महापालिकेचा आपत्कालीन कृती आराखडा तयार

पावसाळ्याच्या चार महिन्यांतील समुद्राला येणाऱ्या भरतीचे दहा दिवस मीरा-भाईंदर शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. या दहा दिवसांत साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा समुद्रात उसळणार असल्याने शहरात पाणी तुंबण्याची शक्यता आहे. या आपत्तीला तोंड देण्यासाठी महापालिकेने कृती आराखडा तयार केला असून नागरिकांनीही या दहा दिवसांत विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनने केले आहे.

पावसाळ्यात समुद्राला भरती असली की समुद्र खवळलेला असतो. त्यातच ठरावीक मर्यादेच्या बाहेर लाटा उसळल्या आणि त्याच वेळी पाऊस कोसळला तर मीरा-भाईंदर शहरात जागोजागी पाणी तुंबण्याच्या घटना घडत असता. यंदा जून ते सप्टेंबर महिन्यांत दहा वेळा साडेचार मीटर किंवा त्यापेक्षा जास्त उंचीच्या लाटा समुद्रात उसळणार आहेत. त्यामुळे या दिवशी महापालिकेच्या आपत्कालीन विभागाची कसोटी लागणार असून येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्याची महापालिका प्रशासनाने तयारी केली आहे.

मीरा-भाईंदर शहर समुद्र सपाटीपासून खाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात मोठय़ा भरतीच्या वेळी शहरातील पाणी बाहेर जाण्याचे मार्ग बंद होत असतात उलट समुद्राचे पाणी शहरात शिरत असते आणि त्याच वेळी पावसाने जोर धरला तर संपूर्ण शहर जलमय होते. अनेक ठिकाणी चार ते साडेचार फूट एवढय़ा उंचीपर्यंत पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. यात नागरिकांच्या घरात पाणी शिरून त्यांच्या मालमत्तेचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत असते. यंदा तुंबलेल्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे.

अद्ययावत आपत्कालीन कक्ष

महापालिकेने मीरा रोड येथील कनाकिया भागात २४ तास सुरू राहणारा अद्ययावत असा आपत्कालीन कक्ष सुरू केला आहे. या कक्षात २४ तास दोन कर्मचारी कायम उपस्थित असणार आहेत. नागरिकांनी या कक्षाशी २८११७१०२ आणि २८११७१०४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. याच कक्षात पडणाऱ्या पावसाची नोंद करणारे पर्जन्यमापक यंत्रही बसवण्यात आले आहे.

नौका तैनात

गेल्या वर्षी मीरा रोडच्या हटकेश भागात मोठय़ा प्रमाणावर पाणी तुंबल्याने या भागातील रहिवाशांना अग्निशमन दलाच्या जवानांनी छोटय़ा नौकेच्या साहाय्याने बाहेर काढले होते. या वेळीही तीन छोटय़ा नौका तैनात करण्यात आल्या आहेत, तसेच निष्णात पोहणाऱ्यांची यादीदेखील प्रशासनाने तयार करून ठेवली आहे. अग्निशमन विभागाने या काळात आवश्यक असणाऱ्या सर्व साधनांची तपासणी करून ती सज्ज ठेवली आहेत.

आराखडय़ात काय?

  • पाणी हमखास तुंबते अशी मीरा-भाईंदरमध्ये एकंदर ३९ ठिकाणे आहेत. या ठिकाणी तुंबलेले पाणी बाहेर काढण्यासाठी १० अश्वशक्तीचे पंप महापालिकेकडून तैनात केले जाणार आहेत.
  • भरतीच्या काळात समुद्र किनारे धोकादायक ठरत असल्याने नागरिकांना समुद्र किनाऱ्यावर जाण्यापासून रोखण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा रक्षक तैनात करण्याची सूचना पोलिसांकडून करण्यात आली होती. त्यानुसार किनाऱ्यावर दोन ते तीन सुरक्षा रक्षक उपलब्ध केले जाणार आहेत.
  • नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये, असे आवाहन करणारे फलकही किनाऱ्यावर ठिकठिकाणी लावण्यात येणार आहेत.
  • महापालिकेच्या दोन रुग्णालये आणि प्रभाग कार्यालयातही स्वतंत्रपणे आपत्कालीन कक्ष सुरू करण्यात आले आहेत.