दोन दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची चाळण होण्यास सुरूवात झाली आहे. लहानमोठय़ा खड्डयांमधील खडी बाहेर येऊन त्या जागेवर सतत वाहनांची आदळआपट सुरू असल्याने लहान खड्डयांनी मोठे रूप घेण्यास सुरूवात केली आहे.
मार्च ते मे या कालावधीत डांबरीकरण, डागडुजी केलेल्या रस्त्यांवरील खडी पावसाच्या पहिल्याच फटकाऱ्याने उडू लागल्याने या कामांविषयी संशय व्यक्त केला जात आहे. डोंबिवली पूर्वतील टिळक रस्ता, पश्चिमेत पंडित दिनदयाळ रस्ता, सुभाष रस्ता, केळकर रस्ता चौक भागातील खडी निघून तेथील डांबरीच्या मलमपट्टय़ा निघून जाण्यास सुरूवात झाली आहे.
येत्या दोन दिवसात हे खड्डे बुजवले नाहीतर सततच्या येजा करणाऱ्या वाहनांमुळे हे खड्डे मोठा आकार घेतील. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. पालिकेने खड्डे बुजवण्यासाठी कोटय़वधी रूपयांची तरतूद केली आहे. ही कामे ठेकेदारांना वाटप करण्यात आली आहेत. त्यामुळे खड्डे डागडुजीची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. कल्याणमधील मुरबाड रस्ता, पत्रीपूल-दुर्गाडी रस्ता, संतोषी माता रस्ता भागात खड्डे पडण्यास सुरूवात झाली आहे. हा रस्ता सीमेंटचा करण्याच्या नावाखाली फक्त खोदून ठेवण्यात आला होता. नंतर तो आहे त्या स्थितीत ठेवण्यात आल्याने नागरिकांना, वाहन चालकांना खो खो खेळत या रस्त्यावरून येजा करावी लागत आहे. आयुक्त बंगल्याबाहेर रस्त्याची दुरावस्था झाली आहे. काही ठिकाणी रस्ता उंच तर काही ठिकाणी सखल झाल्याने या भागात अपघात होत आहेत. टिटवाळा भागातील रस्त्यांची दैना होण्यास सुरूवात झाली आहे.
रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरूवात झाली असताना पालिकेने ठेकेदारांना तातडीने खड्डे बुजवण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा, पाऊस कमी होईल म्हणून ठेकेदार वाट पाहत बसतात. दरम्यान खड्डय़ांची संख्या वाढत जाते. त्यात मग २०१० सारखा पालिकेला खड्डे पुरस्कार स्वीकारावा लागतो, अशी टीका नागरिकांकडून करण्यात येत आहे.
तातडीन कामे सुरू
खड्डे बुजवण्याचे ठेके देण्यात आले आहेत. पावसाचे प्रमाण कमी झाले की तात्काळ ही कामे सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती शहर अभियंता पी. के. उगले यांनी दिली.