प्रत्येक माणूस म्हणजे एक पुस्तक आहे. ते पुस्तक वाचून भरपूर माहिती मिळते त्यातून शिकण्यासारखे प्रचंड असते, हे आपण अनुभवले असल्याचे प्रतिपादन डॉ. योगेंद्र जावडेकर यांनी केले. माणूसाने माणूस म्हणूनच जगले पाहिजे, असे आपणास वाटते असेही त्यांनी सांगितले. प्रतिभावंत बदलापूरकर या कार्यक्रमात डॉ. योगेंद्र जावडेकर आणि डॉ. सविता जावडेकर यांची निवेदक भूषण करंदीकर यांनी प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते. श्रीराम केळकर यांनी स्वागत, संदीप साखरे यांनी प्रास्तविक आणि निलेश धोत्रे यांनी आभार प्रदर्शन केले. पंडित अच्युत जोशी, नगरसेविका तनुजा गोळे, काका गोळे फौंडेशनचे आशिष गोळे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. रविवारी रात्री काका गोळे फौंडेशनच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास बदलापूरच्या रसिक श्रोत्यांची गर्दी उसळली होती.
यावेळी डॉ. सविता आणि योगेंद्र जावडेकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. लौकिकार्थाने संगीताचे शिक्षण झाले नसले तरी एकाच महाविद्यालयात असल्याने त्या ठिकाणी आवडीप्रमाणे संगीत शिकता आले. जी. एस. मेडिकल महाविद्यालयाने सर्वकाही शिकवले असल्याचे जावडेकर म्हणाले. बदलापूर शहरात सांस्कृतिक भूक निश्चित भागेल हा विश्वास असल्याने, बदलापूर शहरात वास्तव्यास येण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही जी तत्वे पाळू शकलो ती तत्वे आताचे वैद्यकिय क्षेत्रात येणारी मंडळी पाळू शकतील असे दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले. आत्ताचे चित्र तसे निराशाजनक असेच आहे. चांगली मुले या क्षेत्रात कमी येतात. आता वैद्यकीय क्षेत्रापेक्षा कला क्षेत्रात भरपुर दालने आहेत. शिवाय त्यात पैसा ही आहे आणि ग्लॅमरही आहे, असे त्यांनी सांगितले. शहरांमध्ये सध्या सांस्कृतिक गोष्टींचा ऱ्हास होत असतानाच्या या काळात प्रतिभावंत बदलापूरकर सारखे दर्जेदार कार्यक्रम करून ते वातावरण पुन्हा निर्माण होत असल्याबद्दल जावडेकर दांपत्यानी समाधान व्यक्त केले. नागरीकरण जरी वाढत असले तरी या गावाचे गाव पण अजुनही टिकून आहे. आदिवासी बांधव अजूनही मोठय़ा प्रमाणात आहेत हे येथील वैभव आहे. या ग्रामीण भागासाठीही कार्यक्रम राबवले जातात असून हे सकारत्म आहे.
नवी दिल्ली येथील युसुफ सईद यांनी जावडेकर यांच्या गझला आणि कव्वाली ऐकल्या आणि त्यांनी या गझलांचे ध्वनिमुद्रण करण्याचा विचार व्यक्त केला. त्यांनी त्या गझला ध्वनीमुद्रीत करून प्रकाशित केली. ती ध्वनीमुद्रीका पाकिस्तानमध्ये प्रचंड गाजली. या गझलांमध्ये प्रामुख्याने माणूस ह गाभा होता. जर माणूस माणसाला इतका आवडू शकतो. तर तो आतंकवादी होवू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाची सुरुवात ‘नाही खर्चली, कवडी दमडी..’ या गाण्याने झाली. तर समारोप ‘है जिंदगीके दुश्मन..या गझलने झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Human is a book of full information
First published on: 04-08-2015 at 12:17 IST