गुबगुबीत पांढऱ्या रंगाची आणि सगळ्यांना पाहताक्षणी प्रेमात पाडणारी खाद्यमैत्रीण म्हणजे इडली. ‘जसा देश तसा वेष’ या उक्तीनुसार मुळात दाक्षिणात्य असणाऱ्या इडलीने महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीला अनुसरून स्वतमध्ये बरेच बदल केले. रस्त्यावरून ‘पाँम पाँम’ असा आवाज करत इडली, मेदूवडा, डोसे विकणाऱ्या अण्णापासून ते सायकलवर, छोटय़ा ठेल्यावर विकणारे विक्रेते आणि बडय़ा रेस्टॉरंटमध्ये ऐटीत पदार्थ सव्र्ह करणाऱ्या शेफपर्यंत सर्वत्र इडलीचा संचार दिसून येतो. इडली हा पदार्थ सहजपणे कुठेही मिळणारा आणि खाता येणारा आहे. बटर इडली, रवा इडली या इडलीच्या पारंपरिक अवतारांबरोबरच निरनिराळ्या ठिकाणी तिचे नवे ध्यान पाहायला मिळते. कल्याणमधील क्षुधा-शांती उपाहारगृहात ‘टिपका इडली’ मिळते.
टिपका इडली?. हा काय प्रकार आहे, असा प्रश्न पडला असेल ना! कल्याणातील घेलादेवजी चौकात ४२ वर्षांपूर्वी ‘टिपका इडली’चा जन्म झाला. इडली, शेंगदाण्याची चटणी आणि त्यावर तिखट र्ती म्हणजे टिपका. जिभेवर ठेवल्या ठेवल्या विरघाळणारी मऊ शार इडली असा या टिपका अवताराचा लौकिक आहे. अशा या मऊदार इडलीला साथ मिळते ती येथील शेंगदाण्याच्या पांढऱ्या चटणीमुळे. ही चटणी शेंगदाणा, खोबरं, मिरची व आलं यांच्या मिश्रणातून तयार होते. शेंगदाण्याची ही चटणी खवय्यांमध्ये एवढी लोकप्रिय आहे की, ही चटणी एकस्ट्रा घेऊन वाटीच्या वाटी भुरकतांना ते मागे-पुढे पाहत नाहीत. शेंगदाण्याच्या या चटणीची चव इतरत्र कुठेच मिळत नाही, असा जाणकार खवय्यांचा दावा आहे. इडली-चटणी या पदार्थाला पूर्णत्वास नेणारा घटक म्हणजे ‘टिपका’. मिरची व तेलाचा थर या दोहोंचे मिश्रण असलेला हा टिपका इडली-चटणीवर घ्यायला खवय्ये विसरत नाहीत. या टिपक्यामुळे इडली काहीशी झणझणीत होते, असे उपाहारगृहाचे मालक योगेश भट सांगतात.
गोपाळकृष्ण भट यांनी १९२०मध्ये म्हणजे ९५ वर्षांपूर्वी कल्याणातील त्यावेळच्या मुख्य बाजारपेठ असणाऱ्या घेलादेवजी चौकात हॉटेल क्षुधा-शांती सुरू केले. बाजारपेठेच्या या भागांत आजूबाजूच्या खेडय़ापाडय़ांतील लोक, व्यापारी, गावकरी खरेदीसाठी येत असत. विशेषत: लग्न मौसमात खरेदी करणारे पंचवीस-पन्नास लोकांचे समूह नाश्त्यासाठी या उपाहारगृहात येत असत. सुरुवातीच्या काळात उपहारगृहात चिवडा, फाफडा, जिलेबी, मिसळ, बुंदीचा लाडू, डोसा अशा अनेक पदार्थाची चंगळ असे. गोपाळकृष्ण यांचा मुलगा दिवाकर भट यांनी आपल्या वडिलांच्या दुकानाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. बदलणारा काळ व वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन दिवाकर यांनी मेदूवडा, टिपका इडली, मिसळ या पदार्थावर अधिक लक्ष केंद्रित केले. त्यात या हॉटेलमधील टिपका इडली, मिसळ आदी पदार्थ खूपच लोकप्रिय झाले. येथील झणझणीत मिसळही खवय्यांमध्ये प्रसिद्ध आहे. दिवाकर यांच्या अथक परिश्रमामुळे आजही या उपाहारगृहाची ओळख क्षुधा-शांती न राहता ‘दिवाकर’ अशीच आहे. आता त्यांच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी योगेश भट हे उपाहारगृह चालवत आहेत. विशेष म्हणजे हे उपाहारगृह केवळ सकाळीच सुरू असते. मॉर्निग वॉकला जाणारी मंडळी, सकाळी खेळून नाश्त्यासाठी आलेले खेळाडू, शाळा-महाविद्यालयांमधील तरुण-तरुणी अशा विविध क्षेत्रातील लोकांचा या उपाहारगृहात गराडा असतो.
संग्रहित लेख, दिनांक 14th Mar 2015 रोजी प्रकाशित
इडलीवरचा झणझणीत टिपका!
गुबगुबीत पांढऱ्या रंगाची आणि सगळ्यांना पाहताक्षणी प्रेमात पाडणारी खाद्यमैत्रीण म्हणजे इडली. ‘जसा देश तसा वेष’ या उक्तीनुसार मुळात दाक्षिणात्य असणाऱ्या इडलीने महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीला अनुसरून स्वतमध्ये बरेच बदल केले.

First published on: 14-03-2015 at 09:24 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Idli chutney