प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे जिन्यांवर कोंडी; फलाटही अपुरा
बदलापूर शहराची वाढती लोकसंख्या आणि त्याचा रेल्वे व्यवस्थेवर पडणारा भार हा काही नवा विषय नाही. दिवसेंदिवस वाढणारी प्रवाशांची गर्दी ही आताच्या रेल्वे फलाट आणि रेल्वे स्थानक परिसरासाठी आवाक्याबाहेर होत चालली आहे. त्यामुळे आता होम प्लॅटफॉर्मची मागणी जोर धरते आहे.
बदलापूर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक एक आणि दोन सध्या कर्जतकडे जाणाऱ्या आणि मुंबईहून आलेल्या बदलापूर लोकल तसेच मुंबईसाठी सुटणाऱ्या लोकलसाठी वापरले जाते. त्यामुळे सर्वाधिक भार असलेले हे फलाट आहेत. त्या तुलनेत फलाटाची क्षमता आणि रुंदी तितकी नाही. फलाट सध्या दोन जिन्यांनी जोडले गेले आहेत. मात्र फलाटाच्या रुंदीप्रमाणेच जिन्यांची रुंदी असल्याने प्रवाशांना अनेकदा स्थानकाबाहेर पडण्यासाठी बराच काळ ताटकळत उभे राहावे लागते. त्यामु ळे रेल्वे रूळ ओलांडून आणि लोकलमधून उडय़ा मारून जाण्याचा पर्याय प्रवासी निवडतात. त्यावर उपाय योजण्याची सध्या गरज आहे.
त्यावर उत्तम उपाय म्हणून आता होम प्लॅटफॉर्मचा आग्रह धरला जात आहे. होम प्लॅटफॉर्ममुळे फलाट क्रमांक एकला पर्याय निर्माण होणार आहे. त्यामुळे फलाट क्रमांकएकवर येणाऱ्या लोकलमधून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना होम प्लॅटफॉर्मचा पर्याय मिळणार आहे. त्यामुळे अरुंद फलाट आणि जिन्यामुळे होणारी प्रवाशांची अडचण काही प्रमाणात कमी होऊ शकते. गर्दीची विभागणी झाल्याने प्रवाशांना रेल्वे स्थानकाबाहेर पडणे अधिक सोपे जाऊ शकते. तसेच फलाट क्रमांक एकवर येणाऱ्या लोकलमध्ये चढण्यासाठी होणारी प्रवाशांची धडपड आणि त्यातून होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही कमी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील स्कायवॉकखालील खांबापर्यंतची जागा उपलब्ध होऊ शकते. याचा रिक्षा थांब्यांनाही काही त्रास होणार नाही. त्यामुळे जागेच्या समस्येत अडकलेल्या स्टेशनच्या पर्यायाची चाचपणी लवकरात लवकर व्हावी अशी मागणी हो्रत आहे.
जागेच्या समस्येत अडकलेल्या बदलापूर स्थानकावरील भार कमी करण्यासाठी होम स्टेशनचा पर्याय उत्तम असून त्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न होणे गरजेचे आहे.
– मिलिंद बदे, प्रवासी
होम प्लॅटफॉर्मचा प्रस्ताव आमच्याकडूनही वरिष्ठांना पाठविण्यात आला आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाच्या मदतीचीही गरज लागणार आहे. लवकरच हा प्रकल्प मार्गी लागेल, अशी आशा आहे.
– नारायण शेळके, मुख्य स्टेशन प्रबंधक, बदलापूर
योग्य प्रस्ताव आल्यास तो सभागृहासमोर ठेवून त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल.
-देवीदास पवार, मुख्याधिकारी, कुळगाव बदलापूर नगरपालिका