गर्भवती महिलांच्या जीवाशी खेळणाऱ्या शहापूर उपजिल्हारुग्णालयातील स्त्री-रोग तज्ज्ञ डॉ. सुहास कदम यांना तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आले आहे. एकाच दिवशी आठ शस्त्रक्रिया भोवल्याने डॉ. कदम यांना वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल जाधव यांनी कार्यमुक्त केले आहे. दरम्यान, या गंभीर प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाने घेतली. आरोग्य विभागाचे उपसंचालक हेमंतकुमार बोरसे यांनीही शुक्रवारी शहापूर येथे येऊन याप्रकरणाची चौकशी केली.
हेही वाचा >>> कल्याणमधील मोहन्यातील घरातून ३५ तोळे सोन्याची दिवसाढवळ्या चोरी
शहापूर उपजिल्हा रुग्णालयात गर्भवती महिलांच्या एका पाठोपाठ एक अशा एका दिवसात आठ सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या शस्त्रक्रिया कंत्राटी तत्वावर असलेले स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. सुहास कदम यांनी केल्या होत्या. सोमवारी घडलेल्या या प्रकारामुळे शहापूरात खळबळ उडाली होती. या गंभीर प्रकारची दखल घेत रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल जाधव यांनी डॉ. कदम यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र डॉ. कदम यांना वारंवार सूचना देऊनही कामात कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नव्हती.
हेही वाचा >>> कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी
अधीक्षकांची परवानगी न घेता परस्पर शस्त्रक्रिया करणे, रुग्णांची दररोज तपासणी न करणे, ठरवून दिलेल्या दिवशी रुग्ण तपासणी करण्यासाठी हजर न राहणे, कक्षा मधील खाटांची उपलब्धता न बघणे, गरजेनुसार सिझेरियन शस्त्रक्रिया करणे तसेच वरिष्ठांचे आदेश न पाळणे या कारणांचा ठपका ठेऊन जिल्हाशल्यचिकित्सक यांच्या सूचनेनुसार वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल जाधव यांनी डॉ . कदम यांना तडकाफडकी कार्यमुक्त करण्याची कारवाई केली आहे. दरम्यान, या गंभीर प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाने घेतली असून या प्रकरणाचा वास्तुस्थितीदर्शक अहवालाची मागणी केली आहे. आरोग्य विभागाचे उपसंचालक हेमंतकुमार बोरसे यांनी शुक्रवारी शहापूर उपजिल्हारुग्णालयात येऊन या गंभीर प्रकरणाची चौकशी केली. लवकरच स्त्री रोग तज्ज्ञाची जागा भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. तसेच बोरसे यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. जाधव यांची शुक्रवारी सायंकाळी ओपीडी बंद असणे तसेच इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरून कानउघाडणी केली.