ठाण्यात नुकत्याच भरलेल्या मालमत्ता प्रदर्शनात विकासाचे केंद्र पुढे सरकू लागल्याचे चित्र अगदी ठसठशीतपणे दिसून आले. मुंबई-नाशिक महामार्गावर ठाण्याच्या पलीकडे झपाटय़ाने विकसित होत असलेल्या भिवंडी, खारबाव, पायबावच्या वेशीवर नवं ठाणे विकसित होत असल्याची चर्चाही आता मागे पडू लागली आहे. या पलीकडे असलेल्या विस्तीर्ण अशा मोकळ्या जमिनींकडे बडय़ा बिल्डरांचा मोर्चा वळला आहे. त्यामुळे नव्या ठाण्याची जागा आता नव्या भिवंडीने घेतल्याचे ठाण्यातील प्रदर्शनात पाहायला मिळाले.

गेल्या काही वर्षांपासून जानेवारी महिन्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरांत मालमत्ता प्रदर्शन भरविण्याची नवी टूम निघाली आहे. एका अर्थाने या निमित्ताने बिल्डरांकडून घरांच्या विक्रीसाठी जत्राच भरवली जात असते. त्यामुळे स्वत:चे घर शोधू पाहणाऱ्यांना एकाच छताखाली शेकडो प्रकल्पांचे पर्याय या प्रदर्शनाच्या निमित्ताने उपलब्ध होत असतात. एक काळ असा होता की, अशा प्रकारचे प्रदर्शन केवळ ठाण्यात भरत असे. मुंबई महानगर प्रदेशात नागरीकरणाचे केंद्र अगदी आजही ठाणे, नवी मुंबईपुरते मर्यादित असले तरी हळूहळू हे चित्र बदलू पाहात आहे. ठाणे, नवी मुंबईच्या इंच इंच जमिनीवर गृहप्रकल्पांचे इमले उभे राहिल्याने अलीकडच्या काळात कल्याण, अंबरनाथ, बदलापूर अशा परिसरांतही गृहप्रकल्पांचे बाजार भरू लागले आहेत. ठाण्यात नुकत्याच भरलेल्या मालमत्ता प्रदर्शनात विकासाचे केंद्र पुढे सरकू लागल्याचे चित्र अगदी ठसठशीतपणे दिसून आले. ठाण्यातील बिल्डर मान्य करोत अथवा न करोत स्वस्त घरांचे पर्याय शोधत ग्राहकांचा एक मोठा लोंढा ठाण्याच्या पलीकडे जाऊ लागला आहे. त्यामुळे मेट्रो आणि उन्नत मार्गाच्या नावाने घोडबंदरची घरे विकण्याचे आव्हान यापुढेही येथील विकसकांपुढे असणार आहेत.
कल्याणसारख्या शहरात दररोज निर्माण होणारा कचरा कोठे टाकायचा, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. तरीही या शहराच्या आसपास असलेली मालमत्ता बाजारपेठ मंदीच्या काळातही ऐन भरात असल्यासारखे चित्र अगदी पद्धतशीर रंगविले जात आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरांतील गृहनिर्माण क्षेत्रात काहीसे मंदीचे वातावरण असल्याची चर्चा काही आजची नाही. तरीही ठाण्यात नुकत्याच भरलेल्या प्रदर्शनाच्या निमित्ताने मंदीचा लवलेशही नसल्याचा दावा विकासक करत होते. गृहनिर्माण क्षेत्रात अवतरलेल्या मंदीची झुळूक ठाण्यात पोहोचेल आणि येथील मालमत्तांचे दर कमी होतील अशा स्वप्नरंजनात राहणाऱ्या ग्राहकांचा मात्र या प्रदर्शनांना जाऊन भ्रमनिरास होऊ लागला आहे. गेल्या काही वर्षांतील चित्र पाहिले तर ठाणेच नव्हे तर डोंबिवलीलाही किफायतशीर दरात घर मिळणे कठीण झाले आहे. त्या तुलनेत अंबरनाथ, बदलापूर येथे किफायतशीर किमतीत म्हणजेच २० ते २५ लाखांत घर मिळण्याचा पर्याय अजूनही खुला आहे. हा पर्याय सध्या स्वस्त दिसत असला तरी भविष्यात तोही महाग ठरेल अशा पद्धतीने वाटचाल सुरू आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात मंदी आहे आणि कधी तरी घरे स्वस्त होतील अशी अपेक्षा बाळगणाऱ्यांच्या पदरी सध्या तरी निराशाच पडू लागली आहे.
