लावली. याविषयी अभिषेक म्हणाला.‘डोंबिवलीची स्वागतयात्रा एवढी नावाजलेली आहे की, ही यात्रा एकदा तरी प्रत्यक्षात अनुभवावी अशी इच्छा मनात होती. यंदा ही यात्रा पाहण्याचा योग आला’. तर रेशम म्हणाली, ‘मी मुळची कल्याणची असल्याने दिवाळी पहाट आणि डोंबिवली स्वागतयात्रेत यापूर्वीही सहभागी झाले आहे. एक सर्वसामान्य नागरिक नाही तर एक कलाकार म्हणून यात्रेत सहभागी झाले आहे.’
श्वानांचीही उपस्थिती
यंदाच्या स्वागतयात्रेत श्वानांनीही उपस्थिती लावली होती. डोंबिवलीतील उत्कर्ष प्रभू यांचा गोल्डन रेटीव्हर, विशाल टिल्लू यांची इंडियन परिहा या श्वानांनी आकर्षक वेशभूषा करीत स्वागत यात्रेत सहभागी झाले होते. तर बुलेटवर ऐटीत स्वार ‘एंजल’ ही सर्वाचे लक्ष वेधून घेत होती.