आपल्या संतमहात्म्यांनी ‘वाचाल तर वाचाल’ या तीन शब्दांत वाचनाचे महत्त्व विशद केले आहे. आपली पिढी लहान वयात पुस्तकांशी जोडली गेली आणि ते नाते पुढे दृढच होत गेले. या वाचनाच्या गोडीने वेगवेगळे लेखक आणि त्यांचे लेखनप्रकार (साहित्य) यांच्याशी परिचय होत गेला. आणि भाषेबरोबरच भावविश्व, अनुभवविश्वही समृद्ध होत गेले. यातूनच चांगले बोलण्याचे, चांगले लिहिण्याचे, चांगले आचारविचारांचे संस्कारही सहज होत गेले. चांगल्या वाचनाबरोबरच चांगले कार्यक्रम ऐकण्याचे संस्कारही झाले. तेव्हा दूरदर्शनच्या अनेक वाहिन्या, संगणक, व्हिडीओ गेम्स, व्हॉट्सअ‍ॅप इ. स्वरूपाचे अडथळेही नव्हते. शाळेतील विविध उपक्रम, स्पर्धा (हस्तलिखित, भित्तिपत्रिका, वाङ्मय मंडळ, वक्तृत्व/वादविवाद स्पर्धा) यामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याबाबत शाळा, पालक एका वेगळ्या दिशेने जागरूकपणे प्रयत्न करीत होते. (झटपट यशस्वी होण्याकडे कल नव्हता.) बहुतांश विद्यार्थी ही प्रक्रिया स्वत: अनुभवायचे. त्यामुळे स्वत:चा अभ्यास सांभाळूनही या विविध अनुभवातून मुले वेगळ्याप्रकारे घडत गेली. सध्याच्या काळात बहुआयामी व्यक्तिमत्त्व जे म्हटले जाते त्याचा पाया हा असा घातला जात होता. या अनुभवांच्या समृद्ध शिदोरीवर त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास तर झालाच, पण पुढे आपापल्या क्षेत्रात त्यांनी यशही संपादन केले.
ही वस्तुस्थिती आणि समाजाची निकड लक्षात घेऊन जिज्ञासा आणि इंद्रधनु यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी सप्टें. २०१५ पासून वाचू या आनंदे, लिहू या स्वच्छंदे आणि बोलू या नेटके हा उपक्रम राबवला जात आहे. इ. ८वी/९वीच्या विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून सुमित्रा दिघे, मानसी विनोद, रीमा देसाई यांनी उपक्रमाचा आराखडा तयार केला. विद्यार्थ्यांवर वाचनसंस्कार करताना वाचन, लेखन आणि वक्तृत्व या गोष्टींवर भर देण्यात आला आहे. समाजातील सर्व वयोगटातील वाचनाची कमी होत असलेली आवड हा एक चिंतेचा विषय आहे. विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून वाचनाची आवड निर्माण करायची आणि मग त्यावर विचार करून स्वत:च्या भाषेत लिहून ते कसे वाचून दाखवायचे या दृष्टीने मार्गदर्शन दिले जाते. केवळ वाचनच नव्हे तर सर्व प्रकारचा संवाद (आणि पर्यायाने भाषेचा वापरही) कमी होत आहे. त्यामुळे ही सगळी वस्तुस्थिती लक्षात घेऊन व्यापक उद्देशाने हा उपक्रम राबवण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. सरस्वती सेकंडरी, शिवसमर्थ विद्यालय, श्रीरंग विद्यालय, थिराणी हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल, सिंघानिया स्कूल, मो.ह. विद्यालय इ. शाळा यामध्ये सहभागी होत आहेत.
या अभिनव उपक्रमाची अभिनय कट्टय़ावर सुरुवात झाली. पहिले पुष्प गुंफताना विद्यार्थ्यांनी पथनाटय़े सादर केली. जिज्ञासातर्फे पथनाटय़ स्पर्धा आयोजिण्यात आली होती. त्यामधील सहभागी विद्यार्थ्यांनी पथनाटय़े सादर केली. रंगकर्मी अशोक समेळ प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. पुढच्या सत्राचा विषय आधीच जाहीर केला जात असल्याने विद्यार्थ्यांना पुस्तक मिळवून वाचून त्यावर लिहिण्यासाठी महिन्याचा अवधी मिळतो. शाळेतून विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून दिली जातात, पण गरज लागल्यास जिज्ञासातर्फे पुस्तके उपलब्ध करून दिली जातात.
चरित्र हा दुसऱ्या पुष्पाचा विषय होता. प्रमुख पाहुणे प्रा. प्रदीप ढवळ या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. विद्यार्थ्यांनी वेगवेगळी चरित्रे, आत्मचरित्रे वाचण्याचा, त्यावर स्वत:च्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न दिसून येत होता. अशा प्रकारच्या व्यक्तिमत्त्वामुळे विद्यार्थी प्रेरित झाल्याचे दिसून येत होते. शिवाय त्यांच्याकडून काय शिकता आले त्याचीही नोंद करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला होता.
विज्ञान कथा, गूढ कथा हा पाचव्या पुष्पाचा विषय होता. या विषयाअंतर्गत स्वत:ला आवडलेली किंवा स्वरचित कथा विद्यार्थ्यांनी सादर करायची होती. स्वरचित विज्ञान किंवा गूढकथा लिहिताना रोबोटिक मांजर, ऑरेंज झिनिया असे विषय हाताळण्याचा चांगला प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला होता. बेडेकर विद्यामंदिरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
माझी निबंध वही या विषयावर सहावे पुष्प मो.ह. विद्यालय येथे आयोजिण्यात आले होते. कोणत्याही विषयावर विद्यार्थ्यांनी स्वत:च्या शब्दात निबंध लिहायचा होता. २० मार्च रोजी शिक्षकांचा साहित्याविष्कार हा कार्यक्रम खास शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आला आहे. शिक्षकांनी मराठी भाषेत स्वरचित (शक्यतो) कविता/ कथा/ नाटय़वाचन/ एकपात्री प्रयोग अशी कोणतीही कला सादर करायची आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happily read cleanly write and sincerely talk
First published on: 16-03-2016 at 05:13 IST