ठाणे, भिवंडीतील बडय़ा विकासकांनी एकत्र येऊन नुकतेच घोडबंदर भागातील बाळकूम परिसरात भव्यदिव्य असे मालमत्ता प्रदर्शन भरविले. ठाण्यातील राजकीय नेते, बडे पुढारी, महापालिकांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मांदियाळी या मालमत्ता प्रदर्शनात भरली होती. सुमारे ६० पेक्षा अधिक विकासक, कर्जपुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्था आणि ५०० पेक्षा अधिक मोठे गृहप्रकल्प असा मोठा थाटमाट या प्रदर्शनाच्या निमित्ताने ग्राहकांना अनुभवता आला. तब्बल चार दिवस चाललेल्या या प्रदर्शनास सुमारे ६० हजार ग्राहकांनी भेट दिल्याचा दावा विकासकांच्या प्रमुख संघटनेने केला आहे. या काळात सुमारे २७० घरांची थेट विक्री झाली आणि पुढील काळात प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या गृहप्रकल्पांना भेटी देऊ इच्छिणाऱ्या सुमारे ८०० ग्राहकांच्या वेळाही ठरवून घेण्यात आल्या. शहरातील इतर भागांमध्ये घोडबंदर भागातील गृहप्रकल्प खरेदीसाठी सर्वाधिक इच्छुकांनी आपली नावे नोंदवली. तसे होणे स्वाभाविकच होते. मूळ शहर तसेच आसपासच्या भागातील मालमत्तांचे दर गगनाला भिडले असताना घोडबंदर भागात नव्याने उभ्या राहणाऱ्या गृहप्रकल्पांचा तुलनेने स्वस्त पर्याय ग्राहकांपुढे उपलब्ध आहे. हा पर्याय तुलनेने कमी महाग असला तरी त्याला स्वस्त म्हणता येण्यासारखी परिस्थिती निश्चितच नाही. या प्रदर्शनात वित्तीय संस्थांचे स्टॉल्स मांडण्यात आले होते. बिल्डर संघटनेच्या दाव्यानुसार या वित्तीय संस्थांकडे सुमारे २०० कोटी रुपयांच्या कर्जाची नोंदणी झाली आहे. एकंदर या चार दिवसांत सुमारे १५०० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा दावा एमसीएचआय क्रिडाईचे प्रमुख जितेंद्र मेहता यांनी केला आहे. ज्या २७० घरांची विक्री झाल्याचा दावा केला जात आहे त्यातील ५० टक्क्यांहून अधिक घरे ही ५०० ते ६५० चौरस फूट आकाराची आहेत. यापेक्षा मोठय़ा आकाराच्या १०० घरांची नोंदणी झाली असून भिवंडी तसेच आसपासच्या पट्टय़ात सेकंड होम घेऊ इच्छिणाऱ्या २५० ग्राहकांनी विविध गृहप्रकल्पांमध्ये आपल्या नावांची नोंदणी करून ठेवली आहे.
नजीकच्या काळात घर खरेदी-विक्रीच्या माध्यमातून एकंदर १५०० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल या प्रदर्शनाच्या निमित्ताने होऊ शकते, असे म्हटले जात आहे. बिल्डर संघटनेने जाहीर केलेले हे सगळे दावे खरे मानले तर या प्रदर्शनावर मंदीच्या चर्चेचा काहीही फरक पडलेला नाही असेच दिसते. यात कितपत तथ्य आहे हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच मात्र घोडबंदरची गृहमहागाई अजूनही कायम असल्याचे चित्र या निमित्ताने ठसठशीतपणे पुढे आले.
मेट्रो, उन्नत रस्त्यांच्या नावाने चांगभलं
ठाण्याच्या मालमत्ता प्रदर्शनात भिवंडी, शीळ-कल्याण मार्गावरील अनेक मालमत्तांचे पर्याय मांडले गेले असले तरी या प्रदर्शनाचा फोकस घोडबंदर मार्गावरच कसा राहील, यादृष्टीने पुरेपूर काळजी घेण्यात आली होती. राज्यात सत्ताबदल होताच वडाळा-घाटकोपर-कासरवडवली या मार्गावर मेट्रो प्रकल्पाच्या आखणीला जोर आला आहे. येत्या काही महिन्यांत मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या कार्यकारी बैठकीपुढे यासंबंधीचा अंतिम प्रस्ताव मांडला जाण्याची दाट शक्यता आहे. त्याचा पुरेपूर परिणाम ठाण्याच्या मालमत्ता प्रदर्शनावर दिसून आला. मुंबईतून येणारी मेट्रो ठाण्यातील तीनहात नाकामार्गे घोडबंदरच्या ओवळा भागापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने काहीसा अडचणीचा ठरणाऱ्या या भागाला सुगीचे दिवस येणार आहेत. त्यामुळे मेट्रोमार्गालगत उभ्या राहात असलेल्या मालमत्तांमधील घरांचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत ३०० ते ५०० रुपयांनी वाढविण्यात आल्याचे चित्र यंदाही दिसून आले. याच मार्गावर मुंबईस्थित एका बडय़ा बिल्डरला राज्य सरकारने विशेष नागरी वसाहत उभारण्यास परवानगी दिली आहे. या वसाहतीमध्ये ६०० चौरस फुटाचे एक शयनगृह असलेल्या घरांच्या विक्री प्रदर्शन या ठिकाणी मांडण्यात आले होते. जेमतेम ६०० ते ६४० चौरस फूट क्षेत्रफळ (तेही बिल्टअप) असलेल्या या घराची विक्री किंमत ८५ लाख एवढी मांडण्यात आली होती. राज्य सरकारचे नोंदणी शुल्क, वाहनतळासाठी आकारण्यात येणारे अतिरिक्त शुल्क तसेच देखभाल, दुरुस्ती शुल्क धरून हे घर ९५ लाखांच्या घरात जात होते. नावाजलेल्या या बिल्डरच्या प्रकल्पातील घरे महाग असणे स्वाभाविक असले तरी चौरस फुटाप्रमाणे हे दर १४ हजारांपेक्षा अधिक होत असल्याचे पाहून अनेकांना घाम फुटणे स्वाभाविक होते. महागडय़ा जमिनींवर उभे राहणारे गृहप्रकल्प स्वस्त असतील ही अपेक्षा बाळगणे मुळातच धारिष्टय़ाचे ठरणार आहे. त्यामुळे घर विक्रीच्या जत्रेत ग्राहकांच्या पदरात नेमके काय पडले, हा प्रश्न तसा अनुत्तरितच राहिला आहे.