होलीक्रॉस चर्च, निर्मळ

निर्मळ तीर्थक्षेत्री असलेल्या दोन टेकडय़ांवर दोन प्रार्थनास्थळे आहेत. एका टेकडीवर हिंदू धर्मीयांचे मंदिर, तर दुसऱ्या टेकडीवर ख्रिस्ती धर्मीयांचे होलीक्रॉस चर्च. हे चर्च पवित्र क्रुसाला समर्पित केलेले आहे, म्हणूनच या चर्चला नाव पडले होलीक्रॉस चर्च. येशू ख्रिस्ताने कालवरी टेकडीवर आत्मबलिदान केले होते. त्या कालवरी टेकडीशी निर्मल टेकडी साम्यता दर्शवणारी असल्यामुळे या टेकडीलादेखील कालवरी हे नाव मिळाले.

जे स्वच्छ आहे, ते निर्मळ यावरूनच वसईजवळील एका गावाला निर्मळ असे नाव पडले आहे. शेकडो वर्षांपासून निर्मळ येथे दोन तलाव आहेत, शरीर आणि मन निर्मळ करण्यासाठी येथे केवळ ख्रिस्ती धर्मीयच नव्हे, तर हिंदू धर्मीयही मोठय़ा संख्येने येतात. या निर्मळ तीर्थक्षेत्री असलेल्या दोन टेकडय़ांवर दोन प्रार्थनास्थळे आहेत. एका टेकडीवर हिंदू धर्मीयांचे मंदिर, तर दुसऱ्या टेकडीवर ख्रिस्ती धर्मीयांचे होलीक्रॉस चर्च. हे चर्च पवित्र क्रुसाला समर्पित केलेले आहे, म्हणूनच या चर्चला नाव पडले होलीक्रॉस चर्च.

हे चर्च पोर्तुगीज धर्मगुरूंच्या नेतृत्वाखाली बांधले आहे. पोर्तुगीज भाषेत होलीक्रॉस म्हणजे सांताक्रुझ. सांता म्हणजे पवित्र. या टेकडीवर पवित्र क्रुस उभा आहे म्हणून या टेकडीचे नाव आहे सांताक्रुझ. मुंबईला वांद्रेजवळ सांताक्रुझ आहे, तसे वसईतील निर्मळ येथे सांताक्रुझ.

या चर्चची उभारणी १५५८ मध्ये झाली. येशू ख्रिस्ताने कालवरी टेकडीवर आत्मबलिदान केले होते. त्या कालवरी टेकडीशी निर्मल टेकडी साम्यता दर्शवणारी असल्यामुळे या टेकडीलादेखील कालवरी हे नाव मिळाले. १७३७ मध्ये मराठय़ांनी वसईची मोहीम आखली. या मोहिमेत चिमाजी अप्पांनी वसईवर चाल केली असता अनेक चर्चची पडझड झाली. काही चर्च जमीनदोस्त झाली. त्यात निर्मळ चर्चदेखील भुईसपाट झाले. फक्त त्याचा पाया तेवढा राहिला. दरम्यानच्या काळात निर्मळ पंचक्रोशीतील गास, निर्मळ, भुईगाव येथील ख्रिस्ती भाविकांची गळचेपी झाली. त्यांना चर्च हवे होते. अशा परिस्थितीत निर्मळ चर्चच्या पूर्वेला असलेल्या चर्चच्या मालकीच्या जमिनीत एक नवे चर्च बांधण्यात आले. त्या चर्चवरून त्या विभागाला सांताक्रुझ हे नाव पडले.

