लखनऊ म्हटले की नवाब, त्यांची अदब, संस्कृती आणि त्यांचे खाद्यपदार्थाचे शौक यांचीच चर्चा होते. त्यातही लखनवी कबाब आणि बिर्याणी हे इथल्या शाही खान्याचे केंद्रबिंदू आहेत असे म्हणायला हरकत नाही. लखनऊ खाद्यपदार्थाची लज्जत चाखायची असेल, त्यांचा आस्वाद घ्यायचा असेल तर ‘मीरा रोडच्या इब्राहिम्स’ला जरूर भेट द्यायला हवी.

पूर्वीचे अवध आणि आताचे लखनऊ या शहरावर नवाबी संस्कृतीचा पगडा आहे. इथले लोकही स्वत:ला लखनवी असे संबोधतात. इथे मिळणारे अवधी भोजन हे केवळ उत्तर प्रदेशातच नव्हे, देशभरातच नव्हे तर परदेशातही लोकप्रिय आहे. इथल्या भोजनात वापरले जाणारे विशेष प्रकारचे मसाले हे नवाबांच्या खास पसंतीनुसार उपयोगात आणले जात होते आणि आजही ही परंपरा जपली जात आहे. नवाबांच्या कालखंडापासूनच्या इथल्या खानसाम्यांनी आपली शैली विकसित केली आहे. याला दम शैली असे म्हटले जाते. मंद आचेवर पदार्थ तयार करणे ही ती शैली आणि म्हणूनच इथल्या कबाब आणि बिर्याणीला वेगळीच चव असते.

मीरा रोडच्या कनाकिया भागात सुरू झालेल्या इब्राहिम्स या खास लखनवी खाद्यपदार्थाच्या रेस्टॉरंटमध्ये आपल्याला याचा अनुभव घेता येईल. गलावटी, पहाडी, रेशमी, मलई, शामी हे विविध प्रकारचे कबाब आणि दम बिर्याणी हे इथले खास आकर्षण आहे. त्यातही गलावटी कबाबांना खूपच मागणी आहे. गलावटी कबाब हे लखनऊचे सर्वात प्रसिद्ध असलेले कबाब आहेत. हे कबाब म्हणजे एक प्रकारे लखनऊची शानच आहेत. गलावटी म्हणजे तोंडात सहज विरघळणारे आणि गळ्यातून सहज उतरणारे म्हणून या कबाबांना गलावटी कबाब संबोधले जाते. हे कबाब तयार करण्यामागेदेखील एक रंजक असा ऐतिहासिक संदर्भ आहे.

मीरा रोडच्या इब्राहिम्समध्ये हे चिकन गलावटी, मटण गलावटी कबाब उपलब्ध आहेत. याशिवाय लखनवी मसाल्यात बनवलेले चिकन खिमा, मटण खिमा, चिकन टिक्का या ठिकाणी मिळतात. इथली दम बिर्याणीदेखील खासच आहे. लखनवी पद्धतीने दम लावून बनवलेली चिकन आणि मटण बिर्याणी इतर बिर्याणींपेक्षा आपले वेगळे अस्तित्व दाखवून देते. विशेष म्हणजे लखनऊचे कबाब आणि बिर्याणी मिळणारे मीरा रोडमधील इब्राहिम्स हे मुंबई आणि आसपासच्या परिसरातील एकमेव ठिकाण आहे. इथे मिळणारी बैदा रोटीदेखील खास आहे. इब्राहिम्समधील पदार्थामधून वापरले जाणारे मसाले आणि ते बनविणारे आचारी थेट लखनऊमधूनच आणले आहेत.

गलावटी कबाबची गोष्ट

लखनऊचे नवाब हे वयपरत्वे वृद्ध झाले होते. त्यांच्या तोंडात दातदेखील नव्हते; परंतु काही झाले तरी ते नवाब होते. त्यांचे खाण्यापिण्याचे शौक कायम होते. परंतु दातांमुळे मोठीच अडचण होत होती. मग त्यांनी शाही खानसाम्याला पाचारण केले. खाताना दातांची आवश्यकता भासणार नाही अशा पद्धतीने कबाब बनविण्यास या खानसाम्याला त्यांनी सांगितले. मग या खानसाम्याने आपले कौशल्य पणाला लावत गलावटी कबाब बनवले. हे कबाब इतके मऊ होते की ते खाण्यासाठी दातांची अजिबात गरजच लागली नाही. त्यामुळे ते तोंडात सहजपणे विरघळे, शिवाय गळ्याखाली देखील अगदी सहज उतरले. गळ्यातून सहज उतरणारे कबाब म्हणून हे कबाब तेव्हापासून गलावटी कबाब नावाने प्रसिद्ध झाले. पपयाचा वापर करीत हे कबाब बनवले जातात, त्यामुळे ते अगदी लोण्याहूनही मऊ असतात.

इब्राहिम्स

  • शॉप क्र. १ व २, अंतरिक्ष टॉवर, कनाकिया पोलीस स्टेशनसमोर, मीरा रोड (पूर्व)