मराठमोळ्या थालीपीठाचा उत्तर भारतीय अवतार म्हणजे पराठा. नेहमीच भाजी-पोळी खाण्यापेक्षा कधीतरी रुचीपालट म्हणून या दोघांचे मिश्रण असलेले विविध स्वादांचे पराठे आता घरोघरी बनविले जातात. ठाण्यातील ‘हरिओम’मध्ये तब्बल १०५ प्रकारच्या नावीन्यपूर्ण पराठय़ांची चव चाखायला मिळते.

प्रत्येक प्रांताचा विशिष्ट असा आहार असला तरी बहुतेकांना इतर प्रांतातील पदार्थ खायला आवडतात. रुचीपालट म्हणून ते आरोग्यासही हितकारी असते. त्यातील काही पदार्थ आपल्या आहाराचा भागही बनतात. अशा प्रकारे आपल्या खानपानाचा अविभाज्य घटक ठरलेल्या परप्रांतीय पदार्थामध्ये पराठय़ाचा उल्लेख प्राधान्याने करावा लागेल.

पोळीभाजी कितीही चांगली असली तरी ती रोज खायला मुले कंटाळा करतात. त्यामुळे त्यांच्या डब्यात थोडा बदल म्हणून सर्रास पराठा दिला जातो. पराठ आणि आटा या दोन शब्दांचा मिळून पराठा हा शब्द बनला आहे. भाजी आणि पोळीचे मिश्रण असलेला पराठा हा मूळ उत्तर भारतीय पदार्थ गहू पिकणाऱ्या भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठय़ा प्रमाणात खाल्ला जातो. प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या नावाने हा पदार्थ ओळखला जातो. मराठीत पराठा, बंगालीमध्ये पोरोटा तर श्रीलंका तसेच मॉरिशसमध्ये त्याला फराटा असे म्हणतात. ठाण्यात पोखरण रोड नं. २ वरील हरिओम पराठा हाऊसमध्ये विविध प्रकारचे पराठे मिळतात. लहानपणापासून खाद्य उद्योगाविषयी आकर्षण असलेल्या संतोष महेश्वरी यांनी हॉटेल मॅनेजमेंट करून हा व्यवसाय सुरू केला. विविध भाज्या आणि मसाल्यांचा वापर करून त्यांनी पराठय़ांचे अनेक चविष्ट प्रकार तयार केले असून अस्सल खवैय्यांची दादही मिळवली आहे.

हरिओम पराठा हाऊसमध्ये आपल्याला नेहमीच्या आलू, कोबी, मुळा, मेथी पराठय़ाबरोबरच पावभाजी चीज पराठा, चिली मिली पराठा, वैशिष्टय़पूर्ण असा पिझ्झा पराठा, भरपूर प्रथिने असलेला सत्तू पराठा असे विविध १०५ प्रकारचे पराठे येथे आपल्याला मिळतात. कांदा, बटाटा, मटार, कोथिंबीर, मटार आदीं एकत्र करून बनविलेला येथील कॉकटेल पराठाही खासच म्हटला पाहिजे.  तसेच येथे मिळणारा प्रीमिअम पराठाही वैशिष्टय़पूर्ण आहे. त्यात आपल्याकडच्या बटाटा आणि मेथीबरोबरच त्यात पाश्चिमात्य जेलेपिनो, ऑलिव्स्, ब्लॅकपेपर्स आदी पाश्चिमात्य जिन्नसही टाकले जातात.  चीज, आलं, तिखट मिरची टाकून केलेला चीज चिली गार्लिक पराठा, आलू ओनियन गार्लिक पराठा, आलू ओनियन जिलेपिनो पराठा, आलू विथ ऑलिव्स पराठा, पनीर चीज गार्लिक, चीज ओनियन ब्लॅंकपेपर, मश्रुम मेथी गार्लिक असे अनेक प्रीमियम पराठे उपलब्ध आहेत.

परंपरा आणि नवता याचे बेमालूम मिश्रण करून पराठय़ाचे अनेक नवे प्रकार ‘हरिओम’ने ठाणेकरांना उपलब्ध करून दिले आहेत. त्यात पावभाजी मसाला, मसाला पापड आणि पिझ्झाच्या स्टफिंगचा मुबलक वापर केलेला असतो. त्यामुळे पावभाजी अथवा पिझ्झा खाल्ल्याचाही आनंद खवैय्यांना मिळतो.

त्याबरोबर येथे आपल्याला चीज, कांदा, हर्ब्स, सिमला मिरची टाकून तयार केलेला चिली मिली पराठा, सात विविध पिठाचं मिश्रण, मंग्रेल आणि राईच्या तेलाचं एकत्रित मिश्रण करून तयार केलेला सत्तू पराठा, मुलांचा आवडता चॉकलेट पराठा, गुलकंद घालून केलेला गुलकंद पराठा असे अनेक आगळेवेगळे परंतु चविष्ट पराठे येथे उपलब्ध आहेत. पराठा म्हटलं की तोंडी लावायला दही किंवा चटणी हे दोनच पदार्थ आपल्याला माहिती असतात. मात्र इथे आपल्याला पराठय़ाबरोबर दही,लोणचं, मिरचीचा ठेचा, कैरी, कुंदा, कोशिंबीर, पुदिनाची चटणी, चिंचेची चटणी असे आठ वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ मिळतात. पराठा कितीही चविष्ट असला तरी अनेक खवैय्यांचे जेवण त्यामुळे पूर्ण होत नाही. त्यासाठी भात लागतोच. खवैय्यांची ही गरज ओळखून येथे घरगुती पद्धतीचा फोडणीचा भात, डाळभात आणि मसालाभातही मिळतो.    पिझ्झा आणि गुलकंद पराठय़ाबरोबरच येथे बियर बॉटल ताक, स्टफ्ड पुरी भाजी आणि पतियाळा लस्सी मिळते. ताक हे तर आपल्या सर्वाचे आवडते पेय आहे. बहुतेक ठिकाणी ते ग्लासात दिले जाते. इथे मात्र ते एका नीट धुतलेल्या बिअरच्या बाटलीमध्ये भरून दिले जाते. सहलीला जाणाऱ्या बहुतेक मुलांच्या डब्यात पुरीभाजी असते. तसेच सणासुदीला आपल्याकडे पुरीभाजी केली जाते. इथे मिळणारी पुरीभाजी मात्र थोडी वेगळी आहे. हरिओम स्पेशल पुरीमध्ये चीज, पनीर किंवा बटाटा टाकला जातो.

पतियाळा लस्सी ही नावाप्रमाणेच एकदम घट्ट आणि पतियाळा पद्धतीनुसार मोठय़ा ग्लासात दिली जाते. त्याचबरोबर दर वीकेन्डला राजस्थानी थाळी, महाराष्ट्रीय थाळी अशा विविध प्रांतांतील भोजनाचा स्वाद इथे घेता येतो.

हरिओम पराठा

  • कुठे-२२ स्वस्तिक प्लाझा, पोखरण रोड- २, ठाणे (प.)