काळ पालटला, लोकांची मने निर्मळ होत असल्याची चिन्हे दिसू लागली. हिंदू व ख्रिस्ती भाविक एकत्र आले. त्यांनी एक चार कलमी करारनामा सर्वसंमत केला. गावात मामलेदार आले. फा. पेद्रो देरजरो या धर्मगुरूने पुढाकार घेतला. निर्मळ येथील ख्रिस्ती भाविकांनी शेता शिवारातील झावळ्या आणून टेकडीवर असलेल्या जुन्या चर्चच्या पायाभरणीवर झावळ्यांचे चर्च उभे केले. तिथे देव भक्तीला सुरुवात झाली. त्या झोपडीवजा चर्चचे रूपांतर आज एका दिमाखदार चर्चमध्ये झाले आहे. डोंगरावर असल्यामुळे त्याच्या पायथ्याशी असलेल्या अनेक पायऱ्या सर्वाचे मन आकर्षित करतात. चर्चचा थाटमाटदेखील देखणा व तजेलदार आहे. १८५६मध्ये हे येथील जुन्या चर्चच्या उभारणीचे तृतीय शताब्दी वर्ष. ती तृतीय शताब्दी या नवीन चर्चच्या उभारणीचे वर्ष म्हणून गणले गेले. आज या चर्चच्या इमारतीला १६० वर्षे पूर्ण झाली आहेत. दीडशे वर्षांपूर्वी येथील ख्रिस्ती ग्रामस्थांनी या चर्चच्या उभारणीसाठी २० हजार रुपयांचा जो निधी उभा केला. त्या निधीने त्या काळी या चर्चचे आकाशाला भिडणारे शिखर उभे केले.

निर्मळ हे वसईतील एकमेव गाव आहे की जिथे हिंदू आणि ख्रिस्ती धर्माचे बांधव एकाच वेळी एकाच जत्रेत सामील होतात. या चर्चमध्ये कार्तिक महिन्यात जत्रा भरते, त्यामध्ये सर्वधर्मीय नागरिक सहभागी होतात.

आज या चर्चपासून गास आणि भुईगाव अशी दोन स्वतंत्र चर्च उभी राहिली आहेत. त्यांनी आपला स्वतंत्र प्रपंच थाटला आहे. अलीकडेच मर्देस व गोम्स आळी हा विभागदेखील या चर्चपासून अलिप्त करण्यात आला आहे. चर्च डोंगरावर असल्याने वर चढणे भाविकांना अवघड होते, म्हणून या धर्मग्रामची संख्या कमी झाली आहे. आज या धर्मग्रामात ३५८ कुटुंबे असून १७६५ लोकसंख्या आहे. निर्मळ चर्चचे सध्याचे प्रमुख धर्मगुरू फा. जॉन कुशेर आहेत, तर साहाय्यक धर्मगुरू फा. गिल्सन अल्मेडा हे आहेत.

शिक्षणसंस्थेची स्थापना

‘चर्च तिथे शाळा’ हे ख्रिस्ती धर्मगुरूंचे ब्रीदवाक्य आहे. शाळेमुळे गावाचा विकास होतो. हे प्रत्येक चर्चमध्ये दिसून येऊ लागले. मग त्या बाबतीत निर्मळ कसे मागे राहील. फादर आझवेडो यांनी या गावात होलीक्रॉस शिक्षण संस्थेची वाटचाल आखली. शाळेला १ जून १९४४ रोजी सरकारी मान्यता मिळाली. कळम विभागातील विद्यार्थीही या शाळेचा लाभ घेऊ  लागले. आजवर लोकल बोर्डाच्या शाळेत जाणारे अनेक विद्यार्थी या नवीन शाळेकडे वळले. शाळा सातवीपर्यंत आली व थांबली. चर्चच्या ओसरीत वर्ग भरायचे त्या वेळेला नेमके फा. व्हिक्टोरिया हे नवमतवादी धर्मगुरू या गावाला मिळाले. १ जून १९७२ रोजी हायस्कूल अनुदान प्राप्त माध्यमिक शाळा म्हणून मान्यता पावले. १९७५ साली दहावीचा पहिला वर्ग एसएससीच्या परीक्षेला बसला. शाळा जरी नवीन असली तरी तिची घोडदौड विलक्षण जोरात चालू आहे. आज नव्या परिस्थितीला अनुसरून या शाळेला जोडून इंग्रजी माध्यमातील शाळादेखील सुरू केली.