परदेशी पदार्थाचे आपल्या एक आकर्षण असते. चायनिज, मेक्सिकन, थाई, इटालियन अशा पदार्थाची अनेक हॉटेल्स मुंबई आणि परिसरात आहेत. मात्र वसईमध्ये असे एक रेस्टॉरंट सुरू झाले आहे, जिथे युरोपातील विविध पदार्थ मिळतात. तेच ते देशी पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर खवय्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. ‘टर्निग पॉइंट’ नावाच्या या हॉटेलात युरोपियन पदार्थाना देशी पदार्थाचा तडका देऊन नवे पदार्थ येथे तयार केले जातात. ‘जॅलेपिनो कॉर्न चीज ट्रायांगल्स’ व ‘जॅलेपिनो चीली पॉपर्स’ या वेगळ्या पदार्थाबरोबरच सॅण्डवीच आणि पावभाजीचे विविध प्रकार मिळतात. पंच पाणीपुरी हा तर खवय्यांसाठी खासच पदार्थ ठरत आहे.
अनेक वष्रे परदेशात जहाजावर शेफ म्हणून काम करणाऱ्या रोशन नाईक यांनी भारतात आल्यावर ‘ताज लॅण्ड’ या पंचतारांकित हॉटेलात शेफ म्हणून काम सुरू केले. क्रुझवर विविध युरोपियन पदार्थाची त्यांना ओळख झाली होती. तशी अस्सल चव भारतीयांना मिळत नाही हे त्यांनी जाणले. ते मूळचे वसईचे असल्याने वसईत अनोखे हॉटेल सुरू करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. युरोपियन पदार्थाना देशी पदार्थाचा तडका देऊन नवीन पदार्थ तयार करण्याचे त्यांनी ठरवले. नाईक यांनी मित्र अमित शहा यांची मदत घेऊन ‘टर्निग पॉइंट’ हे हॉटेल सुरू केले आहे. या हॉटेलात ५० ते ६० नव्या खाद्यपदार्थाची चव खवय्यांना मिळते. सिझलर्सवर अधिक भर देण्यात आलेला आहे. सिझलर्स व क्लब सॅण्डविच हे येथील वैशिष्टय़पूर्ण पदार्थ मानले जातात. युरोपात प्रसिद्ध असलेले ‘जॅलेपिनो कॉर्न चीज ट्रायांगल्स’ व ‘जॅलेपिनो चीली पॉपर्स’ हे पदार्थ खवय्यांना इथे खेचून आणतात. या हॉटेलात विविध प्रकारचे पिझ्झा व पास्तादेखील ग्राहकांची चव भागवतात. पाणीपुरी व सॅण्डविच यांच्यावर नितांत प्रेम करणाऱ्या ग्राहकांसाठी विशिष्ट प्रकारची पाणीपुरी व सॅण्डविच येथे उपलब्ध आहे. ‘चीज पंच पुरी’ हे मुख्य आकर्षण बनले आहेत. सॅण्डविचमध्ये ‘क्लब सॅण्डविच’ तसेच ‘बॉम्बे चीज सॅण्डविच’ हे खास वेगळे पदार्थ आहेत. पावभाजीचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे नाईक यांनी ‘ब्लॅक पावभाजी’, ‘बनाना पावभाजी’, ‘खडा पावभाजी’ व ‘हरियाली मसाला पावभाजी’ असे प्रकार आणले आहेत.
ग्राहकांच्या प्रकृतीचाही विचार
ग्राहकांना विविध व्यंजने उपलब्ध करून देताना नाईक यांनी ग्राहकांच्या प्रकृतीची काळजी घेतली आहे. टर्निग पॉइंटमध्ये देण्यात येणारे पाणी बाटलीबंद म्हणजेच मिनरल वॉटर असते. यासाठी कुठलेच अतिरिक्त शुल्क ग्राहकांकडून आकारले जात नाही. पिण्याच्या पाण्याला विशेष चव येण्यासाठी मिंट फ्लेवर्ड म्हणजे पुदीनामिश्रित पाणी ग्राहकांनी दिले जाते. विशेष म्हणजे येथील सर्व पाककृती या मिनरल वॉटरमध्ये तयार केल्या जातात. आरोग्यासाठी लाभदायक ‘सनफ्लावर हेल्थ फिट ऑइल’ वापरले जातात. खाद्यपदार्थाना अस्सल युरोपियन चव येण्यासाठी लागणारे लोणी खास इटलीतून आयात करण्यात येते.
हॉटेल टर्निग पॉइंट
- कुठे : ३, पद्मराज, सेंट फ्रान्सिस शाळेसमोर, शंभर फुटी मार्ग, वसई (पश्चिम).
- वेळ : दररोज सायंकाळी ४ ते ११.