महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पाहणीतील निष्कर्ष
एड्स या आजाराबद्दल गेल्या काही वर्षांपासून सातत्याने जनजागृती करण्यात येत असतानाही वसई-विरार शहरांमध्ये या आजाराला कारण ठरणाऱ्या एचआयव्हीची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीनुसार चालू वर्षांच्या दहा महिन्यांत शहरांत २२० एचआयव्हीग्रस्त आढळून आले, तर कृपा फाऊंडेशन या खासगी संस्थेच्या पाहणीत एचआयव्हीचे ५० रुग्ण आढळले. खासगी रुग्णालये आणि डॉक्टरांकडे करण्यात आलेल्या चाचण्यांची आकडेवारी पालिकेकडे उपलब्ध नसली तरी शहरात दररोज एका व्यक्तीला एचआयव्हीची लागण होत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
१ डिसेंबर हा जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून शासकीय आणि स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या जनजागृतीमुळे एचआयव्हीचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ लागली आहे; परंतु वसई-विरार शहरांत अद्याप एचआयव्हीचे रुग्ण आढळून येत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. अनुपमा राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार पालिकेने चालू वर्षांत जानेवारी २०१५ ते ऑक्टोबर २०१५ या वर्षांत २२ हजार ६७ रुग्णांची एचआयव्ही चाचणी केली. त्यात २२० जण एचआयव्हीबाधित आढळले. १३ हजार १८१ गर्भवती महिलांच्या चाचणीत १७ महिला एचआयव्हीबाधित आढळल्या. क्षय रुग्णाला एचआयव्हीचा संसर्ग होण्याचा धोका सर्वात जास्त असतो. पालिकेने १ हजार ६१५ क्षय रुग्णांची तपासणी केली, त्यापैकी ८७ जणांना एचआयव्हीची लागण झाल्याचे आढळून आले. उर्वरित ८ हजार ४११ सर्वसाधारण रुग्णांपैकी ११७ जणांना लागण झाल्याचे त्यांनी सांगितले.
वसईतील कृपा फाऊंडेशन ही संस्था २००३ पासून एचआयव्हीबाधित रुग्णांसाठी काम करत आहे. त्यांच्याकडे आतापर्यंत २ हजारांहून अधिक एचआयव्हीबाधित रुग्णांची नोंद आहे. चालू वर्षांत त्यांनी केलेल्या चाचणीत ५० जण एचआयव्हीबाधित आढळून आले. याबाबत बोलताना संस्थेचे प्रकल्प अधिकारी अमिन पटेल यांनी सांगितले की, चाचणी केलेल्या रुग्णांमधील २ टक्के रुग्णांना एचआयव्हीची लागण आढळून येते. पूर्वी हे प्रमाण ४ टक्के होते. लागण झालेल्या रुग्णांपैकी ६० टक्के प्रमाण महिलांचे असल्याचे त्यांनी सांगितले.
जागतिक एड्स दिन विशेष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नालासोपारा धोकादायक क्षेत्र
कृपा फाऊंडेशन या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात नालासोपारा शहराला एड्सचा धोका सर्वात जास्त असल्याचे आढळून आले आहे. या ठिकाणी बेकायदेशीर वसाहती आणि चाळी वाढत आहेत. मुंबईतून आणि परराज्यांतून लोंढे येऊन येथे स्थायिक होत आहेत. त्यांच्यात पुरेसी जागृती नसल्याने त्यांच्यात एचआयव्ही फोफावत असल्याचे ते म्हणाले. पालिकेकडे आणि संस्थेकडे असलेली नोंद फारच थोडी आहे. अनेक जण मुंबईत जाऊन चाचणी करतात किंवा खासगी डॉक्टरांकडे जाऊन चाचणी करतात. त्यांच्या नोंदी नसल्याने निश्चित किती जणांना लागण झाली ते समजत नसल्याचे पटेल यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hiv rate increase in vasai
First published on: 01-12-2015 at 02:01 IST