पर्यटक, मद्यपी यांच्या बेताल वागणुकीने विद्रूपीकरण; पुरातत्व विभाग, स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष
वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या वसई तालुक्यातील अनेक ऐतिहासिक वास्तूंची दुरवस्था झाली आहे. हौशी पर्यटक व मद्यपींच्या बेताल वागणुकीमुळे या ऐतिहासिक वास्तूंचे विद्रूपीकरण होत असून प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष झालेले आहे.
वसई-पालघर विभागात वसई किल्ला, अशेरीगड, तांदूळवाडीगड, कालदुर्ग, कामणदुर्ग, मांडवी कोट, अर्नाळा किल्ला आदी गौरवशाली गडकोट आहेत. हौशी पर्यटकांकडून किल्ल्याच्या दगडांवर, भिंतींवर रंगरंगोटी केली जात आहे. स्वत:चे, मित्रांची नावे लिहून किल्ल्याच्या सौंदर्यात बाधा आणत आहेत. काही ठिकाणी तर बेताल मजकूरही लिहिलेला दिसतो, त्याशिवाय मद्यपी तरुणही येथे धिंगाणा घालत आहेत. प्रेमी युगुले येऊन येथे प्रेमचाळे करत असून त्यामुळे या ऐतिहासिक ठेव्याचे पावित्र्य भंग होत आहे, अशी नाराजी इतिहासप्रेमींकडून व्यक्त होत आहे. शनिवारी व रविवारी येथे दारूच्या पाटर्य़ाना ऊत आलेला असतो. त्या बंद झाल्या पाहिजेत, अशी मागणी करण्यात येत आहे.
गडकोटांच्या पावित्र्याचे भान न राखता आणि डोंगरी किल्लय़ांवरील वनाचे सौंदर्य न लक्षात घेता पर्यटकांनी इतिहासाची कुचेष्टा चालवली आहे. गडकोटांप्रमाणेच तालुक्यातील विविध थोर व्यक्तींच्या समाध्या, मूर्ती, शिलालेख इत्यादी अगदीच बेवारस पडलेले दिसतात.
जी गत किल्लय़ांची तीच पुरातन मंदिरांची. विविध उत्सवांच्या नावाखाली मंदिरांच्या ऐतिहासिक अवशेषाचे नुकसान होत आहे. तालुक्यातील प्राचीन मंदिरांचे नूतनीकरण केले जात असल्याने ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
वसई तालुक्यातील पर्यटनविषयक गट, दुर्गसंवर्धन संस्था, ट्रेकर्स आदींना प्रामाणिकपणे सक्रिय सहभागाची संधी उपलब्ध करून दिल्यास ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन ही चिंतेची बाब राहणार नाही. केवळ पर्यावरण संवर्धनाची बोंबाबोंब करताना ऐतिहासिक वास्तूंचे जतनीकरण अथवा जुने संदर्भ लक्षात घेणेही गरजेचे आहे.
– डॉ. श्रीदत्त राऊत, किल्ले मोहिमचे प्रमुख