साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा; खबरदारी घेण्याचे महापालिकेचे आवाहन
पावसाळ्याच्या चार महिन्यांत समुद्राला १८ दिवस मोठी भरती असून या कालावधीत साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत. या कालावधीत पावसाचा जोर राहिला तर मीरा-भाईंदर शहरातल्या सखल भागात मोठय़ा प्रमाणात पाणी तुंबण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात नागरिकांनी अधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मीरा-भाईंदर शहर हे तीनही बाजूने खाडीच्या पाण्याने वेढले गेले आहे, तसेच खाडीच्या पातळीपेक्षा शहर काही प्रमाणात खालीदेखील आहे. त्यामुळेच पावसाळ्यात अनेक भागांत पाणी तुंबण्याचे प्रकार होत असतात. समुद्राला मोठी भरती असताना हे प्रमाण अधिकच असते. यासाठीच मीरा-भाईंदर शहराला ओहोटी आणि भरतीच्या वेळापत्रकाला फार महत्त्व आहे. यंदा जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या चार महिन्यांदरम्यान समुद्राला १८ दिवस मोठी भरती येणार आहे. या दरम्यान साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा समुद्रात उसळणार आहेत. सर्वात मोठी भरती २५ जूनला येणार असून या दिवशी ५.०२ मीटर इतक्या उंचीच्या लाटा येणार आहेत.
मीरा-भाईंदर शहरात साठणारे पावसाचे पाणी नाल्यांमार्फत खाडीला जाऊन मिळत असते. यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून येणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या लोंढय़ाचाही समावेश असतो. पावसाच्या सरी जोरात कोसळत असतील आणि याच काळात समुद्रालाही मोठी भरती असेल तर मीरा-भाईंदर शहरात बिकट परिस्थिती निर्माण होत असते. या काळात पावसाचे पाणी खाडीत न जाता तुंबून राहते. काही वेळा खाडीचे पाणीदेखील उलट शहरात येण्याची शक्यताही असते. शहरात एकंदर ४४ सखल भाग आहेत. या भागात अनेक वेळा चार ते साडेचार फूट इतक्या उंचीपर्यंत पाणी तुंबण्याचे प्रकार याआधी घडले आहेत. त्यामुळेच पावसाळ्यात यंदा १८ दिवस येणाऱ्या मोठय़ा भरतीच्या काळात महानगरपालिका प्रशासनाला खबरदारीच्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत. प्रशासनाने यासाठी चार महिन्यांच्या कालावधीसाठी शक्तिशाली पंप भाडय़ाने घेतले आहेत. पाणी तुंबण्याची शक्यता असलेल्या भागांत हे पंप तैनात करण्यात येणार आहेत. या काळात नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नालेसफाई ९५ टक्के पूर्ण
प्रशासनाने हाती घेतलेले नालेसफाईचे काम ९५ टक्के पूर्ण करण्यात आले आहे. आयुक्त डॉ. नरेश गीते आणि अधिकाऱ्यांनी नुकतीच नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. नालेसफाईच्या कामाचे संपूर्ण चित्रीकरण करण्यात आले असून, त्याबाबतची संपूर्ण माहिती महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मोठय़ा पावसात सखल भाग वगळता शहरात इतरत्र पाणी तुंबणार नाही, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
भरती आणि उसळणाऱ्या लाटा
दिवस लाटांची उंची
(मीटरमध्ये)
२३ जून ४.७६
२४ जून ४.९५
२५ जून ५.०२
२६ जून ४.९७
२७ जून ४.८२
२८ जून ४.६०
२२ जुलै ४.६१
२३ जुलै ४.८०
२४ जुलै ४.८९
२५ जुलै ४.८८
२६ जुलै ४.७६
२७ जुलै ४.५५
१० ऑगस्ट ४.५१
२१ ऑगस्ट ४.६३
२२ ऑगस्ट ४.७२
२३ ऑगस्ट ४.७०
२४ ऑगस्ट ४.६०
८ सप्टेंबर ४.५०